पान:इहवादी शासन.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मुस्लिम देश । ६७
 

धर्म, शासन, ज्ञानपीठें या संस्था मानवासाठी आहेत, मानव त्यांच्यासाठी नाही, हा विचार पुन्हा एकदा प्रस्थापित झाला. प्राचीन काळीं ग्रीकांनी तो मांडला होता. पण ख्रिस्ती धर्माच्या प्रसारानंतर त्याचा लोप झाला होता. या संस्था परमेश्वराने निर्मिल्या असून मानवाने अंग संकोचून त्यांत कोठे वसतां आलें तर वसावें, असें तत्त्वज्ञान त्या काळी रूढ होतें. पण ग्रीक विद्येचें चौदाव्या- पंधराव्या शतकांत पुनरुज्जीवन झालें तेव्हा तो विचार पुन्हा उसळून वर आला व पाश्चात्त्य जगांत त्याने चांगलेच मूळ धरल्यामुळे तेथे राष्ट्रसंघटना प्रबल होऊन त्यांची प्रगति झपाट्याने झाली.
 मुस्लिम समाजांत प्रबोधनयुगांतील हे तत्त्व केव्हाच उदय पावलें नाही व प्रभावी झालें नाही. आरंभीच्या दोन शतकांत त्या समाजांत समता कांही अंशीं नांदत होती. पण लोकशाही, व्यक्तिवाद, मानवी स्वातंत्र्य हीं तत्त्वें तेथे कधीच प्रस्थापित झाली नव्हती. खलिफांची अरबस्तानांत कधी निवड होत नसे व त्यांची सत्ताहि अनियंत्रित असे. पुढल्या काळांत समताहि संपुष्टांत आली. अशा स्थितीत तेथे मानव हें अंतिम मूल्य, मानव हा विश्वाचा मध्यबिंदू हा विचार उद्भवणेंहि शक्य नव्हतें. मग तो प्रभावी होणे दूरच. व्यक्तिस्वातंत्र्य, विवेकस्वातंत्र्य, बुद्धिप्रामाण्य हीं तत्त्वें मुस्लिम देशांत पाश्चात्त्य विद्येच्या आगमनानंतर प्रसृत झाली आणि अजूनहि तेथे तीं दृढमूल झालेली नाहीत, असेंच वरील विवेचनावरून दिसून येईल. पण हे क्रांतिकारक विचार त्या समाजांत शिरले आहेत व हळूहळू जीर्णमतवादाला पोखरून ते त्याला ढिला करीत आहेत, यांत मात्र शंका नाही.

राष्ट्रधर्माची दीक्षा

 त्यांतील इजिप्त, सिरिया, तुर्कस्थान या देशांत हें क्रांतिकारक तत्त्वज्ञान जनतेंत रुजविण्याचें कार्य करणारा सुशिक्षित मध्यमवर्गहि निर्माण झाला आहे. समाजाला राष्ट्रधर्माची दीक्षा देण्याचें कार्य प्रामुख्याने हाच वर्ग करीत असतो. कारण त्या धर्माचें तत्त्वज्ञान सिद्ध करणें व त्याचा प्रसार करणें यास जो विद्याभ्यास, जें पांडित्य लागतें तें याच वर्गाजवळ असतें. किंबहुना तें ज्याच्याजवळ असतें तो मध्यमवर्ग. या वर्गावांचून राष्ट्रसंघटना यशस्वी होऊं शकत नाही. जॉन गुंथर याने 'इनसाईड लॅटिन अमेरिका' या आपल्या ग्रंथांत मेक्सिको, चिली, पेरू इत्यादि देशांत राष्ट्रसंघटना यशस्वी न होण्याचें कारण मध्यमवर्गाचा अभाव हेंच दिलें आहे. लॉर्ड ॲक्टन याने मेक्सिकोवरील आपल्या निबंधांत हेंच मत मांडलें आहे.
 तेव्हा ज्यांना राष्ट्र घडवायचें आहे त्यांनी व्यक्तिवाद व त्यावर अधिष्ठित असलेलें जनतेचें सार्वभौमत्व हें मान्य केलें पाहिजे. अर्थातच त्या प्रमाणांत धर्माचें सार्वभौमत्व शिथिल होणार हें अटळ आहे. बहुतेक मुस्लिम देशांत जनतेचें सार्वभौमत्व मान्य होण्याच्या मार्गावर आहे.