पान:इहवादी शासन.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मुस्लिम देश । ५३
 

अर्थव्यवहार या सर्व क्षेत्रांतील धर्मनियंत्रण ढिलें करणें अवश्य आहे. याचाच अर्थ असा की, धर्म ही यापुढे एक खाजगी वैयक्तिक बाब राहील. सार्वजनिक व्यवहारांत मूळ परंपरेच्या तात्त्विक अभिमानापलीकडे तिचें नियंत्रण राहणार नाही.

केमाल पाशाचें धोरण

 या बाबतीत तुर्कस्तानने अगदी एकांतिक टोक गाठले आहे. केमालपाशाला राजशासनावरील धर्माचें नियंत्रण तर मान्य नव्हतेंच; पण शरियत हा मुस्लिम कायदा मुळांतच मान्य नव्हता. त्यामुळे तुर्की प्रजासत्ताकाची स्थापना करतांनाच त्याने खलिफापद नष्ट केलें आणि शरियत कायदा रद्द करून, स्विस नागरी कायदा स्वदेशांत जारी केला. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या रिपब्लिकन पक्षाच्या हातची सत्ता गेली. डेमोक्रॅटिक सत्तारूढ झाले. त्यांनी केमाल अतातुर्क याचें धोरण सर्वस्वीं बदललें नाही, पण थोडे ढिलें केलें. उलेमा, मुल्ला-मौलवी यांना कांही सवलती दिल्या. पण त्यामुळे इहवादविरोधी सूर उमटू लागले. इहवादी धोरण रद्द करून इस्लाम हा शासकीय धर्म म्हणून जाहीर करा, अशी त्या पक्षांतल्या लोकांनीच मागणी केली. पण पक्षप्रमुखांनी ती मानली नाही. उलट त्या लोकांनाच पक्षांतून हाकलले. याच वेळी १९५२ साली डॉ. अहंमद अमीन यालमन या कट्टर इहवादी पत्रकाराचा खून करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे शासन जास्तच सावध झाले. त्याने धर्मस्वातंत्र्य नष्ट केले नाही. पण इस्लामवर अतिशय कडक नियंत्रण घातले. (हावर्ड ए. रोड, सेक्युलॅरिझम ॲन्ड इस्लाम इन् टर्किश पॉलिटिक्स, करंट हिस्टरी, जून १९५७). गमाल अब्देल नासर हा इजिप्तचा नेता केमालपाशासारखा इस्लाम- विरोधी नव्हता; तो एकनिष्ठ मुस्लिम होता. पण त्यालाहि धर्माची सर्वंकष सत्ता मान्य नव्हती. तशा सत्तचा पुरस्कार करणारी 'मुस्लिम ब्रदरहूड' ही संस्था १९५४ साली त्याने रद्द करून टाकली. यावरून मुस्लिम समाज आता इहवादी होत आहे, असें कीथ आयर्विन या अभ्यासकाने आपले मत दिले आहे. (करंट हिस्टरी, जून १९५७, रिलिजन इन् दि मिडल ईस्ट).
 इराणमध्ये मालकमखान या सुधारकाने राज्यकारभार व न्यायपीठ यांवर धर्मसत्ता असूं नये, उलेमांच्या ऐवजी त्यांवर कायद्याचें नियंत्रण असावें, असें प्रतिपादन १८९० पासूनच सुरू केलें होतें. त्या साली लंडनला जाऊन त्याने 'कानून' हे पत्र सुरू केलें. आणि इराणचें शासन व तेथील उलेमा यांच्या प्रतिगामी वृत्तीवर प्रखर टीका करण्यास प्रारंभ केला. त्या काळांत सुद्धा त्याने निर्भयपणें असें मत मांडलें आहे की, टेलिग्राफ, तारायंत्र यांचे संशोधक आततायी देहदंडन करणाऱ्या फकिरापेक्षा अल्लाला जास्त प्रिय असतात. मालकमखानाचें कानून हें पत्र गुप्तपणें इराणमध्ये येत असे. त्यामुळेच इहवादी बुद्धिजीवी तरुणांचा एक वर्ग तेथे निर्माण झाला. (नॅ. ईस्ट- कोहन पृष्ठ ३२१) आज इराणचे शासन हें कायद्यांतील शब्दाच्या