पान:इहवादी शासन.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६६ । इहवादी शासन
 

आता असह्य होऊं लागली. गॅलिलिओ, न्यूटन यांनी निसर्गाच्या कारभारा- विषयी जे शोध लावले त्यांवरून मानवाला हें दिसून आलें की, निसर्ग हा नियमबद्ध आहे. सूर्य, चंद्र, ग्रह, तारे, वीज, पाणी, यांच्या सर्व हालचाली काटेकोर नियमांनी नियंत्रित झाल्या आहेत. हें दिसून आल्यामुळे मानवाच्या मनांतील परमेश्वराविषयीचा आदर कमी न होता उलट दुणावला. कारण तो म्हणाला, "पाहा, परमेश्वराने स्वतःच्या लहरीप्रमाणे सुलतानशाहीने जग चालविलेलें नाही, तर त्यासाठी त्याने कायदे केले आहेत, आणि ते कायदे तो स्वतःहि पाळतो. त्यांत हस्तक्षेप करीत नाही. स्वतः परमेश्वर असा घटनाबद्ध राजा असतांना पृथ्वीवरील सत्ताधीशांनी, राजा किंवा पोप यांनी अनियंत्रित असणें कसें युक्त ठरेल ?"

मानवी मनाची मुक्तता

 विज्ञानामुळे मानवाचें मन मुक्त झालें तें असें. यापूर्वी निसर्ग, परमेश्वर या लहरी, सुलतानी, कठोर शक्ति आहेत असें वाटून त्याचें मन सदैव भयग्रस्त असें. आपल्या हातीं कांही नसून आपलें व समाजाचें भवितव्य या लहरी शक्तींच्या हाती आहे, आपण पराधीन आहों, गुलाम आहों अशी त्याची भावना होती. हा भयग्रस्त, पराधीन मानव राष्ट्राचा घटक, राष्ट्राचा नागरिक होऊ शकत नाही. सर्व समाजाची जबाबदारी पेलण्याचें मानसिक सामर्थ्य त्याच्या ठायीं या दासस्थितींत येऊंच शकत नाही. तें सामर्थ्य विज्ञानाने, बुद्धिवादाने त्याला दिलें. त्या सामर्थ्याने संपन्न मनुष्य म्हणजेच व्यक्ति. अशा व्यक्तीच राष्ट्र घडवू शकतात आणि त्यांनी निर्मिलेल्या या नव्या संघटनेवर त्यांची सार्वभौम सत्ता असली तरच ती संघटना टिकते व समर्थ होते. त्या सार्वभौमत्वाचा आग्रह आहे तो यासाठी. हें जनतेचें सार्वभौमत्व जेथे नसतें, त्या जागी पोप, खलिफा, कुराण, श्रुतिस्मृति, बादशहा, सुलतान यांचें सार्वभौमत्व जेथे प्रस्थापित होतें, तेथे व्यक्तीचें प्रौढत्व नष्ट होतें. व्यक्ति ही व्यक्ति राहत नाही. ती राजाची प्रजा होते. प्रजा ही राष्ट्र घडवू शकत नाही.
 आज मुस्लिम देशांतील नेत्यांना राष्ट्र घडवावयाचें आहे. त्यासाठी त्यांना धर्माची सर्वंकष सत्ता नष्ट करावयाची आहे. शासन हें धर्मबंधनांतून मुक्त करावयाचें आहे. म्हणजेच इहवादी बनवावयाचें आहे. इहवादावांचून व्यक्तिवाद अशक्य आहे व व्यक्तिवादावांचून राष्ट्रसंघटना अशक्य आहे हें त्यांनी जाणलें आहे. या नव्या तत्त्वज्ञानाचे संस्कार त्या देशांतील नागरिकांवर जितके खोल, जितके जास्त दृढ होतील तितकी ही नवी संघघटना जास्त दृढ व समर्थ होईल.
 या व्यक्तिवादाच्याहि मागे जाऊन आणखी विचार केला पाहिजे. प्रबोधन- युगांत मानवाविषयीच्या तत्त्वज्ञानांत अत्यंत मोठी क्रांति घडून आली ती ही की, मानव हा एकंदर जागतिक व्यवहाराचा मध्यबिंदु आहे, मानव हें अंतिम मूल्य आहे,