पान:इहवादी शासन.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मुस्लिम देश । ५९
 

 पुढे केमालपाशाने खिलाफत नष्ट केली आणि धर्म व शासन यांची फारकत करून टाकल्यावर धर्मसमानता तुर्कस्थानांत कायमची प्रस्थापित झाली. तुर्कस्थानांत धर्मसमानतेची म्हणजे इहवादाची परंपरा अशी वरीच जुनी असल्यामुळेच तेथे हें तत्त्व लवकर दृढमूल होऊन राष्ट्रसंघटना सुकर झाली. भारतांत स्वातंत्र्यलढ्याच्या काळांत हिंदु-मुस्लिम भाई-भाई अशा घोषणा होत होत्या व भिन्न धर्मीय लोक मिठ्याहि मारीत होते. पण त्यावेळी सुद्धा त्या घोषणांचा आशय मुस्लिमांच्या मनांत अजीबात नव्हता. त्यामुळे त्या घोषणा व्यर्थ ठरून या भूमींत राष्ट्रसंघटना अयशस्वी होऊन तिची शकले झाली. भारतांत उरलेल्या मुस्लिमांची अजूनहि तीच वृत्ति आहे. आणि काँग्रेस व इतर पक्ष तिचा परिपोष करीत आहेत. त्यामुळे अजूनहि भारतांत राष्ट्रसंघटना अशक्य होऊन बसली आहे. सर्वधर्मसमानत्व या तत्त्वाचें इहवादांत काय महत्त्व आहे तें यावरून कळून येईल.

परंपरेचा अभिमान

 प्राचीन परंपरेचा अभिमान हा राष्ट्रनिष्ठेचा आत्मा आहे. या परंपरेंत त्या भूमींतील सर्वांच्या कर्तृत्वाचा धर्मनिरपेक्षपणें समावेश होतो. पण इस्लामचा याला कडवा विरोध आहे. इजिप्तची इस्लामपूर्व संस्कृति फार थोर होती. पण सातव्या शतकांत मुस्लिमांनी तो देश जिंकल्यावर तेथील सर्व प्रजा मुस्लिम झाली आणि त्या परंपरेचा त्या भूमींत कोणीहि अभिमान धरीनासा झाला. मुस्लिमांच्या दृष्टीने तें कर्तृत्व, ती गुणसंपदा त्यांची नव्हतीच. ती काफरांची होती. तिचा अभिमान ते कसा धरणार ?
 पण गेल्या शतकांत राष्ट्रनिष्ठेचा उदय होतांच आपपरभाव बदलले. इस्लामपेक्षा स्वभूमीचा अभिमान जास्त प्रभावी ठरला आणि मग मिसरी नेते त्या परंपरेचे गुणगान करूं लागले. १९१० साली इजिप्शिअन नॅशनल काँग्रेसचा चिटणीस हमीद अलेली आपल्या भाषणांत म्हणाला, "युरोपी देश जन्मालाहि आले नव्हते तेव्हा या भूमीत उच्च संस्कृति निर्माण झाली होती. ज्यांचें पूर्व असें उज्ज्वल आहे, दिव्य आहे त्यांचा भविष्य काळ उज्ज्वल होईल यांत शंकाच नाही. ज्या लोकांनी पिरामिड बांधले त्यांची प्रतिभा, त्यांचा पराक्रम सुप्त अग्नीप्रमाणे आमच्या ठायीं अजूनहि आहे. त्यांच्या आठवणीने आम्हांला स्फूर्ति येते व आम्हीहि तसाच पराक्रम करूं, असा विश्वास वाटतो."
 राष्ट्रभावनेचा उदय होतांच सर्व मुस्लिम देशांत मुस्लिमपूर्व इतिहासांतील कर्तृत्वाचा व त्या काळच्या कर्त्या पुरुषांचा म्हणजेच प्राचीन परंपरेचा असा अभिमान उसळून येऊं लागला. पाक मुस्लिमांना याचीच खंत वाटते. मुस्लिमेतर पुरुषांचा अभिमान धरणें हें त्यांना पाप वाटतें. भारताचे दिवंगत राष्ट्रपति झाकीर हुसेन