पान:इहवादी शासन.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मुस्लिम देश । ४९
 

आहे. हें पाहूं लागतांच असें दिसतें की, मुस्लिम देशांत कांही ग्रंथकार पूर्ण क्रांतिवादी, बुद्धिवादी झालेले आहेत. तुर्की राष्ट्रवादी विचारवंत झिया गोएक आल्प (१८७५-१९२५) हा त्यांत अग्रणी आहे. राष्ट्रनिष्ठा, युरोपीकरण आणि धर्मसुधारणा हे प्रगतीचे तीन उपाय तो सांगतो. त्याच्या मतें धर्मसुधारणेचीं लक्षणें अशीं : मूळच्या विशुद्ध इस्लामी तत्त्वांचा अवलंब करून त्यानंतरच्या टीका व भाष्ये सर्व फेकून देणें हें पहिले लक्षण आणि आजच्या काळाला लागू नसलेली, केवळ त्या प्राचीन काळापुरतीच मर्यादित असलेलीं स्वतः पैगंबरांची वचनेंहि दृष्टीआड करणें हें दुसरें लक्षण. (वेस्टर्न सिव्हिलिझेशन- हॅनस् कोहन, पृष्ठ ९२). जी. मालूफ या सिरियन विचारवंताने अशाच स्वरूपाचीं मतें मांडलेली आहेत. तो म्हणतो, "सर्व शासनें इहवादी करून टाकणे हीच खरी प्रगति. प्रत्येक गोष्टीला धर्मग्रंथांतून आधार काढणें हें तर्कदुष्ट आहे. पौर्वात्य देशांच्या सर्व दुर्दैवाचीं बीजें त्यांच्या धर्मांत आहेत." (नॅशनॅलिझम इन् दि ईस्ट, कोहन, पृष्ठ २७१-७२).
 पण इस्लाम धर्मावर अशी तीव्र टीका करण्याचें अनेक मुस्लिम पंडितांच्या मतें मुळीच कारण नाही. कारण स्वतः महंमद पैगंबरांचाच शब्दप्रामाण्याला विरोध होता. पाकिस्तानांत विवाह व कुटुंबसंस्था यांत सुधारणा करण्याचा कायदा झाला त्या वेळी उलेमांनी, धर्मपंडितांनी त्याच्याविरुद्ध फार ओरडा केला. तेव्हा त्यांना त्या कायद्यासाठी नेमलेल्या कमिशनने पुढीलप्रमाणे उत्तर दिलें, "जीवन हें अत्यंत विविध आहे. त्यांत अनेक अतर्क्य प्रसंग उद्भवतात, अकल्पनीय घटना घडतात; त्या सर्वांचा परामर्श एका माणसाला घेणें शक्य नाही हें जाणून स्वतः पैगंबरांनीच आपल्या काळच्या कायदेपंडितांना व न्यायाधीशांना स्वतंत्रपणें चिंतन करून निर्णय करण्याची मुभा दिली होती. कुराण ग्रंथ व सुन्ना- पैगंबरांचें जीवनचरित्र- त्यांच्यासमोर प्रत्यक्ष असूनहि त्यांना हे स्वातंत्र्य दिलेलें होतें. या स्वातंत्र्यतत्त्वालाच 'इज्तिहाद' असें म्हणतात. कुराण व सुन्ना यांचीं तत्त्वें संभाळून कोणालाहि स्वतंत्रपणें निर्णय करण्याचा हक्क आहे असा या तत्त्वाचा अर्थ आहे. (इस्लाम इन् दि मॉडर्न नॅशनल स्टेट, अर्विन रोझेंथाल, पृष्ठ ३३४). ए. जी. नुराणी यांनी पैगंबरांच्या विषयीची एक याच आशयाची गोष्ट दिली आहे. पैगंबरांनी एका राज्यपालाला विचारले, "कुराण व सुन्ना यांत एखाद्या समस्येचें उत्तर तुम्हांला सापडलें नाही, तर तुम्ही काय कराल ?" राज्यपालाने उत्तर दिलें, "अशा वेळी मी माझ्या बुद्धीने उचित तो अर्थ ठरवीन." या उत्तराने पैगंबर अगदी संतुष्ट झाले. यावरून इस्लामच्या प्रवर्तकाचा शब्दाविषयी मुळीच आग्रह नसून, केवळ तत्त्वाचा आग्रह होता हें स्पष्ट होईल. प्राप्त परिस्थितीत प्रत्येकाने आपल्या बुद्धीप्रमाणे निर्णय करण्यास त्याचा मुळीच विरोध नव्हता. (ओपिनियन, मे १९६७, पुष्ट २७.)

 इ. वा. ४