पान:इहवादी शासन.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मुस्लिम देश । ७१
 

प्रत्येकाला असल्यामुळे, या सुधारणा करण्यांत आपण इस्लामविरोधी कांही करीत आहों, असें मानण्याचें कारण नाही.
 अर्थात् सुधारकांच्या या विचारसरणीला कोणी विरोध केलाच नाही, असें नाही. जीर्णमतवादी मौलवींनी तिला कसूनं विरोध केलाच. पण शिवाय नवविद्या- संपन्नांनीहि पुष्कळ वेळा तसाच कडवा विरोध केल्याचें आढळतें. हीं मतमतांतरें आणि त्यांतील संघर्ष आपण पाहिले तर इहवादाची वाटचाल कशी होते तें दिसून येईल. रशीद रिडा या इजिप्शियन पंडिताचा निर्देश वर आलाच आहे. त्याच्या मतें स्त्रीला समान हक्क देणें हें कुराणाच्या विरुद्ध आहे. कुराणांतील सुरा २-२२८ यांत तसे हक्क दिलेले आहेत. पण 'पुरुष नेहमी एक पायरी वरच असतो, स्त्रीच्या कल्याणासाठीच अल्लाने त्याला श्रेष्ठ केलें आहे' इत्यादि वचनांच्या आधारें, स्त्री-पुरुषसमता पैगंबरांना संमत नव्हती, असे तो म्हणतो. महंमद गझालीचें असेंच मत आहे. तो म्हणतो, "स्त्रीला शिक्षण देण्यास हरकत नाही; पण तिला राजकीय क्षेत्रांत किंवा इतर सार्वजनिक व्यवहारांत प्रवेश करूं देणें योग्य नाही. कारण ती ऐपत तिला नाही. स्टॅलिन, मोलोटोव्ह यांच्या तोडीची एक तरी स्त्री आतापर्यंत झाली आहे काय ? स्त्रीला न्यायालयांत साक्ष देण्याचाहि अधिकार नाही. मग ती न्यायाधीश कशी होऊ शकेल ? परमेश्वराने आतापर्यंत पृथ्वीवर जे प्रेषित धाडले ते सर्व पुरुष होते हा केवळ योगायोग नाही. त्यांतील भावार्थ स्पष्ट आहे" (रोझेंथॉल पृष्ठे ७२, ११२). इजिप्तचा मुफ्ती शेख माकलूफ याने १९५५ सालीं एक फतवा काढुन जाहीर केलें की, "इस्लामी कायदा पाहतां स्त्रीला मतदानाचा किंवा लोकसभासदत्वाचा हक्क द्यावा असें म्हणण्यास कोणताहि आधार नाही."

कुराणाचा आधार

 अर्थात् याच्या विरुद्ध पक्षाच्या लोकांनी कुराण व सुन्ना यांच्याच आधारें स्त्रीला हे सर्व हक्क आहेत, असें प्रतिपादन केलें आहे. अल्लाल अलफासी हा मोरोक्कोमधील एक मोठा राजकीय नेता आहे. इस्लाम धर्मशास्त्र व अर्वाचीन भौतिकविद्या यांत तो सारखाच पारंगत आहे. बहुभार्यात्व हें त्याच्या मतें कायद्याने बंद केलेच पाहिजे; त्याचप्रमाणे पुरुषाला दिलेले घटस्फोटाचे वारेमाप अधिकार हेहि रद्द करणें अवश्य आहे; या आपल्या मतांना तो शरीयतचाच आधार देतो. तो म्हणतो, "शरीयत हा इस्लामी कायदा कोणत्याहि काळाला व परिस्थितीला सुयोग्य असाच आहे. मात्र त्याचा दर वेळीं उदार दृष्टीने नवा नवा अर्थ लावला पाहिजे." पाकिस्तानांतील जी. ए. परवीज हा पंडित पुरोगामी व उदारमतवादी आहे. तो कुराणाखेरीज कोणताच ग्रंथ मानीत नाही. सुन्ना हा पैगंबरांच्या चरित्रावरूनच रचलेला आहे. पण त्याच्या मतें नंतरच्या धर्मपंडितांनी त्यांत भर टाकली