पान:इहवादी शासन.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५४ । इहवादी शासन
 

दृष्टीने, इस्लामी शासन आहे, पण सध्याचा इराणचा शहा पूर्ण नवमतवादी असून, पश्चिमीकरणाचा त्याने ध्यास घेतलेला आहे. शिक्षण, स्त्रीजीवन व एकंदर समाज- जीवन यांवरील जीर्ण धर्माचें वर्चस्व त्याने कधीच नष्ट केले आहे. सिरिया, इराक, सौदी अरेबिया येथे सर्वत्र याच नव्या मार्गाने दौड चालू आहे. त्यासंबंधीचें विवेचन पुढे येईलच. धर्मक्रांतीला सर्व मुस्लिम देश आज कटिबद्ध झाले आहेत एवढेच येथे लक्षणीय आहे.
 धर्मसत्ता व इहवाद यांच्यांत आज जो संघर्ष निर्माण झाला आहे तो संघर्ष म्हणजे जगांतील सर्वच धर्माच्या पुढे काळाने टाकलेलें एक दुष्कर असें आव्हान आहे. त्या विषयी आपल्या ग्रंथाच्या समारोपांत प्रा. रोझेंथॉल यांनी केलेले समालोचन मोठें उद्बोधक आहे. तें तेथे देऊन धर्मक्रांतीचें हें विवेचन पुरें करूं.

दुष्कर आव्हान

 ते म्हणतात, "हें आव्हान अर्वाचीन विद्या व भौतिक शास्त्रे या रूपाने मूर्त झालेला जो इहवाद आणि त्याच्या मुळाशी असलेली तर्कनिष्ठ चिकित्सा वृत्ति व ऐतिहासिक दृष्टि यांनी दिलेले असून ते जगांतल्या सर्वच धर्मांना दिलेले आहे. या दुर्जय दिसणाऱ्या आव्हानाचा स्वीकार करावयाचा असेल, तर आपल्याला फार मोठी किंमत देण्यास सिद्ध झाले पाहिजे. आपल्या धार्मिक श्रद्धा, आपली आध्यात्मिक तत्त्वें व आपले सनातन सिद्धान्त यांची नव्या दृष्टिकोनांतून मूलगामी चिकित्सा व शोधन करणे ही ती किंमत होय. ही चिकित्सा करून आपण आपल्या प्राचीन धर्माचें पुनर्मुल्यमापन केले पाहिजे आणि नव्या दृष्टीला दिसलेली जुनीं मूल्यें व नवीं तत्त्वें यांचा समन्वय साधला पाहिजे. आज जीवनाचा नवा अर्थ आपण शोधीत आहोत. अंतराळांत जाऊन जीवनाच्या कक्षा रुंदावीत आहोत. यासाठी अत्यंत मूलगामी अशी क्रांति व पुनर्रचना अपरिहार्यच असते."
 हॅनस कोहन, रोझेंथॉल, कोल्सन इत्यादि पंडितांनी मुस्लिम देशांचा जो इतिहास दिला आहे त्यावरून तेथील जनता व नेते ही किमत देण्याचा प्रयत्न करीत आहेत असें दिसतें.


 इजिप्त, सिरिया, इराक, तुर्कस्थान ही नव्यानेच जन्माला आलेली राष्ट्रें आहेत असें प्रारंभी म्हटले आहे. नव्यानेच म्हणजे गेल्या शंभर वर्षात. मग त्यापूर्वी ही राष्ट्रें कोठे होतीं ? याचें उत्तर असे की, ही राष्ट्रे त्या वेळी नव्हतीच. ते सर्व भौगोलिक देश असून, ते तुर्की साम्राज्यांत होते. पाश्चात्य विद्या त्या देशांत आली, तिने त्यांना हे नवें संघटनतत्त्व शिकविलें आणि त्यामुळे प्रत्येक देशाची स्वतंत्र अस्मिता जागृत होऊन