पान:इहवादी शासन.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६० । इहवादी शासन
 

यांनी शंकराचार्यांच्या दर्शनाला जावें, नेहरूंच्या निधनानंतर मशिदींतून त्यांच्यासाठी प्रार्थना व्हाव्या यावर त्यांनी कडवट टीका केली आहे. पण या परंपरेच्या अभिमानांत खरें सामर्थ्य आहे हें इराक, तुर्कस्थान या देशांतील नेत्यांनी जाणलेले असल्यामुळे ते त्याचा परिपोष करण्याचा अट्टाहास करीत आहेत.
 आजचे इराकी लोक बगदाद, हरून अल्- रशीद यांचा अभिमान धरतातच, पण आपल्या भूमींत पांच हजार वर्षांपूर्वी बाबिलोनी संस्कृति नांदत होती व तिचे आपण वारस आहोंत हाहि अभिमान ते बाळगतात. आज युफ्रेटिस व तैग्रीस या नद्यांतून ते कालवे काढू लागले की, त्याच पन्हाळीतून ३००० वर्षांपूर्वी बाबिलोनी संस्कृतीने कालवे खणले होते हे ध्यानांत येऊन त्यांचा ऊर भरून येतो. याच न्यायाने इराणमध्ये आज दरायस, झर्सीस यांचे पोवाडे गाइले जात आहेत. आम्ही प्राचीन ग्रीक लोकांना जिंकले होतें या विचाराने इराण्यांना आज स्फूर्ति मिळते. आणि अशा पराक्रमी पूर्वजांचे आम्ही वारस भविष्यकाळांतहि तसेच पराक्रम करूं असें त्यांचे मन त्यांना ग्वाही देऊं लागतें. तुर्कस्थानांत हलिदे एडिव हनुम या लेखिकेने एक ऐतिहासिक कादंबरी लिहून अटिल्ला, चंगीझखान (हे दोघेहि मुस्लिम नव्हते) यांचा गौरव करून त्यांचे रक्त आमच्या अंगांत खेळतें आहे अशी प्रौढी मिरविली. याच भूमीत हिटाइट व असिरियन या संस्कृति प्राचीन काळी होऊन गेल्या. आज तेथील बँकांना असीरियन बँक, हिटाइट बँक अशी नांवें दिली जातात. त्या संस्कृतीचे प्रत्यक्ष अवशेष आज सांपडत नाहीत. कांही भटक्या आदिवासी लोकांच्या तोंडी त्याबद्दलची फक्त गाणी आढळतात. पण तुर्क नेते व सर्व साहित्यिक आज त्यांचाच उदो उदो करीत आहेत !
 हिंदु लोक प्राचीन काळापासून सहिष्णु आहेत. त्यामुळे त्यांना सर्वधर्म- समानत्व स्वीकारण्यांत कांही अवघड आहे, हें ध्यानांत येत नाही. पण कोणत्याहि धर्माबद्दल ज्याला एकांतिक अंध व कडवा अभिमान असतो त्याला तें तत्त्व महापाप वाटतें. कारण तें स्वीकारतांना केवढा विवेक करावा लागतो पाहा. आपल्या धर्माची तत्त्वें, सिद्धान्त हे परमेश्वराने सांगितलेले आहेत, त्यावरची भाष्यें हीं प्रेषितांनी, अवतारी पुरुषांनी केलेली आहेत, अशी प्रत्येकाची श्रद्धा असते. हा धर्म पूर्ण आहे, निर्दोष आहे, आपले धर्माचार्य हे प्रमादातीत आहेत, असा त्याला विश्वास वाटतो. आता दुसरा धर्म आपल्या धर्माइतकाच खरा आहे, असूं शकेल, असे मानले तर, स्वधर्माचे पूर्णत्व, सर्वंकषत्व कोठे राहिले ? दुसरा धर्म, त्यांतील तत्त्वें, बरोबर असूं शकतील असें म्हणतांच, आपल्या धर्माची तत्त्वें कदाचित् प्रामादिक असूं शकतील, हा विचार सूक्ष्मपणे मनांत उद्भवतोच. तो सहन करणें हें फार थोड्यांना शक्य आहे. वास्तविक विवेकाने केवळ स्वधर्माकडे पाहिले, तरी वरील विचार तितका भयंकर नाही, हें सहज ध्यानांत येईल.