पान:इहवादी शासन.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मुस्लिम देश । ५७
 

तिच्या प्रसारार्थं सर्व जगभर प्रचारक धाडले. त्यांना प्रथम प्रतिसादहि चांगला मिळाला.

विश्व-मुस्लिमवादाला ओहोटी

 १९०३ साली लंडन येथे अब्दुल्ला सुऱ्हावर्दी याने पॅन इस्लामिक सोसायटीची स्थापनाहि केली. पण राष्ट्र या नव्या संघटन-तत्त्वाचा प्रभाव आता इतक्या वेगाने वाढत आहे की, जगांतल्या सर्व मुस्लिम देशांत विश्व-मुस्लिमवादाचे प्रवक्ते आजहि सापडत असले, तरी त्याच्यामागे तो प्रत्यक्षांत अवतरण्याइतका जोम कोठेहि नाही; राष्ट्रवादाने सर्वत्र त्याच्यावर मात केली आहे. हा इहवादाचा विजय आहे. कारण अखिल मुस्लिम ऐक्य ही इस्लाम धर्माची महत्त्वाची कल्पना आहे. इहवादाचा प्रभाव पडला नसता तर ती बाजूस सारून राष्ट्रवादाचा पुरस्कार करणें मुस्लिम राष्ट्रीय नेत्यांना शक्य झालें नसतें. पण ते उघडपणें त्या धार्मिक कल्पनेचा त्याग करीत आहेत. आणि राष्ट्रनिर्मितीवर सर्व शक्ति केंद्रित करीत आहेत. राष्ट्र संघटित करणें हें त्यावांचून अशक्य आहे, हें त्यांनी जाणले आहे.
 आपल्या राष्ट्राबाहेरचे जे मुस्लिम, त्यांना परके लेखणें, प्रसंगी त्यांना शत्रु मानून त्यांच्याशी युद्धहि करणें हें एक पाप, तर आपल्या राष्ट्रांतील ख्रिश्चन, ज्यू, हिंदु, इत्यादि जे परधर्मीय लोक त्यांना आपले मानणें हें धर्माच्या दृष्टीने दुसरें पाप होय. राष्ट्र या नव्या संघटनतत्त्वामुळे हें दुसरें पापहि मुस्लिमांना करावें लागतें. वास्तविक एका मुस्लिम पंथान्वये हे पाप नाही. तुर्कस्थानचे विख्यात सुलतान सेलिम व सुलेमान यांनी, युरोपांत ज्यू लोकांचा छळ होत होता तेव्हा त्यांना मुद्दाम पाचारण करून, तुकीं साम्राज्यांत वसाहती करण्यास जागा दिल्या. ख्रिश्चन, ज्यू या धर्माच्या लोकांना बहुतेक सुलतान अधिकाराच्या जागाहि देत व त्यांना सन्मानाने वागवीत. महंमदी धर्माचें सहिष्णुता हें प्रधान लक्षण आहे, असें अनेक मुस्लिम पंडितांचें मत आहे. मक्केच्या तहानंतर हजरत पैगंबरांनी जो जाहिरनामा प्रसिद्ध केला त्यांत ख्रिश्चन धर्मीयांशी सहिष्णुतेने वागावें अशी आज्ञा प्रत्येक कलमांत केलेली आहे. ख्रिश्चन हे माझे नागरिक आहेत व याबद्दल मला अभिमान वाटतो, असेंहि त्यांनी जाहीरपणे सांगितलें आहे. ख्रिश्चनांना त्यांची प्रार्थना-मंदिरें बांधण्यास मुस्लिमांनी साह्य केलें पाहिजे, अशी आज्ञा नवव्या कलमांत आढळते.

असहिष्णु वृत्तीचा उदय

 हें सर्व पाहतां सर्वधर्मसमानतत्त्वाचें तत्त्व पैगंबरांना आणि तुर्की खलिफांना मान्य होतें असें दिसतें; पण पुढे त्याचा बहुसंख्य मुस्लिमांना विसर पडला. 'महात्मा गांधींना मी हीनांतल्या हीन मुस्लिमापेक्षाहि हीन मानतो" हे मौ. महंमदअल्लीचे उद्गार प्रसिद्धच आहेत. प्रारंभीचे औदार्य, ती सहिष्णुता लोपल्यानंतर मुस्लिम समाज पराकाष्ठेचा असहिष्णु बनला. सक्तीचें धर्मांतर ही गोष्ट