पान:इहवादी शासन.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मुस्लिम देश । ६५
 

झेशन, 'आधुनिकीकरण' असा शब्द त्याने वापरला. त्याच्या कायद्यांत धर्म व शासन यांची फारकत करणें हें तत्त्वहि प्रत्यक्ष सांगितलेले नाही. पण ध्वनित निश्चित आहे.

परंपरेचा धागा

 सुवही महसानी या लेबॅनॉनमधील न्यायपंडिताने हा ध्वनित अर्थ पुढे स्पष्ट करूनहि सांगितला आणि त्याला त्याने पैगंबरांचा आधारहि दिला. प्रा. मजिद खादुरी या अमेरिकेतील पंडिताने 'फॉम रिलिजस टु नॅशनल लॉ' या आपल्या लेखांत ही सर्व माहिती देऊन डॉ. सनहूरी याच्या धोरणाचें समर्थन केलें आहे. तो म्हणतो की, "या नागरी कायद्यांत इहवाद निश्चित आहे. पण प्राचीन परंपरेचाहि धागा त्यांत राखला आहे. कारण प्रगतीच्या दृष्टीने तेंच हितावह असतें. जुन्या परंपरेपासून एकदम तुटून निघणें कोणत्याहि समाजाला शक्य होत नाही व तें इष्टहि नसतें." (मिड् ईस्ट, वर्ल्ड सेंटर, पृष्ठ २३४). प्रा. खादुरी यांचें हें म्हणणें युक्तच आहे. पण मथळ्यांतून सूचित होणारा "रिलिजस लॉकडून आपण नॅशनल लॉकडे गेलें पाहिजे," हा विचार येथे आपल्या विवेचनाच्या संदर्भात ध्यानी घेतला पाहिजे.
 जनतेच्या सार्वभौमत्त्वाचा इतका आग्रह सर्व पंडितांनी धरला आहे याचें कारण असें की, राष्ट्रवादाच्या बुडाशी प्रामुख्याने व्यक्तिवाद आहे. व्यक्ति ही राजकीय, धार्मिक, सामाजिक या सर्व प्रकारच्या बंधनांतून मुक्त असली पाहिजे, विचार, आचार, उच्चार यांचें सर्व प्रकारचें स्वातंत्र्य तिला असलें पाहिजे, हा सिद्धान्त म्हणजे व्यक्तिवाद होय. युरोपांत प्रबोधनयुगांत या व्यक्तिवादाचा उदय झाला व त्यांतूनच राष्ट्रवाद निर्माण झाला. रशियांतील इहवादाचें विवेचन करतांना हें सांगितलें आहे की, ज्या समाजांत प्रत्येक व्यक्ति समाजाच्या उत्कर्षापकर्षाची चिंता वाहते आणि त्या उत्कर्षाची जबाबदारी स्वतःवर आहे हें जाणून त्यासाठी उपाययोजना करते, आणि ती उपाययोजना अमलांत आणण्याचा जिला हक्क आहे, तोच समाज राष्ट्र- पदवीला जाऊं शकतो. जुन्या राजसत्तेत प्रजेवर ही जबाबदारी नव्हती. तिला तिची जाणीवहि नव्हती आणि तिला त्या प्रकारचे हक्कहि नव्हते. पिता आणि लहान मुलें यांच्यासारखे त्या वेळीं राजा व प्रजा यांचे संबंध असत. पश्चिम युरोपांत पंधराव्या शतकापासून हें नातें बदललें. बुद्धिप्रामाण्य, विज्ञान संशोधन, भूसंशोधन यांमुळे तेथला मानव प्रौढ झाला व पित्याचा योग्य तो मान ठेवून, कारभाराची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेऊ लागला. अर्थातच पित्याने घातलेली बंधनें अशा स्थितीत मानणें शक्य नव्हतें. 'माझी बंधनें मी घालणार' अशी त्याने प्रतिज्ञा केली. जनतेचें सार्वभौमत्व तें हेंच.
 राजकीय क्षेत्रांत राजा हा पिता असे, तसाच धार्मिक क्षेत्रांत परमेश्वर वा त्याचा प्रतिनिधि जो धर्माचार्य तो पित्याच्या ठायीं असे. त्याचीहि बंधने मानवाला
 इ. शा. ५