पान:इहवादी शासन.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रस्तावना


 १९४७ सालीं भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि नंतर येथे इहवादी शासन- सेक्युलर गव्हर्मेंट- स्थापन झाले. आपल्या घटनेत सेक्युलर हा शब्द वापरण्यांत आला नाही. पण आपले शासन इहवादी आहे, तशी आपली प्रतिज्ञाच आहे, असें पंडितजींनी व इतर अनेक काँग्रेस नेत्यांनी वेळोवेळी स्पष्ट केलें आहे.
 सेक्युलर गव्हर्मेंट याला मराठींत निधर्मी शासन असा शब्द रूढ झाला आहे. कोणत्याहि धर्मांत हस्तक्षेप न करणारे, सर्व धर्माना निःपक्षपाताने वागविणारें सरकार, असा त्याचा अर्थ लोकांमध्ये केला जातो. धर्मातीत शासन असाहि शब्द त्याच अर्थाने वापरला जातो. पण हा अर्थ बरोबर नाही. इहवादाचा अर्थ यापेक्षा फार फार व्यापक आहे, त्याच्या अभ्यंतरांत फार मोठी तत्त्वें समाविष्ट झालेलीं आहेत, आणि त्या तत्त्वांचे संस्कार लोकांच्या मनावर अखंडपणें, सातत्याने झाल्यावांचून शासन इहवादी करण्यांत कोणत्याहि समाजाला यश येणार नाही.
 सेक्युलर या शब्दांतील भावार्थाची परंपरा फार जुनी आहे. "सीझरचा भाग सीझरला द्या व देवाचा भाग देवाला द्या." हें त्याविषयीचें वचन प्रसिद्धच आहे. इहलोक व परलोक हीं भिन्न क्षेत्रे आहेत आणि त्यांवर भिन्न सत्ता चालाव्या, एकाच सत्तेखाली दोन्ही क्षेत्र असू नयेत, असा त्याचा भावार्थ आहे. खिश्चन धर्माच्या उदयाच्या वेळचा हा विचार आहे.
 पण रोमच्या पीठावर पोपची सर्वंकष सत्ता स्थापन झाल्यावर हा सुविचार लोप पावला आणि धर्मपीठाची सत्ता मानवाच्या ऐहिक व पारलौकिक दोन्ही जीवनांवर चालावी असा रोम-पीठाने आग्रह धरला व जनतेची श्रद्धा त्या पीठावर असल्यामुळे तो दीर्घकाळ यशस्वी झाला. पण तेराव्या-चौदाव्या शतकांत राष्ट्रभावनेचा उदय झाला व पश्चिम युरोपांतील देशांच्या राजांना पोपची सत्ता असह्य वाटूं लागली. तेव्हा पोप व हे राजे यांच्यांत संघर्ष होऊन, अखेर पोपला नमावें लागलें. ऐहिक जीवनावरची सत्ता त्याला सोडावी लागली. 'सेक्युलॅरिझम' ही राज्यसंस्थेने धर्मसंस्थेपुढे मांडलेली एक व्यवहारी तडजोड आहे, असें या घटनेचें वर्णन कोणी करतात. तो अर्थ कांहीसा बरोबर आहे. पण कांहीसाच. असें म्हणण्याचें कारण असें की, ही तडजोड वस्तुतः पोप व राजे यांच्यांत होती, धर्मसंस्था व राज्यसंस्था यांच्यांत नव्हती. राष्ट्रभावना उदित झाल्यावर राजांनी पोपची सत्ता झुगारून दिली, धर्माची नव्हे. पश्चिम युरोपांतील बहुतेक सर्व देशांत पुढे दीर्घकालपर्यंत धर्मसंस्थेची सत्ता चालूच होती. त्यानंतर ग्रीक विद्येचा अभ्यास सखोल होऊ लागला, तिच्यांतील तत्त्वांचा लोकांत प्रसार होऊ लागला, त्यामुळे विज्ञानाचा उदय झाला आणि मग हळूहळू धर्मसत्तेचें बळ कमी होऊन सेक्युलॅरिझम- इहवाद-