पान:इहवादी शासन.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मुस्लिम देश । ७५
 

समाधिअवस्थेत प्राप्त झालेलें ज्ञान जोंपर्यंत तेवढ्याच विषयांत आपला अधिकार सांगते तोंपर्यंत धर्मवर्चस्वाचा फारसा घातक परिणाम होत नाही. पण असें सहसा घडत नाही. अध्यात्मज्ञानी धर्मवेत्ते पुरुष आपल्याला इहलोकच्या व्यवहाराचेंहि संपूर्ण ज्ञान आहे, असा दावा सांगतात व तेथेहि सत्ता चालवू पाहतात. इस्लाममध्ये कित्येक शतकें खलिफा व सुलतान हे एकच होते याचा अर्थ हाच होता. ख्रिश्चन धर्मांत पोप हा प्रत्यक्ष राजा नव्हता. पण सर्व राजे, महाराजे, सम्राट् यांवर त्याची अधिसत्ता होती. धर्मपीठाला परलोकाप्रमाणेच इहलोकीच्या व्यवहारावर सत्ता चालविण्याचा अधिकार आहे, हीच या मागली भूमिका आहे. लोकांच्या अंधधर्मश्रद्धेमुळे ही धर्मपीठाची भूमिका जेव्हा मान्य केली जाते तेव्हा मानवी कर्तृत्वाचा नाश होऊन समाज रसातळाला जातो. कारण अतींद्रिय धर्मवर्चस्वामुळे (आंतल्या आवाजाला प्रामाण्य दिल्यामुळे) बुद्धि, प्रज्ञा, निष्कर्ष-शक्ति अवलोकन-दृष्टि या मनुष्याच्या शक्ति मारल्या जातात.
 'एंडलेस-क्वेस्ट' (थ्री थाउजंड इयर्स ऑफ सायन्स) या आपल्या ग्रंथांत श्री. वेस्टवे या इतिहासकाराने युरोपच्या कर्तृत्वाचा इतिहास दिला आहे. पंधराव्या शतकापासून विसाव्या शतकाच्या प्रथमार्धापर्यंत गणित, पदार्थविज्ञान, रसायन, जीवशास्त्र, स्थापत्य, समुद्रपर्यटन, भूसंशोधन, वैद्यकविद्या इत्यादि मानवी कर्तृत्वाच्या सर्व शाखांतील कर्त्या पुरुषांचीं नांवें व त्यांचें कार्य यांचा त्याने परिचय करून दिला आहे. तीं नांवें पाहिलीं म्हणजे इहवाद व कर्तृत्व यांमध्ये किती निश्चित कार्यकारणभाव आहे हें दिसून येतें. पश्चिम युरोपांतील इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्वित्झर्लंड, स्वीडन, हॉलंड, डेन्मार्क या देशांत पोपच्या धार्मिक सत्तेविरुद्ध तेराव्या-चौदाव्या शतकांतच शास्त्रवेत्त्यांनी संग्राम सुरू केला होता आणि त्यामुळे धर्माचें अंधवर्चस्व हळूहळू ऱ्हास पावूं लागलें होतें. त्यामुळे या देशांत मानवी कर्तृत्वाला पुढील चार शतकांत अगदी बहर येऊन बेकन, शेक्सपिअर, पास्कल, डेकार्टस्, लूथर, कोपरनिकस, केप्लर, मायकेल एंजलो, गॅलिलिओ, राफेल, कोलंबस, इरॅसमस्, वास्को द गामा, पॅरासेलस, न्यूटन, लिबनिट्झ, लिओनार्डो द व्हिन्सी, पाश्चर, मेरी क्युरी, डार्विन, लाप्लास इत्यादि थोर पुरुष निर्माण झाले. पण त्याच काळांत युगोस्लाव्हिया, बल्गेरिया, रुमानिया, पोलंड, रशिया, ग्रीस, अल्बानिया या पूर्व युरोपांतील देशांत याच्या एकशतांशहि कर्ते पुरुष उदयास आले नाहीत. कारण या काळांत या देशांवर ऑर्थोडॉक्स चर्चचें अंध वर्चस्व होतें, अधिसत्ता होती आणि त्या सत्तेविरुद्ध संग्राम करण्यास तेथे कोणीच उभा ठाकला नाही. या देशांतील नावें या कर्तृत्वाच्या इतिहासांत एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धांत दिसूं लागतात. त्या वेळीं तेथे बुद्धिस्वातंत्र्याचा संग्राम सुरू झाला होता. यावरून 'भावे भाव: अभावे अभावः।' इतक्या निश्चितपणें हा कार्यकारणभाव सिद्ध होतो, असें दिसेल.