पान:इहवादी शासन.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मुस्लिम देश । ४७
 

पोपविरुद्ध मोहीमच उघडली. यामुळे कॅथॉलिक पंथांत दुफळी माजेल, गॅलिलिओ सारखें हे प्रकरण होईल, सोळाव्या शतकांतील घटनांची पुनरावृत्ति होईल, असा त्यांनी पोपला इशारा दिला आहे व "तुम्हीहि मानव असून प्रमादातीत नाही हे जाणून आपला प्रमाद कबूल करून, ही धर्माज्ञा मागे घेतलीत तरच हा संघर्ष मिटेल," असें त्याला बजावले आहे. कॅथॉलिक धर्मगुरूंच्या विवाहाच्या बाबतींत हेंच होणार आहे. त्यांना विवाहाची परवानगी सध्या नाही. पण आता कांही धर्मगुरु ती मागत आहेत. पोप ती नाकारीत आहे. यामुळेहि कॅथॉलिक पंथांत चिरफळ्या होण्याचा संभव आहे.
 या प्रसंगांतून इहवादाची अनेक तत्त्वें स्पष्ट होतात. ऐहिक जीवनाच्या कोणत्याच क्षेत्रांत विज्ञान- विरोधी असा धर्मनिर्णय करण्याचा पीठस्थ आचार्यांना हक्क नाही. आचार्य कितीहि मोठे असले तरी ते प्रमादातीत नसतात, त्यामुळे लोककल्याण कशांत आहे हे त्यांना कळेलच असे नाही, म्हणून परिस्थिति, इतिहास, अनुभव, विज्ञानशास्त्रे, तर्क यांच्या आधारेंच निर्णय केले पाहिजेत- हीं तीं तत्त्वें होत. पाश्चात्त्य विद्येचीं हीं प्रधान तत्त्वें आहेत. म्हणूनच इहवादाला पाश्यात्त्य विद्येचे एवढे महत्त्व वाटतें. तुर्कस्थानांतील नेते पश्चिमीकरणाची चळवळ व इहवादाची चळवळ हे शब्द एकाच अर्थाने वापरतात. या दोहोंत त्यांच्या मतें अभेदच आहे. यासाठीच मुस्लिम राष्ट्रांतील इहवादी शासनाचा उहापोह करतांना त्या देशांत पाश्चात्त्य विद्या कशी आली व तिचें कोणी, कसें स्वागत केलें याचा विचार प्रारंभीच करणें अवश्य वाटले. बहुधा सर्व मुल्ला-मौलवींनी तिला विरोध केला आणि राष्ट्रवादी, स्वातंत्र्यवादी तरुण पिढीने तिचें स्वागत केलें, ही गोष्ट फार अर्थगर्भ आहे.
 हॅनस कोहन म्हणतो, पंधराव्या शतकांत जें युरोपांत घडलें तेंच आज सर्व जगांत घडत आहे. त्यामुळेच युरोपीकरण, पश्चिमीकरण हाच मोक्षाचा मंत्र होय, असें सर्व अप्रगत देश मानीत आहेत. पण युरोपीकरण म्हणजे स्वयंप्रज्ञा, उपक्रमशीलता, उद्योग, शिस्त यांचे संस्कार ! युरोपीकरण म्हणजे स्वातंत्र्य, निर्भयता, नीतिधैर्य ! ही गुणसंपदा जो देश, जो समाज जोपाशील त्यालाच पाश्चात्त्य विद्या प्रसन्न होईल आणि तोच समाज खरा इहवाद निर्माण करूं शकेल. मध्यपूर्वेतील कोणत्या राष्ट्रांनी ती गुणसंपदा जोपासली व त्यांना तिचें फल काय मिळालें तेंच यापुढील लेखांत पाहवयाचें आहे.


 मागील प्रकरणांतील विवेचनावरून हें ध्यानांत येईल की, इहवादावाचून कोणतीहि प्रगति शक्य नाही, आणि धार्मिक क्रांति झाल्यावांचून इहवाद शक्य