पान:इहवादी शासन.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मुस्लिम देश । ६९
 

प्रथमच भाग घेऊं लागल्या. प्रथमच त्या घराबाहेर पडून सभेंत येऊन भाषणें करूं लागल्या. पडदा, बुरखा व कुटुंबांतील इतर बंधनें त्या काळी इतकी कडक होती की, त्यांचा भंग केला तर पोलिस खटला करीत असत. पण तुर्की स्त्रियांनी हा धोका पत्करूनहि समाजकार्यात उडी घेतली. हलिदे हनूम या विदुषीने तर केवळ पुरुषांच्याच सभेंत जाऊन भाषण करण्याचें धाडस केलें. मात्र या वेळी तिने बुरखा घेतला होता. पण लवकरच त्याविरुद्ध चळवळ करून, व्याख्यानें व लेख यांद्वारा लोकजागृतीस तिने प्रारंभ केला. त्यासाठी संस्थाहि स्थापन केल्या व स्त्रियांचीं म्हणून निराळी वृत्तपत्रेहि काढली. १९१३ साली कॉन्स्टांटिनोपल येथे पहिली मुलींची शाळा स्थापन झाली आणि लवकरच स्त्रियांना विद्यापीठांत ज्ञानाच्या सर्व शाखांत प्रवेश मिळू लागला. दोस्तांच्या सैन्याचा पराभव करून १९२३ सालीं केमाल अतातुर्क याने स्मर्ना शहरांत प्रवेश केला तेव्हा तेथील स्त्रियांच्या सभेंत त्याने पुढीलप्रमाणे भाषण केलें : "आम्ही आता शत्रूवर निर्णायक विजय मिळविला आहे. पण तुम्ही आमच्या साह्याला आता आला नाहीत; तर त्या विजयाला अर्थ राहणार नाही. तुम्ही लोकशिक्षण हातीं घ्या, त्या क्षेत्रांत विजय मिळावा, ती देशसेवा आमच्या सेवेपेक्षा जास्त महत्त्वाची आहे. यापुढे स्त्रियांनी तुर्कस्थानच्या सामाजिक जीवनांत भाग घेतला नाही, त्यांनी आपल्या सामाजिक रूढि आमूलाग्र बदलल्या नाहीत, तर आपली प्रगति होणार नाही. सुधारणेच्या क्षेत्रांत आपल्याला पश्चिमेची बरोबरी करतां येणार नाही."
 अतातुर्क याची पत्नी लतिफे हनूम ही त्याची खरी सहधर्मचारिणी होती. बुरखा टाकून देऊन ती पतीबरोबर प्रत्येक ठिकाणी जात असे व स्त्रीदास्य- विमोचनाच्या सर्व चळवळींत जातीने भाग घेत असे. लवकरच तुर्की लोकसभेने कुटुंब, विवाह, घटस्फोट यांसंबंधीचे जुने कायदे रद्द करून तुर्की स्त्रीला सर्व जीर्ण धर्मबंधनांतून मुक्त केलें.
 इजिप्त, सिरिया, इराक, सौदी अरेबिया, इराण या देशांत थोड्याफार फरकाने स्त्रियांच्या मुक्तीची अशीच चळवळ चालू झाली होती. आणि याच मार्गाने तिची प्रगति होत होती. कोठे तिचा वेग जास्त होता, कोठे कमी होता. पाश्चात्त्य विद्या जेथे लवकर पोचली तेथे वेग जास्त होता. उशिरा पोचली तेथे तो कमी होता. सौदी अरेबिया हा देश मागासलेला आहे. १९६३ साली तेथील बुरादिया या गावी मुलींची शाळा काढण्याचें राजा फैजल याने ठरविलें; पण मुलींनी शिकणे पाप आहे, असें त्या वेळी सुद्धा गावच्या नागरिकांचें मत होतें. त्यामुळे ही वार्ता ऐकून ते अत्यंत भडकून गेले व त्यांनी फैजलकडे एक शिष्टमंडळ पाठविलें. राजाने त्यांना सांगितलें की, "मुलींच्या शिक्षणाविरुद्ध कुराणांतून एक तरी वाक्य मला काढून द्या." शिष्टमंडळाला तसें वाक्य सापडलें