पान:इहवादी शासन.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मुस्लिम देश । ७३
 

हुसेनचा पिता अली याच्याशीं कांही लोकांनी नाते जोडलें व ते आपणांस सय्यद म्हणवू लागले.

विषमतेला मान्यता

 अशा रीतीने पैगंबरांच्या आज्ञा निःसंदेहपणें विरुद्ध असतांना मुस्लिम समाजांत अतिशय कड़वी विषमता प्रारंभापासूनच रूढ झाली. कांही खलिफा क्वचित् केव्हा समतेचा पक्ष घेत. पण तें अपवादात्मक. खलिफा उमर याने प्रारंभीचे मुस्लिम व नंतरचे मुस्लिम असा भेद करून युद्धांतल्या लुटीचा वांटा नंतरच्या मुस्लिमांना कमी प्रमाणांत देण्याचा शिरस्ता पाडला. कांही मुस्लिम अधिकाऱ्यांनी मुस्लिमेतर लोकांवर लादावयाचा जो जिझिया कर, तो धर्माज्ञा उल्लंघून, अरबेतर मुस्लिमांवरहि लादला. ही जी प्रारंभींच विषमता निर्माण झाली तिला कुराणावर भाष्य लिहिणारा पहिला धर्मपंडित जो अबू हानिफ त्याने आपल्या भाष्यांत स्वच्छ मान्यता दिली. पहिली श्रेष्ठ जात म्हणजे कुरेशी. दुसरी राहिलेल्या अरबांची. (म्हणजे अरबांतहि विषमता). त्यानंतर अरबेतर मुस्लिम. त्यांतहि ज्यांच्या दोन पिढ्या मुस्लिम असतील तो श्रेष्ठ, इतर कनिष्ठ असे तपशीलवार जातिभेद त्याने करून ठेवले. आणि ते कांही अंशी आजतागायत चालू आहेत. (सोशल स्ट्रक्चर ऑफ् इस्लाम– प्रा. लेव्ही, केंब्रिज विद्यापीठ, प्रकरण पहिलें).
 मुस्लिम पंडित विश्व- मुस्लिम- वादाचा पुरस्कार करतात. पण तो प्रत्यक्षांत कधीहि आलेला नाही. इतकेंच नव्हे, तर गेली चाळीस-पन्नास वर्षे सिरिया, इराक, जॉर्डन, येमेन इत्यादि अरबस्थानांतील सर्व देश एकत्र करण्याचे प्रयत्न चालू आहेत, त्यांनाहि यश येत नाही. इराकचें राजघराणें हाशमाईट आहे व सौदी अरेबियाचें सौदी आहे. त्यांच्यांत हेवेदावे- मत्सर हे सर्व असल्यामुळे आणि त्याचप्रमाणे सर्व मुस्लिम एक ही भावना अगदी दुबळी असल्यामुळे अखिल अरेबिया सुद्धा एक होऊं शकत नाही. मुस्लिम समाजांत जन्मजात उच्चनीचतेचा प्रभाव हा असा आहे.
 जन्मनिष्ठ उच्चनीचतेबरोबर आर्थिक विषमता ही अपरिहार्यपणे येतेच. जमिनी, व्यापार हीं सर्व धनसाधनें उच्च जातींचे लोक ताब्यांत घेतात आणि हीन जातीय शतकानुशतकें नागविले जातात. सुदैवाने आता अरब देशांत व इराण- मध्ये तेलाचीं कुंडें सापडली आहेत आणि त्यांतून अमाप धन त्या देशांना मिळत आहे. दुसरें सुदैव हें की, बहुतेक सर्व देशांत नवी इहवादी, उदारमतवादी दृष्टि असलेले लोक सत्तारूढ झालेले आहेत. त्यामुळे या नव्या धनाचें वांटप ते जनतेच्या सुखसोयींच्या, शिक्षणाच्या उन्नतीच्या दृष्टीने करीत आहेत. इराणच्या शहाने जमीनदारांचे हक्क रद्द करून कोटि-सव्वा कोटि शेतकऱ्यांना जमिनी वांटून दिल्या आणि शेतकऱ्यांना शास्त्रीय शेतीसाठी अवश्य तें कर्जहि दिलें. इराकमध्ये वर्षभर जमीन कसल्यानंतर शेतकऱ्याला उत्पन्नाचा आठवा हिस्साच मिळत असे. आता