पान:इहवादी शासन.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७६ । इहवादी शासन
 

 यासंबंधी प्रारंभी विवेचन करतांना वेस्टवे याने हाच सिद्धान्त मांडला आहे. इ. पू. ७०० ते इ. स. ३०० या काळांत ग्रीस व रोम येथे धर्मसत्ता गौण असून, राजसत्तेला प्रधान स्थान होते. त्यामुळे तेथे बुद्धिप्रामाण्य होतें, अवलोकन होतें, प्रयोग होते, संशोधन होते, आणि म्हणूनच कर्तृत्वाचा उत्कर्ष झाला होता. वेस्टवे म्हणतो, "ग्रीक संस्कृतीचा हाच फलितार्थ आहे."

अरबांचें कर्तृत्व

 या दृष्टीने मुस्लिम देशांतील कर्तृत्वाचा विचार आपण केला पाहिजे. अरब देशांचा इतिहास पाहतां असें दिसतें की, इसवी सनाच्या नवव्या-दहाव्या शतकांत अरबांचें कर्तृत्व चांगलेच फुलून आले होते. महंमद जवीर, अरकाझेल, अलहाजेन, अबदुल लतीफ इत्यादि शास्त्रज्ञांनी गणित, ज्योतिष व वैद्यक या शास्त्रांत खूप संशोधन करून मोलाची भर घातली होती. अरबांनी अनेक ग्रीक व संस्कृत ग्रंथांचीं भाषांतरें केलीं होतीं व त्यांचा सूक्ष्म अभ्यास केला होता. त्यांना शास्त्रसंशोधनाची प्रेरणा त्यामुळे मिळाली होती. पण यामुळे अरबांच्या संशोधनाला विज्ञानेतिहासांत फारसे महत्त्व नाही, असें म्हणणें योग्य नाही. अंकगणित व त्रिकोणमिति यांतील अरबांचें संशोधन अत्यंत मौलिक आहे. प्रा. जॉर्ज सार्टन् (हॉवर्ड विद्यापीठ) यांनी या विषयीचें संपूर्ण विवेचन करून हा निर्णय दिला आहे आणि ग्रीक व संस्कृत ग्रंथांची व पुढे चिनी ग्रंथांची भाषांतरें अरबांनी केली, यांत कमीपणाचें कांही नसून, ज्ञानाच्या हव्यासाने अरब लोक किती प्रेरित झाले होते तेंच त्यावरून दिसतें आणि म्हणून ते भूषणावहच आहे, असें म्हटलें आहे. (मिड् ईस्ट, वर्ल्ड सेंटर, पृष्ठ २७५). पहिला नामांकित अरब वैद्य हारेट्स बिन कलदाह हा पैंगंबरांचा समकालीन असून, धर्माने ख्रिस्ती होता. तरी पण, पैगंबरांनी त्याला स्वतःचा खासगी वैद्य नेमले व खलिफा अबुबकर याजजवळ त्याची शिफारसहि केली. अशा रीतीने अगदी आरंभापासून वैद्यकशास्त्राला सांप्रदायिक बंधनांपासून अलिप्त ठेवण्यांत आलें होतें.
 आपल्या दृष्टीने महत्त्वाची म्हणजे शेवटची गोष्ट होय. पैगंबरांच्या ठायीं पिसाट धर्मांधता नव्हती. शास्त्राच्या बाबतींत ते धर्मभेद मानीत नसत, असे यावरून स्पष्ट दिसतें. प्रारंभीच्या खलिफांचीहि अशीच दृष्टि होती. त्यामुळेच ग्रीक व संस्कृत ग्रंथांची भाषांतरें अरब पंडित करूं शकले. आणखी एक गोष्ट लक्षणीय आहे. युरोपांत विज्ञान- संशोधकांना धर्मसत्तेशी सतत संग्राम करावा लागला. तसा अरब पंडितांना करावा लागला नाही. यावरून त्या काळचे मुस्लिम सत्ताधारी व मौलवी यांना विद्येच्या क्षेत्रांत धर्म-वर्चस्व स्थापित करावें, धर्माच्या नांवाखाली अंध बंधनें शास्त्रज्ञांवर घालावी अशी बुद्धि नव्हती, हेंच दिसून येतें. असें वातावरण असल्यामुळेच गणित, वैद्यक व ज्योतिष या शास्त्रांत अरब संशोधक