पान:इहवादी शासन.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४ । इहवादी शासन
 

मुस्लिम मुल्ला-मौलवी त्याचा सारखाच द्वेष करीत. त्यामुळे प्रत्येक देशाने त्याला हद्दपार केले. तरीहि निर्भयपणे सर्वत्र धाडसाने प्रवेश करून लोकजागृतीचे कार्य त्याने अखंड चालू ठेविलें होतें. ग्रॅंडमुफ्ती महंमद अब्दुल हा याचाच शिष्य. टालस्टॉयला लिहिलेल्या एका पत्रांत त्याने आपल्या मनांतील धर्मसुधारणेचे व उदारमतवादी विचार स्पष्टपणे मांडले आहेत. शेख अली अब्दुल रझिक हा मनसुर मेहाकामा येथील शरीयत न्यायालयांत न्यायाधीश होता. त्याचे शिक्षण ऑक्सफर्डला झाले होते. परत आल्यावर त्याने 'इस्लाम व शासनाची तत्त्वें' या विषयावर एक ग्रंथ लिहून त्यांत इहवादी तत्त्वांचं निरुपण केलें. "मुस्लिम कायदा हा केवळ व्यक्तीच्या खाजगी जीवनासाठी असून, समाज किंवा शासन यावर नियंत्रण ठेवणें हा त्याचा हेतूच नाही" असे प्रतिपादन त्याने केले आहे. बहुभार्यात्व व स्त्रीचें पारतंत्र्य यांचा त्याने निषेध केला आहे; आणि जुने सरंजामदार, राजा आणि उलेमा यांचें वर्चस्व नष्ट झाले पाहिजे अशी मागणी केली आहे. या घोर अपराधासाठी शेख रझिक याला न्यायपीठावरून पदच्युत करणांत आले. पण तरुण विद्यार्थ्यांनी मात्र सर्वस्वी त्यालाच पाठिंबा दिला. अशा या दीर्घकालीन प्रबोधनांतूनच आरबी पाशा, झगलूल पाशा, मुस्ताफा केमाल (तुर्कस्थानचा केमाल अतातुर्क निराळा) हे मध्यमवर्गीय नेते उदयास आले व त्यांनी इजिप्त हे राष्ट्र घडविले.
 सिरिया, इराक, सौदी अरेबिया हे सर्व अवस्थानातील प्रदेश. तेथेहि सामाजिक व राजकीय प्रबुद्धता याच मार्गाने आली. शेकडो वर्षे हे देश जीर्ण, प्रतिगामी अशा तुर्क साम्राज्यशाहीच्या अंध सत्तेखाली होते. त्यांच्या ठायी प्रतिकारसामर्थ्य असे मुळीच नव्हते. पाश्चात्य मिशनरी प्रथम सिरियांत शिरले. त्यांनी शाळा, छापखाना, वृत्तपत्रे या आधुनिक संस्था तेथे आणल्या. त्यामुळे इतर देशांपेक्षां सिरियांत परिवर्तन आधी घडून आले. १८६८ साली अमेरिकन प्रोटेस्टंट मिशनऱ्यांनी बेरुत येथे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन केले व तेथे त्यांनी अरबी भाषेत अध्यापन करण्यास प्रारंभ केला. १८७५ साली फ्रेंच जेसुइटांनी बेरुत येथे विद्यापीठ स्थापन केले व अरबी वर्तमानपत्रे सुरू केली. १८९५ सालीं शेख अहंमद आब्बास याने उस्मानिया कॉलेजची स्थापना केली. हा जेख अहंमद एल्-अझारच्या धर्मसुधारकांचा अनुयायी होता. इस्लामचा त्याला दृढ अभिमान होता. पाश्चात्य विद्येचाहि तो कट्टा उपासक होता. या दोहोंचा समन्वय साधून त्याने सिरियांत चालू झालेल्या परिवर्तनाला चांगली गति दिली. पाश्चात्य विद्येच्या या अध्ययनामुळे सिरियन वाङमयांतहि क्रांति झाली आणि बुट्रास एल्. बुस्टानी, सुलेमान बुस्टानी, आदिव इशाक हे लेखक व हिंद नीफेल, ललिबे हशेम या लेखिका उदयास आल्या व त्यांनी वृत्तपत्रे मासिके, ग्रंथ या साधनांनी नवविचारधारा सर्वत्र पसरून दिल्या. बुट्रास बुस्टानी याने तर १८७५ साली अरबी विज्ञानकोश रचण्यास प्रारंभ केला. १८८३ त त्याचा मृत्यु झाला.