पान:इहवादी शासन.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७० । इहवादी शासन
 

नाही, पण त्याचा विरोध मात्र कमी झाला नाही. शेवटी फैजलला त्या गावीं लष्कर पाठवून शाळा स्थापावी लागली. सुदैवाने लष्कर पाहून लोकांनी विरोध मागे घेतला आणि पुढे लवकरच त्यांचे मत पालटलें व त्यांनी ही शाळा पुरत नाही, दुसरी काढावी अशी मागणी केली.

पश्चिमीकरणाचा ध्यास

 राजा फैजल याने युरोपांत पुष्कळ प्रवास केलेला असून, त्याचीं मतें अत्यंत पुरोगामी आहेत. त्याची राणी एफात ही तशीच बहुश्रुत आहे. स्त्रीदास्य-विमोचनाच्या चळवळींत ती सदैव अग्रभागी असते. इराणच्या शहाला आपल्या देशाचें पश्चिमीकरण करण्याचा असाच ध्यास लागला आहे. प्रत्येक खेड्यांत शाळा असलीच पाहिजे, असा त्याचा कटाक्ष आहे. विवाह, घटस्फोट यासंबंधीचे जुने कायदे त्याने बदलून टाकले आहेत. तेथील एक विदुषी सौ. एफात ही अभिमानाने सांगते की, "पूर्वी आम्ही बुरखा घेत होतों. आता आमच्या लोकसभेंत सहा स्त्रिया आहेत. सर्व क्षेत्रांत, उद्योगांत, व्यवसायांत आम्हांला मुक्त प्रवेश असून, तेथे आम्हांला पुरुषांच्या इतकेंच वेतन मिळते. पाश्चात्त्य देशांतहि अजून स्त्रियांन हा न्याय मिळालेला नाही." इराणचा शहा फ्रेंच व इंग्लिश उत्तम जाणतो. 'मिशन टु माय कंट्री' व 'व्हाइट रेव्होल्यूशन' असे दोन ग्रंथहि त्याने लिहिले आहेत. गेल्या वर्षी मयूरसिंहासनावर आरूढ होतांना त्याने स्वहस्तें आपली राणी फराहा हिच्या मस्तकावरहि मुगुट ठेवला. अशी गोष्ट इराणी साम्राज्यांत अडीच हजार वर्षांत घडली नव्हती. मुस्लिम जगतांतील स्त्रीजीवनांतील क्रांतीची ती निदर्शक आहे.
 पाकिस्तानांतहि अशीच क्रांति झालेली आहे. बेगम शहानवाज व बेगम इक्कामुल्ला या तेथील लोकसभेच्या सभासद असून, या सुधारणांत अधार्मिक व विरोधी कांहीहि नाही, असें त्या अट्टाहासाने सांगतात. आयुबखानाने १९६१ सालीं कायदे करून 'ऑल पाकिस्तान विमेन्स असोसिएन'ने सुचविलेल्या बहुतेक सुधारणा अमलांत आणल्या आहेत. भारतांतील मुस्लिम स्त्रिया मात्र अजुन हजार वर्षांपूर्वीच्या स्थितींतच आहेत. कारण येथल्या इहवादी पुरोगामी शासनाला त्यांना मुक्त करतील असे कायदे करण्याचें सामर्थ्य नाही. स्त्रीजीवनांत हे जे क्रांतिकारक बदल मुस्लिम देशांनी घडवून आणले आहेत त्यासाठी तुर्कस्थानचा अपवाद सोडतां बहुतेकांनी कुराण, सुन्ना व शरियत यांचेच आधार घेतले आहेत. त्यांच्या मतें पैगंबरांच्या काळी व नंतर दोन- तीनशे वर्षे स्त्रीजीवनावर आतासारखी जाचक बंधने नव्हती. पुढील काळीं तीं कुराणाच्या भाष्यकारांनी व मुल्ला-मौलवींनी जारी केलेली आहेत. पण या नव्या काळांत परिस्थितीप्रमाणे मूळ ग्रंथाचा नवा अर्थ लावण्याचा अधिकार