पान:इहवादी शासन.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४८ । इहवादी शासन
 

नाही. आज मध्यपूर्वेतील सुशिक्षित तरुणांत फार मोठ्या आकांक्षा निर्माण झाल्या आहेत. त्यांना आपापल्या राष्ट्रांची अस्मिता पोसावयाची आहे. गेली अनेक शतकें इजिप्त, सिरिया, सौदी अरेबिया, इराक इत्यादि देश तुर्की साम्राज्यांत होते. स्वतःच्या भिन्न राष्ट्रीयत्वाची जाणीवहि त्यांना नव्हती. ती पाश्चात्त्य विद्येमुळे निर्माण झाली. तुर्कानंतर चाळीस-पन्नास वर्षे हे देश इंग्लिश- फ्रेंचांच्या अधिसत्तेखाली होते. त्यांतूनहि ते वीसएक वर्षांपूर्वी मुक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या आकांक्षा सतत वृद्धिंगत होत आहेत. त्यांना आपली राष्ट्रे बलाढ्य करावयाची आहेत. औद्योगिक प्रगति करावयाची आहे. जमिनींतून सुबत्ता निर्मावयाची आहे. त्यासाठी विज्ञानाचा, भौतिक शास्त्रांचा विकास करावयाचा आहे.
 या शतकाच्या आरंभी बहुतेक अरब देश व इराण येथे अमाप तेलाचे साठे सापडले आहेत. त्यामुळे त्यांचा भांडवलाचा प्रश्न सुटला आहे. पण अजून बहुतेक तेल कंपन्या अमेरिका, ब्रिटन यांच्या ताब्यांत आहेत. मुस्लिम शासनांना निम्मी भागीदारी फक्त मिळते. हे तेल सर्वस्वी स्वतःच्या ताब्यांत असावे अशी अरब तरुणांची ईर्षा आहे. पण आज ती कर्तबगारी, ती संघटनविद्या, तें शास्त्रज्ञान त्यांच्या ठायी नाही. ही गुणसंपदा त्यांना अधिगत करावयाची आहे. पण दर पावलाला अंध जीर्ण धर्म त्यांच्या आड येत आहे, असे त्यांच्या लक्षांत आले आहे. हारवर्ड विद्यापीठाचे प्रा. रिचर्ड फ्राय यांनी 'इस्लाम इन् दि मिडल ईस्ट' या आपल्या लेखांत हा विचार स्पष्टपणे मांडला आहे. (करंट हिस्टरी, जून १९५६). ते म्हणतात, "इस्लामच्या सर्वंकष, सर्वव्यापी जाचक बंधनांचा अरब तरुणांना कंटाळा आला आहे. या देशांत राष्ट्रभावना विकसत आहे, पण धर्मबंधने दर ठिकाणी आड येत आहेत. त्यामुळे या तरुणांच्या निष्ठा, त्यांची मूल्ये आता बदलत आहेत." गमाल अबदेल नासर याच्या 'दि फिलॉसफी ऑफ रेव्होल्यूशन' या पुस्तिकेवरून याची चांगली कल्पना येते. एकाहून एक मोठी अशी एककेंद्री वर्तुळे कल्पून तो म्हणतो की, "या वर्तुळांच्या केंद्रस्थानीं आपले इजिप्त हे राष्ट्र ठेवा. नंतरच्या वर्तुळांत आफ्रिकी देश, त्यानंतर सर्व अरब देश आणि शेवटच्या वर्तुळांत इस्लामी विश्व येईल." इस्लामची अधिसत्ता मनावर आहे तोपर्यंत हें मूल्यपरिवर्तन कधीहि शक्य होणार नाही. पण तें घडवावयाचें असा अरब तरुणांचा निर्धार आहे. आणि यासाठीच त्यांना धार्मिक क्रांति करावयाची आहे. इतर मुस्लिम देशांत सर्वत्र हीच वृत्ति दिसून येत आहे.

धार्मिक क्रांतीचा आधार

 धार्मिक क्रांतीचें पहिले लक्षण म्हणजे बुद्धिवाद, बुद्धिप्रामाण्य ! कुराणा- सारख्या धर्मग्रंथांचा प्रत्येक शब्द प्रमाण मानण्याची म्हणजेच शब्दप्रामाण्याची वृत्ति जोपर्यंत मूळ धरून असते तोंपर्यंत धार्मिक क्रांति होणे शक्य नाही. तेव्हा मुस्लिमांच्या या शब्दनिष्ठ वृत्तांत कितपत पालट झाला आहे हें पाहणें अवश्य