पान:इहवादी शासन.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मुस्लिम देश । ५५
 

तेथील लोकांत आपण मिसरी (इजिप्शियन), आपण सिरियन, इराकी, अशी भावना उदय पावली.
 इतके दिवस आपण मुस्लिम आहोंत, अशी त्यांची भावना होती. तुर्की साम्राज्यांत आपण दास्यांत आहोंत, गुलामगिरीत आहों, असें त्यांना वाटत नसे. तुर्की सुलतानावर त्यांची भक्ति होती व तोच खलिफा असल्यामुळे तो त्यांचा धर्माचार्यहि होता. पण पाश्चात्त्य संपर्काने राष्ट्रीयतेची जाणीव त्यांच्यांत येतांच त्यांना तुर्क हे आपले शत्रु वाटू लागले आणि त्यामुळे तुर्की साम्राज्याला तडे जाऊन पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस तें पूर्ण लयास गेलें. तुर्कांच्या नव्या नेत्यांना- केमालपाशा आणि त्याचे सहकारी यांना– तुर्की साम्राज्य नकोच होतें आणि याचें कारणहि राष्ट्रभावना हेंच होय. आपण सर्व मुस्लिम- सिरियन, इराकी, इराणी, अफगाणी सर्व एक आहोत अशी भावना त्यांच्या ठायीं शिल्लकच राहिली नव्हती. तुर्कस्तान तुर्कांचा, असा त्यांचा नवा घोष होता. इजिप्तमध्ये याच नव्या जाणिवेने 'मश्र लिल मश्रिजिन' (मिसर मिसरींचा) असा घोष ऐकू येऊ लागला होता. त्यांचा नेता आरबीपाशा स्वतःला 'एल्-मश्री' असें म्हणवीत असें. आपण मुस्लिम आहोंत ही कल्पना गौण झाली. यांतल्या कोणी इस्लामचा त्याग केला असा याचा अर्थ नाही. ते सर्व एकनिष्ठ मुस्लिम होते. पण त्यांचे संघटनतत्व व त्यामुळेच आपपरभावहि आता बदलले.

नवा ऐक्यबंध

 १९२५ सालीं अंकारा येथे भाषण करतांना केमालपाशाने लोकांना जाणीव दिली की, "आज आपण एकराष्ट्रीय म्हणून संघटित झालों आहों. एकधर्मीय म्हणून नव्हे.' त्याने खिलाफत नष्ट केली तेव्हा इतर मुस्लिम देशांतील अनेक शिष्टमंडळांनी त्याला विनंती केली की, 'तुम्हीच आता खलिफा व्हा.' पण इस्लाम हा ऐक्यबंध केमाल मानीतच नव्हता. आपण तुर्क आहोत, तुर्कांचे नेते आहोत, व तुर्क राष्ट्रीयांनाच आपल्याला संघटित करावयाचें आहे, असें त्याने जगाला शतवार जाहीर करून सांगितलें. जगांतल्या इतर सर्व मुस्लिम देशांनीहि हाच नवा ऐक्यबंध, हेंच नवें संघटन-तत्त्व त्या वेळीं स्वीकारून आपल्या समाजाची पुनर्रचना करण्याचें निश्चित केलें.
 असा निश्चय करून त्यांनी पहिले पाऊल टाकतांच, राष्ट्रनिष्ठा म्हणजे इहवाद, इहवादांतूनच हें तत्त्व निर्माण झालें आहे, त्याच्या आश्रयावांचून राष्ट्ररचनेची अणुमात्र प्रगति होणें शक्य नाही, हें त्यांच्या ध्यानांत आलें आणि त्या त्या देशांत जे इस्लामचे कडवे अभिमानी होते त्यांना ही नवी निष्ठा म्हणजे इस्लामचा सर्वांत मोठा शत्रु आहे हें तत्काळ समजून आलें.
 इस्लाम हा सर्व मुस्लिम जगत एक मानतो. मुस्लिम हा जगांत कोठेहि असो, तो कोणत्याहि वंशाचा, देशाचा, वर्गाचा असो, तो दुसऱ्या सर्व मुस्लिमांचा बंधु