पान:इहवादी शासन.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६२ । इहवादी शासन
 



 

राष्ट्रवादामुळे विश्व-मुस्लिमवाद सोडावा लागतो, मुस्लिमेतरांना स्वकीय मानावें लागतें व प्राचीन परंपरा मुस्लिमेतर असली तरी तिचा अभिमान वहावा लागतो. अंध जमातवादी लोकांना हे सर्व कडू घोट आहेत. पण त्यांपेक्षाहि एक कडू- जहर घोट राष्ट्रनिष्ठेसाठी घ्यावा लागतो. तो म्हणजे जनतेचें सार्वभौमत्व मान्य करणें हा होय. राष्ट्र हें नवें, अगदी ध्रुवभिन्न असे संघटनतत्त्व आहे, असें वर अनेक वेळा सांगितलें आहे, याचे कारण हेंच आहे.
 त्यासाठी जुन्या समाजरचनेतील जवळ जवळ सर्व तत्त्वांचा त्याग करावा लागतो आणि सर्वस्वीं नवीन, अपरिचित व निषिद्ध वाटणाऱ्या तत्त्वांचा स्वीकार करावा लागतो. इस्लामने अल्लाची आज्ञा ही सर्वगामी व सर्वव्यापी आहे, हें तत्त्व शिरसावंद्य मानले आहे. आणि जनतेचं सार्वभौमत्व मान्य केलें, तर त्याचा त्याग करणें अपरिहार्य ठरते. राष्ट्रामध्ये कोणत्याहि क्षेत्रांतला अंतिम निर्णय सर्व राष्ट्रांतील जनतेच्या मताप्रमाणे व्हावयाचा असतो. तो करतांना परमेश्वराच्या, अल्लाच्या आज्ञेचा विचारहि केला जात नाही. त्यामुळेच देव की माणूस, निर्णायक शासन देवाचें की माणसाचें, असा पेच निर्माण होऊन समाजाचे दोन तट होतात व त्यांच्यांत संघर्ष अटळ होतो.
 जीर्णवादी मुस्लिम मौलानांचा राष्ट्रवादाला कडवा विरोध आहे तो याच कारणासाठी. त्याअन्वये लोकांच्या हातीं शासन जातें व मग शासनावर धर्माची- इस्लामची- सत्ता राहत नाही. राजशासन व धर्म यांची तेथे फारकत होते. पाक इस्लामी पंडितांना ही कल्पनाच असह्य आहे. महंमद गझाली हा अरब पंडित म्हणतो की, "राष्ट्रवाद स्वीकारणें म्हणजे पैगंबरांच्या पूर्वीच्या रानटी अवस्थेत जाणें होय. ही कल्पना आपण पाश्चात्त्यांकडून घेतली आहे; पण ती सर्वथैव त्याज्य आहे. शासन आणि इस्लाम यांची फारकत म्हणजे पाखंड आहे. शासकीय सत्तेवांचून धर्माला कांही अर्थच नाही. तेव्हा आपल्याला शासन हवें तें इस्लामी शासन हवें, राष्ट्रीय नको. इस्लामअन्वये अल्ला हा एकच शास्ता व निर्बंधकार असू शकतो. पैगंबरांनी राजशासन चालविले, समाजनियंत्रण केलें, तें अल्लाच्या आज्ञेप्रमाणे केलें. परिस्थिति पाहून त्यांनी निर्बंध ठरविले नाहीत. तेव्हा राष्ट्रवाद म्हणजे इस्लामचा नाश होय." मौलाना मीदुदी या पाकिस्तानी पंडितांचे विचार प्रसिद्धच आहेत. तो म्हणतो, "जनतेचें सार्वभौमत्व इस्लामला कधीच मंजूर नाही. ती पाश्चात्त्य कल्पना आहे. अल्ला हीच मुस्लिम देशांत सार्वभौम सत्ता असली पाहिजे. पाकिस्तानांत अल्ला हाच एकमेव शास्ता राहिला पाहिजे. येथलें शासन हें केवळ त्यांचे मुखत्यार मुनीम म्हणून कारभार पाहील. इस्लामचें हें प्राणतत्त्व आहे.