पान:इहवादी शासन.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मुस्लिम देश । ४५
 

नंतर त्याचे भाऊ व त्याचा मुलगा यांनी तें कार्य पुरें केलें. फराक अंतन याने 'न्यू जेरुसलेम' या कादंबरीतून विज्ञानवादाचा विपुल गौरव केला आणि सामाजिक विषमतेवर कडक टीका करून, सामाजिक न्यायाचा दृढ पुरस्कार केला.

नव्या विद्येचें सामर्थ्य

 हॅनस कोहन यांनी 'वेस्टर्न सिव्हिलिझेशन इन् दि निअर ईस्ट' या ग्रंथाच्या प्रस्तावनेंत या पाचात्य सुधारणेचीं लक्षणें व तिचें महत्त्व वर्णिलें आहे. बुद्धिवाद, व्यक्तिवाद, इहवाद व विज्ञानवाद हीं त्या संस्कृतीचीं ते लक्षणें मानतात. ही संस्कृति मानवाच्या बुद्धीला आवाहन करून व त्याची शब्दप्रामाण्य-वृत्ति नष्ट करून जीर्ण समाजरचना नष्ट करण्याचें सामर्थ्य त्याला देते. एकोणिसाव्या शतकांत ही संस्कृति सर्व जगांत पसरली व तिने सर्वत्र हेंच कार्य केलें. या विद्येच्या जोरावरच युरोपने जग जिंकले. आणि आता आशिया आफ्रिकेतील देश याच विद्येच्या साह्याने युरापचे आर्थिक व राजकीय वर्चस्व नष्ट करीत आहेत. युरोपचें जगावर स्वामित्व होते तेव्हा ते श्वेतवंशीय लोक आपल्या अंगभूत वांशिक श्रेष्ठतेमुळे व परमेश्वरी योजनेमुळे आपल्याला हें सामर्थ्य प्राप्त झालें असें मानीत. पण हा त्यांचा भ्रम होता. अर्वाचीन पाश्चात्त्य सुधारणेच्या उदयापूर्वी पौर्वात्य लोक पाश्चिमात्यांइतकेच समर्थ होते. कधी कधी ते श्रेष्ठहि ठरत. तेव्हा युरोपचें सध्याचें सामर्थ्य हें नव्या विद्येचें आहे वंशगुणाचें व परमेश्वरी योजनेचें नाही.
 तसे असल्यामुळेच तुर्कस्थान हा १९२२ साली ब्रिटन, फ्रान्स या मातबर पाश्चात्त्य देशांवर मात करून स्वतंत्र होऊ शकला. तुर्कस्थानांत पाश्चात्त्य विद्या शंभर वर्षांपूर्वीच येऊन पोचली होती. सुलतान महंमद दुसरा हा इजिप्तच्या वर निर्देशिलेल्या महंमदअल्लीच्या आदर्शाने भारावून गेला होता. पौर्वात्य अनियंत्रित सुलतानी सत्ता व शतकानुशतकाची स्थिरावस्था यांतून राष्ट्र मुक्त करण्यावांचून व घटनात्मक शासनाच्या स्थापनेवांचून गत्यंतर नाही हें त्याने जाणलें होतें. त्याने पीटर दि ग्रेटप्रमाणे लष्कराची पुनर्घटना करण्याचें ठरवून एक नवें लष्करी विद्यालय स्थापिले व युरोपीय लष्करी अधिकाऱ्यांची तेथे नेमणूक केली. त्याचप्रमाणे मंत्रिमंडळ निर्माण करून तुर्की व फ्रेंच भाषांत 'ला मॉटिनर ऑटोमन' नांवाचें वर्तमानपत्रहि चालू केले. महंमदाचा मुलगा अब्दुल मजीद याने रशिदापाशा या लंडन व पॅरिस येथे राहून नवविद्याविभूषित होऊन आलेल्या गृहस्थांच्या साह्याने सुधारणेचे व्रत तसेंच पुढे चालविलें. कायद्याचें राज्य, व्यक्तिस्वातंत्र्य व विशेष म्हणजे सर्वधर्म- समानत्व हीं तत्त्वें त्याने पुकारली आणि फ्रेंच कायद्याचे अनुकरण करून नवें सिव्हिल व क्रिमिनल कोडहि तयार केलें. यानंतर तुर्की विद्यार्थी फ्रान्सला शिक्षणासाठी जाऊं लागले. आणि त्यांच्यांतूनच परिवर्तनाला अवश्य असा बुद्धिजीवी मध्यमवर्ग निर्माण झाला. शिनासी एफंडी, त्याचा शिष्य नमिल केमाल वे, झिया पाशा, हमीद बे हे