पान:इहवादी शासन.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७४ । इहवादी शासन
 

तेलामुळे तेथे समृद्धि आली आहे आणि धरणे बांधून झाल्यावर राजाने पाण्याखालची जमीन अनेक शेतकऱ्यांना, प्रत्येकीं चाळीस एकर, या प्रमाणांत वांटून दिली आहे.
 या शेतकऱ्यांपैकी एक अलवी अबूद हा जमिनीचें मालकीपत्र हाती येतांच म्हणाला, "माझे आजोबा, बाप आणि मी आजपर्यंत दुसऱ्याची जमीन कशीत आलों. आम्ही पिढ्यान् पिढ्या कर्जबाजारी व भुकेलेच राहिलों. आता मी, माझा मुलगा स्वतःची जमीन कसूं व पिकवू." सौदी अरेबियाचा सध्याचा राजा फैजल हा १९६४ सालीं गादीवर आला. मुलींची शाळा काढण्यासाठी त्याने लष्कर पाठविलें हा उल्लेख वर आलाच आहे. त्याच्या आधी त्याचा भाऊ राजा सौद हा जुन्या परंपरेंतला सुलतान होता. तेलापासून सहज दरसाल पांच-सहाशे कोटि रुपये मिळत असूनहि तो सदा कर्जबाजारीच असे. गरीब शेतकरी, कामगार इतके त्रासून गेले की, देशांत बंड होण्याची वेळ आली. तेव्हा त्याला पदच्युत करून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फैजलला गादीवर आणले. त्याने शिक्षण, धरणें, कारखाने यांवर लक्ष केंद्रित करून सर्व भांडवल त्यांत ओतण्यास सुरुवात केली. आणि इतकें करूनहि दरसाल दीडशे कोटि रुपये शिल्लक राहतात.
 राष्ट्रनिष्ठा, जनताभिमुखता, समता, लोकशाही, सामाजिक न्याय, धनाचें न्याय्य वाटप, बुद्धिप्रामाण्य, मानवता या तत्त्वांचे कांही संस्कार झालेले लोकच सध्या मुस्लिम देशांत सत्तारूढ आहेत. धर्म हा परिवर्तनीय आहे, देशकालानुरूप धर्मवचनांचा नवा अर्थ लावण्यास इस्लामचा विरोध नाही, राजशासन सर्वंकष धर्मसत्तेपासून मुक्त असलें पाहिजे, ही नवी पाश्चात्त्य विचारसरणी त्यांना मान्य असल्यामुळे ते स्वदेशाची प्रगति करूं शकले व करूं शकतील. ही विचारसरणी म्हणजेच इहवाद. त्याचा अवलंब करणें सध्याच्या काळीं तरी कसें अपरिहार्य आहे याचीं या मुस्लिम देशांच्या इतिहासावरून कल्पना येईल.


 मानवी कर्तृत्वाचा उगम बुद्धिस्वातंत्र्य, वुद्धिप्रामाण्य, स्वतंत्र चिंतन, अवलोकन, अनुभव, कार्यकारणभावावरील विश्वास आणि या सर्वांवरून निष्कर्ष काढण्याची, सिद्धान्त स्थापण्याची शक्ति यांतून होत असतो. आणि बहुधा मानवाच्या या सर्व शक्ति धर्मवर्चस्वामुळे विकल होतात, मारल्या जातात. कारण धर्माचे सिद्धान्त हे अंतर्ज्ञान, दिव्य दृष्टि, ग्रंथवचनें, देववाणी, साधुसंतांचीं, चरित्रे- त्यांचें आचरण, उद्गार- यांवर आधारलेले असतात. धर्माचें उद्दिष्ट आत्मा, परमात्मा, मोक्ष, अध्यात्म, परलोक या विषयीचें ज्ञान प्राप्त करून घेऊन लोकांना त्याच्या आधारें मुक्तिमार्ग दाखवून देणें हें असतें, आणि अंतर्दृष्टीने