पान:इहवादी शासन.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६४ । इहवादी शासन
 

इस्लामच्या मूळ तत्त्वाला अगदी बाधक आहे. पण मुस्ताफा कामील याला तसें वाटत नाही. त्याला स्वदेशांत पाश्चात्त्य पद्धतीची लोकसत्ता हवी आहे. त्या लोकसभेलाच शासन जबाबदार असले पाहिजे. या लोकसभेंत सर्व वर्गांचे, धर्मांचे व पंथाचे लोक असणार. त्यांनी केलेले निर्बंध (कायदे) हे इस्लामच्या तत्त्वाप्रमाणे असले, तरी ते शरियत अनुसारी निश्चित नाहीत. या बाबतीत सामी शौकत याचे उद्गार अगदी निःसंदिग्ध आहेत. तो म्हणतो, "सध्याचे युग हें धर्मयुग नसून राष्ट्रयुग आहे हें आपण ध्यानांत ठेवले पाहिजे."
 हें सर्व विवेचन सविस्तर करून अर्विन रोझेंथॉल म्हणतो, "राष्ट्रसंघटना मुस्लिम देशांत शक्य व्हावयाची तर इस्लामने आपलें अधिसत्तेचें, वर्चस्वाचें स्थान सोडून इतर धर्मांच्या पातळीवर आले पाहिजे. मुस्लिमांच्या जीवनावरची आपली सर्वंकष सत्ता सोडली पाहिजे. आणि सर्वांत आधी राजकीय क्षेत्रांतलें त्याचे वर्चस्व नष्ट झालें पाहिजे. इस्लाम हें एक आध्यात्मिक तत्त्व, तो एक वैयक्तिक धर्म असें स्थान त्याने स्वीकारलें, तरच हें शक्य होईल." (इस्लाम इन् दि मॉडर्न नॅशनल स्टेट, पृष्ठे ६, १०९, ११५, ११९-१२२, १३६, १३८).
 या क्षेत्रांतल्या सर्वच अभ्यासकांचें असें मत असल्याचे आपल्याला दिसून येईल. धर्माचें सर्वंकष वर्चस्व नष्ट झाले पाहिजे, तसें झालें तरच राष्ट्रनिमिति शक्य होईल. धर्म नष्ट झाला पाहिजे, असें ते म्हणत नाहीत. तसें त्यांच्या मनांतहि नाही. पण शासन हें धर्माधीन असता कामा नये असे मात्र प्रत्येकाने आग्रहाने सांगितलें आहे. हॅनस कोहनने म्हटले आहे, "१९२४ साली खिलाफत नष्ट झाली आणि तें अपरिहार्यच होते. युरोपीय विद्येमुळे मध्यपूर्वत इहवाद आला होता आणि इहवादामुळे धर्माची जागा हळूहळू राष्ट्राने घेतली होती. शासनाचा व एकंदर मानवी जीवनाचा आता तो पाया होत होता. तेव्हा खिलाफतीचें पुनरुज्जीवन करण्याचा कोणताच प्रयत्न यशस्वी झाला नसता. इस्लाम ही अजूनहि एक प्रबळ धार्मिक शक्ति निश्चित आहे. पण तीच आता इहवादी होऊन राष्ट्रवादाचें रूप घेत आहे. धर्मसत्तेपासून शासन, दंडविधान, शिक्षण आणि एकंदर समाजजीवन मुक्त होणें म्हणजे इहवाद. तो आता मध्यपूर्वेत सर्वत्र प्रभावी होत आहे." (वेस्टर्न सिव्हिललिझेशन इन् दि निअर ईस्ट, पृष्ठ ९८).
 डॉ. सनहूरी या मिसरी पंडिताने प्रत्यक्ष तात्त्विक चर्चा न करतां अरब- देशांत हें प्रत्यक्षांत घडवून आणले आहे. शरियतमधले अर्वाचीन काळाला हि योग्य असे निर्बंध निवडून त्यांत त्याने पाश्चात्त्य तत्त्वांची भर घातली व एक नवा नागरी कायदा तयार केला. सिरिया, इजिप्त व इराक या देशांत तो १९४९ व १९५३ सालीं स्वीकारण्यांत आला. डॉ. सनहूरी यांस एवढे यश येण्याचें मुख्य कारण हे की, त्याने सेक्युलरायझेशन हा शब्द कटाक्षाने टाळला आहे. अरब देशांत धर्मनाश असा त्या शब्दाचा अर्थ झाला आहे. म्हणून तो शब्द टाळून मॉडर्नाय