पान:इहवादी शासन.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५८ । इहवादी शासन
 

पैगंबरांनी अत्यंत निषिद्ध मानलेली होती. एखाद्या ख्रिश्चन स्त्रीने मुसलमान पुरुषाशीं लग्न केलें, तरी तिला सक्तीने मुस्लिम करण्याचा अधिकार तिच्या नवऱ्याला नाही, असें वर निर्देशिलेल्या जाहीरनाम्यांत आठव्या कलमांत सांगितलें आहे. (हजरत महंमद पैंगंबर चरित्र- सय्यद अमीन, पृष्ठ ४७) तुर्क सुलतान सेलिम पहिला याने एकदा आपल्या साम्राज्यांतील सर्व ख्रिस्ती व ज्यू यांना सक्तीने मुस्लिम करण्याचे ठरविलें होतें. पण त्याच्या राज्यांतील उलेमांनी, (धर्मपंडितांनी) शरीयतमधील वचनें दाखवून, हें इस्लामविरुद्ध आहे, असें त्यास सांगितलें व परावृत्त केलें. (मिड् ईस्ट- वर्ल्ड सेंटर, पृष्ठ ३२१) सक्तीचें धर्मांतर अगदी निंद्य होय, असें पैगंबरांनीच सांगितलेले आहे. पण पैगंबरांचीं वचनें, कुराण, शरियत (मुस्लिम कायदा) यांतील सहिष्णुता पुढील काळांत नष्ट झाली. मुस्लिमांचा पुढील सर्व इतिहास रक्तपाताचा आहे. कुराण किंवा मरण यावांचून अन्य गति नाही असें ते इतर धर्मीयांना बजावीत. म्हणजे गेली अनेक शतके इतर धर्मीयांना हीन, पतित मानणें हेंच इस्लामचे तत्त्व होतें. आतां राष्ट्रभावनेमुळे तें मुस्लिमांना सोडावें लागलें व इजिप्त, तुर्कस्तान, इराण, सिरिया, इराक येथील मुस्लिमांनी विवेकबळाने तें सोडण्याची सिद्धता केली. पोथीतील वचनांचें प्रामाण्य न मानतां आपल्या विवेकाला प्रमाण मानणें हें इहवादाचे प्रधान लक्षण होय. या विवेकाचा प्रभाव जितका जास्त तितकें राष्ट्र अधिक संघटित व म्हणूनच अधिक समर्थ.
 इजिप्तमध्ये कॉप्ट (ख्रिश्चन) व मुस्लिम यांच्यांत प्रारंभी तीव्र संघर्ष होता. पण राष्ट्रभावनेच्या प्रभावाने तो हळूहळू नाहीसा झाला. सिरियांत असेंच घडलें. तेथे ख्रिश्चन व मुस्लिम यांच्यांत, इतकंच नव्हे, तर शिया, सुनी, ड्र्यूज या भिन्न मुस्लिम पंथांतहि पूर्वी अहिनकुल वृत्ति होती. पण राष्ट्रभावनेमुळे ती नष्ट झाली व त्यांच्यांत ऐक्य निर्माण झालें. तुर्कस्थानांत सोळाव्या शतकांतील सुलतान सुलेमान यांचें उदार धोरण पुढील सुलतानांनी त्याज्य ठरविलें होतें. पण केमालपाशापूर्वीच सुलतान अब्दुल मजीद याने पुन्हा त्याचा अवलंब केला होता. १८३९ सालींच त्याने नव्या सुधारणा जाहीर करून मुस्लिम व मुस्लिमेतर यांना कायद्याने समप्रतिष्ठा प्राप्त करून दिली होती. १८७६ सालीं सुलतान अब्दुल हमीद याने पुन्हा पूर्ण प्रतिगामी धोरण अवलंबून पॅन इस्लामिझमचा पुरस्कार केला हें वर सांगितलेंच आहे. पण १९०८ सालीं तरुण तुर्कांनी उठावणी करून हमीदला पदच्युत केलें व इहवादी धोरणाची पुन्हा प्रस्थापना केली. त्या दिवशी मुस्लिम-उलेमा, मुल्ला-मौलवी व ख्रिस्ती धर्मगुरु यांनी एकमेकांना मिठ्या मारून आनंदोत्सव साजरा केला. १९११ साली सर्वधर्मसमानत्वाचा कायदा त्यांनी पुन्हा मंजूर करून घेतला व सरकारी अधिकारपदें यापुढे धर्मवंशनिरपेक्ष, केवळ गुणांवर मिळतील, असें जाहीर केलें.