पान:इहवादी शासन.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५६ । इहवादी शासन
 

आहे. या अखिल मुस्लिम समाजाला 'उम्मत' म्हणतात. या उम्मतांत भेद करणें हे इस्लामच्या मूळ तत्त्वाच्या विरुद्ध आहे. तें पाप आहे. राष्ट्रनिष्ठा ही या कारणानेच सनातन मुस्लिमांना निंद्य वाटते. महंमद एल्. गझाली हा धर्मवेत्ता म्हणतो, "राष्ट्रभावना म्हणजे इस्लामला सुरंगच आहे. कारण इस्लाम हा विश्वसमाज असून पांचहि खंडांत त्याचे सभासद आहेत. विशिष्ट भूमीविषयीची राष्ट्रभक्ति जसजशी वाढत चालली आहे, तसतशी जगदिस्लाम भावना ही दुबळी होत आहे." (रोझेंथॉल, पृष्ठ १११). महंमद अझाद याचेंहि मत असेंच आहे. राष्ट्रभावनेचा निषेध करून तो म्हणतो की, "मुस्लिम विश्व हा एकच इस्लामचा ऐक्यबंध आहे. वंश, राष्ट्र हे आम्ही कांही मानीत नाही. आम्ही सर्व एकधर्मीय आहों यापलीकडे आम्ही दुसरें कांही जाणीत नाही." ही भावना इतर सर्व भावनांच्या अतीत आहे. पॅन इस्लामिझम- विश्वमुस्लिमवाद- या चळवळीच्या बुडाशीं मुस्लिमांची हीच निष्ठा आहे. सर्व जगतांतील मुस्लिम एक हा तिचा घोष आहे. राष्ट्रभेद तिला मान्य नाहीत.
 पण उलेमा, मौलवी हे लोक सोडले तर कोणत्याहि मुस्लिम देशांतील नेत्यांना हा विश्वमुस्लिमवाद आता मान्य नाही. तुर्कांचा एक नेता हमदुल्ला सुवदी हा १९२१ सालींच म्हणाला, "पॅन इस्लामिझमची भाषा आता बंद करा. राष्ट्रनिष्ठा हें आमचें नवें उद्दिष्ट आहे. त्यासाठी पाश्चात्य तत्त्वें पाश्चात्त्य संस्था यांची आम्ही आशियाच्या भूमीत पेरणी करणार आहों. तुर्की राष्ट्राचे स्वतंत्र व्यक्तित्व आम्हांला अभंग राखावयाचें आहे. आम्हीं आता आमचे जुने गुरुजी व नियंते यांच्याकडे पाठ फिरविली असून, पश्चिमाभिमुख झालो आहों." १९२५ साली तुर्की न्यायमंत्री एका परिषदेत भाषण करतांना म्हणाले, "आपण एक नवें सुसंस्कृत राष्ट्र निर्माण करीत आहो. सध्याच्या काळाची ती गरज आहे. त्यासाठी पाश्चात्त्य तत्त्वें आणि पद्धति यांचा अवलंब आपल्याला करावा लागेल. त्याअन्वयें मध्ययुगीन दंडविधान टाकून आपल्याला इहवादी दंडविधानाचा स्वीकार केला पाहिजे. या आमच्या निश्चयापासून आम्हांला कोणीहि परावृत्त करूं शकणार नाही." (हॅनस कोहन- हि. नॅ. ईस्ट पृष्ठ २५७, २५९).
 इजिप्शियन पुढारी मुस्ताफा केमाल हा एकोणिसाव्या वर्षीच 'इजिप्त हा इजिप्शियनांचा' या घोषणेने भारावून गेला होता. त्या वेळचे मिसरी (इजिप्शियन) पुढारी बुद्धिवादी दृष्टिकोणामुळे धर्माविषयी थोडे उदासीन होत चालले होते. पॅन् इस्लामिझमला मधून मधून ते साथ देत, पण ते राजकीय व राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने. त्या तत्त्वावर त्यांची मुळीच श्रद्धा नव्हती. गेल्या शतकाच्या उत्तरार्धांत वास्तविक विश्व- मुस्लिम- संघटनेच्या कल्पनेला फार बहर आला होता. जमाल एल्. अफगाणी हा तिचा अत्यंत समर्थ प्रवक्ता होता. तुर्क सुलतान अब्दुल हमीद याने १८७६ सालीं सत्तारूढ होतांच या कल्पनेचा अत्यंत जोराने पुरस्कार केला. त्याने