पान:इहवादी शासन.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५२ । इहवादी शासन
 

ही सर्व तत्त्वें इस्लाममध्ये मुळांत आहेतच. पाश्चात्त्यांकडून तीं घेण्याची मुळीच गरज नाही. पाश्चात्त्य समाजवादी लोकांना इस्लाम नीट समजला, तर आपली सर्व तत्त्वें त्यांत आहेत हे ध्यानी येऊन ते सर्व मुस्लिम धर्माचा स्वीकार करतील, असें रशिद रिडा यांचे मत होते. अशा एकांतिक मतामुळे या मुस्लिम पंडितांत दोन तट पडलेले आहेत. एक परंपरावादी आणि दुसरा पाश्चात्त्यवादी. त्यांच्यांत हि पुन्हा सूक्ष्म व स्थूल मतभेदांमुळे अंतर्गत फळ्या आहेतच. पण शरियतच्या आज्ञांचा स्वतःच्या बुद्धीने, परिस्थिति पाहून प्रगतीला पोषक असा अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य लोकांना आहे, याविषयी त्यांच्यांत दुमत नाही. मध्यपूर्वेतील देशांवर पन्नास- पाऊणशे वर्षे ब्रिटिश व फ्रेंच यांची जुलमी सत्ता होती. त्यामुळे तेथील धर्म- पंडितांच्या व राजकीय नेत्यांच्या मनांत या पाश्चात्त्य देशांविषयी अजूनहि कडवा द्वेष आहे; आणि त्यामुळेच पुष्कळांच्या मनांत पाश्चात्त्य विद्येविषयीहि तिटकारा आहे. इस्लाममध्ये हीं सर्व तत्त्वें आहेत, पाश्चात्त्य विद्येची आम्हांला गरज नाही, असे ते म्हणतात. पण केमाल पाशासारखे राजकीय नेते व झिया गोएकल्पसारखे विचारवंत पाश्चात्त्य सत्तांचे कडवे द्वेष्टे असूनहि त्यांना पाश्चात्त्य संस्कृतीचा द्वेष वाटत नाही. इतकेंच नव्हे, तर तिचा स्वीकार केल्यावांचून तरणोपाय नाही, असे त्यांचं मत आहे. पण हें कसेंहि असले तरी, हे सर्व नेते धर्मांत सुधारणा करण्यास, परिवर्तन करण्यास अनुकूल आहेत यांत शंका नाही. नवीं तत्त्वे पाश्चात्त्यांकडून घ्यावयाचीं, की इस्लामच्या मूळ पीठिकेंतून घ्यावयाची. हा मुद्दा आपल्या दृष्टीने गौण आहे. नवें परिस्थितीचे आव्हान स्वीकारून सर्व मुस्लिम देश धर्मपरिवर्तनाला सिद्ध झाले आहेत आणि त्यामुळेच त्यांच्यांत प्रगति होऊ शकली, हा विचार, इहवादाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
 बुद्धिप्रामाण्य व परिवर्तनीयता हीं तत्त्वें मान्य झाली की तिसरें ओघानेच येतें. धर्माची ऐहिक व्यवहारावर सर्वंकष सत्ता असतां कामा नये, हें तें तत्त्व होय. वर एके ठिकाणीं सांगितलेच आहे की, प्रगतीच्या पावलोपावली आड येणाऱ्या या सर्वंकष सत्तेला मुस्लिम देशांतील तरुण आता कंटाळले आहेत. एकच उदाहरण पहा. इस्लामधर्माप्रमाणे भांडवलावर व्याज घेणें हें पाप आहे. या श्रद्धेमुळे बँक ही कल्पनाच अशक्य होऊन बसते. इजिप्तमध्ये हा प्रश्न आला तेव्हा ग्रँड मुफ्ती महंमद अब्दु याने फतवा काढून, व्याज घेणें हें पाप नाही, असा निर्णय दिला. इजिप्शिनय शेतकऱ्यांना यामुळेच सेव्हिंग्ज बँकेचा उपयोग करतां येऊ लागला. तुर्कस्तानांत बँकांच्या व्यवहारासाठी असाच फतवा काढावा लागला. परकी भाषा शिकणें व ऐहिक विद्या शिकणें हें पाप नाही, असाहि फतवा गेल्या शतकांत तुर्कस्तानांतील उलेमांना काढावा लागला होता. रूढ, अंध धर्माची सर्वंकष सत्ता ढिली केल्यावांचून अर्वाचीन काळांत नित्याचें जीवन जगणें सुद्धा शक्य नाही, मग प्रगति लांबच राहिली. ती साधावयाची तर राज्यशासन, न्यायपीठ, शिक्षण,