पान:इहवादी शासन.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आठ । इहवादी शासन
 

आकांक्षा बाळगून होते तो आधार कोसळल्यामुळे तरी येथला मुस्लिम समाज परिवर्तनास सिद्ध होईल, अशी आशा करण्यास हरकत नाही. भारतांतील मुस्लिम नेत्यांच्या आजच्या जाहीर वक्तव्यांवरून ती आशा दृढ होते.
 चीनने भारताला आक्रमक ठरवून अमेरिकेशीं जी अत्यंत अश्लाघ्य हातमिळवणी केली तिच्यामुळे भारतांतील कम्युनिस्टांच्या कम्युनिझम, मार्क्सवाद या धर्मावरील अंध श्रद्धेला तडा जाईल, ती ढिली होईल व तेहि राष्ट्रवादी होऊन भारताशी एकनिष्ठ होतील, अशी अपेक्षा करण्यास थोडी जागा निर्माण झाली आहे, काल-परवापर्यंत कट्टर साम्राज्यवादी म्हणून ज्या अमेरिकेवर चीन आग पाखडीत होता त्या अमेरिकेशीं आज चीन एकरूप होत आहे, तिच्या मुखांतून बोलत आहे. हें पाहून जगांत तत्त्वनिष्ठा म्हणून कांही असतं, यावरचा विश्वासच उडून जातो. कसला मार्क्सवाद व कसला कम्युनिझम ! वेळ येतांच आपल्या भारतीय कम्युनिस्ट सेवकांना साम्राज्यवाद्यांचे कुत्रे म्हणून संबोधून ठोकरून लावण्यास माओसाहेब मुळीच कमी करणार नाहीत, हे उघड आहे. या संभाव्यतेमुळे कम्युनिस्टांची धर्मांधता कमी होऊन तेहि इहवादी, बुद्धिवादी होतील, अशी आशा करणें अगदीच गैरहिशेबी होईल, असं म्हणण्याचे कारण नाहीं. तसे झाल्यास भारतांतील दुसरी एक इहवादविरोधी शक्ति लुप्त होईल.
 भारतांतील परकी मिशनरी यांच्या मनांत कधीकाळी परिवर्तन होईल ही आशा करण्यांत अर्थ नाही. पण त्यांच्या भारतीय अनुयायांच्याबद्दल कांही अपेक्षा ठेवल्या, तर ते अगदीच वावगे होईल असे नाही. तसें काय घडलें आहे ?
 ख्रिश्चन समाज म्हणजे अमकी विशिष्ट मूल्ये वंदनीय मानणारा व तीं आचरणांत आणणारा समाज, अशी स्थिति कधीहि इतिहासांत नव्हती, पण तशी श्रद्धा या मिशनऱ्यांची आहे. ख्रिस्ती धर्माचें श्रेष्ठत्व येथल्या लोकांना पटवून देऊन आम्ही धर्मांतर करतों, वाममार्गांनी नाही, असा त्यांचा दावा आहे. बांगला देशांत पाकिस्तानी सैतानांनी भयंकर मानवहत्या केली, नरसंहार केला. आणि अशा पाकिस्तानला त्याच्या या हत्याकांडाला अमेरिका व इतर अनेक ख्रिश्चन राष्ट्र यांनी पाठिंबा देऊन याह्याखानांना शस्त्रास्त्रेहि पुरविलीं. 'दाऊ शॅल्ट नॉट किल ? 'अहिंसा परमोधर्म:' असे ख्रिश्चन धर्माचं तत्त्व आहे. तेव्हा ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याने माणूस जास्त धर्मप्रवण होतो, त्याच्या आश्रयानेच मोक्ष मिळविणें शक्य होते, ही श्रद्धा फोल आहे हे मिशनऱ्यांच्या नव्हे, पण त्यांच्या नादाने फसणाऱ्यांच्या तरी ध्यानांत येईल. हे ध्यानांत येण्यास या युद्धाची गरज होती असें नव्हे. इतिहासाच्या पानापानांवर ते लिहिलेले आहे. पण डोळ्यांसमोर घडलेल्या घटनांचा परिणाम जास्त होतो म्हणून याचें महत्त्व विशेष.
 इस्लाम धर्म असो, ख्रिश्चन धर्म असो मार्क्सधर्म असो किंवा कोणताहि अन्य धर्म असो. त्यावरील श्रद्धा हा समाजसंघटनेचा पाया होऊं शकत नाही, हाच