पान:इहवादी शासन.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४६ । इहवादी शासन
 

त्यांतील आघाडीवरचे लोक पॅरिस, लंडन येथे अनेक वर्षे राहून परत आलेले होते. त्यांनी मोलियरचीं नाटकें, रूसोचे ग्रंथ यांची तुर्कीत भाषांतरे करून तुर्की रंगभूमि सजविली आणि 'हरित', 'इब्रेट', 'वतन' यांसारख्या राष्ट्रीय पत्रांना जन्म दिला. पण अशा रीतीने लोकजागृति होत असतांना १८७६ साली अब्दुल हमीद हा प्रतिगामी, जीर्णमतवादी सुलतान गादीवर आला व पुढील तीस वर्षे प्रबोधनयुगाला चांगलाच पायबंद बसला. हा सुलतान कडवा मुस्लिम होता व मध्ययुगाप्रमाणेच धर्माचें राजकारणावर पूर्ण वर्चस्व प्रस्थापित करणें आणि पाश्चात्त्य विचार खणून नष्ट करणें हें उद्दिष्ट त्याने डोळ्यांसमोर ठेविले होते.

'यंग टर्कस'चें कार्य

 प्रगतीला अंधधर्ममताचे वर्चस्व नष्ट होणे किती अवश्य आहे हें यावरून दिसून येईल. तें वर्चस्व नष्ट करावयाचे तर पाश्चात्य भौतिक विद्येवांचून दुसरा तरणोपाय नाही, हें तरुण तुर्कांनी चांगले जाणले होते. या तीस वर्षांच्या काळांत हे 'यंग टर्कस्' बहुतेक हद्दपार होऊन युरोपांत गेले होते. पण तेथे ते स्वस्थ बसले नाहीत. नव्या ज्ञानाचा दीप इतक्या लांबूनहि त्यांनी तुर्कस्थानांत पाजळत ठेविला होता. त्यामुळेच नव्या चळवळीची शक्ति वाढत जाऊन १९०९ मध्ये सुलतानाला तिच्यापुढे वांकावें लागले. केमाल अतातुर्क हा या 'यंग टर्क' लोकांनी स्थापिलेल्या 'युनियन ॲण्ड प्रोग्रेस' या समितीचा प्रारंभापासून सभासद होता. त्याला फ्रेंच भाषा उत्तम अवगत होती. रूसो, व्हाल्टेअर, हॉब्स, मिल यांचे तत्त्वज्ञान त्याने आत्मसात् केलें होतें. सुलतानी राजवट, अंधमतवादी मुल्ला-मौलवी, शरियत यांचा तो हाडवैरी होता. यांच्या वर्चस्वांतून इस्लाम मुक्त केल्यावांचून तुर्कराष्ट्राची प्रगति होणार नाही अशी त्याची निश्चिति होती. रुसो, व्हाल्टेअर, मिल यांनी दिलेल्या या मनःसामर्थ्याच्या जोरावरच त्याने तुर्कस्थानांत नवी सृष्टि निर्माण केली.
 इहवादाचा अर्थ यावरून स्पष्ट होईल. धर्म व राजशासन यांची फारकत एवढाच इहवादाचा अर्थ नाही. मानवी बुद्धि, मानवी प्रज्ञा मानवाचें व्यक्तिमत्त्व अंध, जीर्ण धर्माच्या मगरमिठींतून मुक्त होणें हा त्याचा अर्थ आहे. तसे झाल्यावांचून कोणत्याच क्षेत्रांत मानव नवें तत्त्वज्ञान निर्माण करूं शकत नाही. नवा आचार स्वीकारु शकत नाही. रोमचा पोप पॉल याने नुकताच कुटुंबनियोजना- विषयी निर्णय देऊन तें धर्मबाह्य ठरविले आहे. पण त्याचा तो विवेकशून्य निर्णय प्रसिद्ध होतांच अनेक कॅथॉलिक स्त्री-पुरुषांनी, "आमच्या वैयक्तिक जीवनांत हस्तक्षेप करण्याचा पोपला कसलाहि हक्क नाही" असें उत्तर दिलें. डॉ. रॉबर्ट मॅकरेडी, डॉ. जॉन रॉक यांसारख्या विख्यात कॅथालिक वैद्यकशास्त्रज्ञांनी "हा वैद्यकशास्त्राचा प्रश्न असून, यांत पोपचा कांही संबंध नाही" असें जाहीर केलें आणि रे. जॉन ओब्रायन, हॅनस कुंग, कार्ल राहनर यांसारख्या प्रतिष्ठित कॅथॉलिक धर्माचार्यांनी तर