पान:इहवादी शासन.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मुस्लिम देश । ५१
 

 पण धर्मपरिवर्तन झाल्यावांचून राष्ट्रनिष्ठेचा परिपोष होणें आणि देश अर्वाचीन काळांतील समस्यांना तोंड देण्यास समर्थ होणें हें अशक्य आहे. 'इस्लाम इन दि मॉडर्न नॅशनल स्टेट' या आपल्या ग्रंथांत प्रा. रोझेंथॉल यांनी या विषयाचें केलेलें विवेचन या दृष्टीने फार उद्बोधक आहे. ते म्हणतात, "राष्ट्र, लोकशाही, समाजवाद, इत्यादि पाश्चात्त्य संस्थांचा पूर्वेकडे सध्या स्वीकार होत आहे. पण या संस्थांच्या मागे जें पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, जी विचारपरंपरा आहे ती या लोकांनी आत्मसात् केल्यावांचून या संस्था यशस्वी होणार नाहीत. डेकार्टपासून पुढच्या काळांत पाश्चात्त्य तत्त्वज्ञान व विज्ञान यांचें रूप अगदी पालटून गेलें आहे. देव आणि माणूस यांचे नातें तेव्हापासून आमूलाग्र बदललें आहे. विश्वरचनेंतील मानवाच्या स्थानाविषयीचा दृष्टिकोन अगदी भिन्न झाला आहे. धर्मक्षेत्रांत लुथरने विवेकस्वातंत्र्याचें महत्त्व प्रस्थापित केलें आहे. प्रबोधन व धर्मसुधारणा या युगांच्या प्रेरणांतून हॉब्स व लॉक निर्माण झाले व त्यांच्यापासून फ्रेंच तत्त्ववेत्त्यांनी जी स्फूर्ति घेतली तिच्यांतून फ्रेंच क्रांतीचा स्फोट झाला. राजकीय जुलमाप्रमाणेच धार्मिक अंधश्रद्धेलाहि या क्रांतीने सुरुंग लावले. यामुळे अर्वाचीन युगाला प्रारंभ झाला. बुद्धिवादी, समाजनिष्ठ मानव हा या युगांत केंद्रस्थानी आलेला आहे. हें सर्व नवें तत्त्वज्ञान मुस्लिम देशांत येऊन थडकल्यामुळे तेथील विचारवेत्त्यांपुढे हें नवें आव्हान आलेलें आहे. तें स्वीकारल्यावांचून त्यांची कोणतीहि प्रगति होणें शक्य नाही" ( वरील ग्रंथ पृष्ठ ६).

धर्मपरिवर्तनाला मान्यता

 हें जाणूनच बहुतेक सर्व मुस्लिम देशांनी तें आव्हान स्वीकारलें आहे. हॅनस कोहन याने या देशांचा १९३२ पर्यंतचा व रोझेंथॉल याने १९६६ पर्यंतचा इतिहास दिला आहे. त्यावरून हें अगदी स्पष्ट दिसून येतें. या देशांतील धर्मपंडितांनी आणि तत्त्ववेत्त्यांनी धर्मपरिवर्तन आता मान्य केलें आहे आणि राजकीय नेत्यांनी तेंच परिवर्तनाचें तत्त्व मान्य करून त्याप्रमाणे कायदे केले आहेत. गेल्या शतकांतील जमालुद्दीन अफगाणी, त्याचा शिष्य महंमद अब्दु, अर्वाचीन काळांतील रशीद रिडा, अली एल्- रझिक, झिया गोएकल्प, महंमद इकबाल, मौ. अबुलकलम आझाद, हे सर्व परिवर्तनवादी आहेत. इज्तिहाद, निर्णयस्वातंत्र्य हे यांतील प्रत्येकाला मान्य आहे. मात्र हे स्वातंत्र्य मुळांतंच इस्लाममध्ये होतें, मध्यंतरीच्या काळांत मुल्ला-मौलवींच्या हेकट दुराग्रहामुळे तें लुप्त झालें होतें, तेव्हा त्याचें पुनरुज्जीवन करणे हाच उपाय होय, असें हे सर्व पंडित आग्रहाने प्रतिपदितात. यांतील बहुतेक सर्व विचारवंत हे निष्ठावंत मुस्लिम असून कुराण, सुन्ना व महंमद पैगंबर यांवर त्यांची अढळ निष्ठा आहे. शरियत हा जो इस्लामी कायदा त्यावरहि त्यांची निष्ठा आहे. मात्र देश- काल- परिस्थिति पाहून त्याचा नवा अर्थ लावून घेतला पाहिजे असें त्यांचे मत आहे. रशिद रिडासारखे लोक तर असें सांगतात की, लोकशाही, समाजवाद, समता