पान:इहवादी शासन.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७२ । इहवादी शासन
 

आहे. म्हणून तो फक्त कुराण मानतो. आणि त्याच्या आधारेंच सांगतो की, "स्त्रीला सर्व क्षेत्रांत कुराणाने समहक्क दिलेले आहेत. या दृष्टीने स्त्री-पुरुष असा भेद कुराण करीत नाही." (रोझेंथाल, पृष्ठे १६८, ६९, २०८).
 इजिप्तमधील शरीयत न्यायालयाचा न्यायाधीश शेख अली अब्दुल रझेक याचें तर मत असें आहे की, "मुस्लिम कायदा हा मनुष्याच्या खाजगी वैयक्तिक आचाराचाच फक्त धर्म सांगतो. सामाजिक व्यवहार हा त्याचा विषयच नाही. तेव्हा स्त्रीला पूर्ण मुक्त करून तिला समहक्क देण्यास कांहीच हरकत नाही." हें अवतरण देऊन हॅनस कोहन म्हणतो की, "शेख रझेक याची हीं मतें म्हणजे इजिप्तमध्ये सुरू झालेल्या इहवादी विचारसरणीची तर्कप्राप्त परिणति होय. (नॅशनलिझम इन् द ईस्ट, पृष्ठ २१८).
 इतर मुस्लिम सामाजिक जीवनाची कथा स्त्रीजीवनासारखीच आहे. इस्लाममध्ये श्रेष्ठ-कनिष्ठता नाही, विषमता नाही, जन्माने किंवा धनाने कोणी मोठा किंवा लहान होत नाही, अशी स्वच्छ कुराण- वचनें आहेत. पण पैगंबरांच्या मृत्यूनंतर थोड्याच वर्षांत मुस्लिम समाजांत विषमता थैमान घालू लागली. पैगंबर कुरेशी जमातीचे होते. तेव्हा त्या जमातीचे लोक स्वतःला श्रेष्ठ मानूं लागले. पुढे अरबांनी इजिप्त, इराण, तुर्कस्थान इ. देश जिंकले तेव्हा सर्व अरब त्या देशांतील मुस्लिम झालेल्या लोकांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ मानूं लागले. अरबेतर मुस्लिमांना ते मवाली म्हणत आणि त्यांना इतके हीन लेखीत की, रस्त्यांत त्यांच्यावरोवर चालणें सुद्धा त्यांना कमीपणाचें वाटे. इराण, तुर्कस्थान येथील अनेक लोक इस्लाम धर्माचे मोठे पंडित झाले, धर्मशास्त्रज्ञ झाले; पण अरब लोक त्यांना हीनच लेखीत.
 खलिफा उमर याला हा भेद फारसा मंजूर नव्हता. म्हणून त्याने दोन मवाली गृहस्थांना उच्चाधिकारपदी नेमलें; पण त्याविरुद्ध फार भयंकर ओरडा झाला. पुढे पुढे अरबेतर मुस्लिम या छळाला अत्यंत कंटाळून गेले आणि तो चुकविण्यासाठी अनेक युक्त्या योजूं लागले. अनेकांनी खोट्या वंशावळी तयार करून आपले पूर्वज अरब होते असा पुरावा तयार केला. अनेकांनी धर्मग्रंथांत भर घालून पैगबरांच्या मुखीं नवीं वचने घालून, अरबेतर हे अरबांइतकेच श्रेष्ठ आहेत, असा आधार निर्माण केला. नवव्या शतकांत याकुबी याने पैगंबरांचें चरित्र लिहिलें, त्यांत त्यांच्या तोंडीं जीं वचनें घातली आहेत, तीं त्याच्या आधी इब्न हिशम व वाकुदी यांनी लिहिलेल्या चरित्रांत सापडत नाहीत, हें ध्यानांत घेण्याजोगें आहे. पण या युक्त्यांचा फारसा उपयोग झाला नाही. विषमता वाढतच गेली. महंमद पैगंबर मक्केहून मदिनेला गेले तेव्हा त्यांच्या सोबत जे लोक गेले त्यांचे वंशज स्वतःला श्रेष्ठ समजूं लागले. मदिनेला ते गेल्यावर त्यांना तेथले जे लोक मिळाले त्यांच्या वंशजांनी असाच दावा मांडला. इराणमधील राजकन्येशीं पैंगंबरांचा नातू हुसेन याने लग्न केलें होतें, म्हणून तेथील लोक उच्चपदीं गेले