पान:इहवादी शासन.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मुस्लिम देश । ४३
 

कोणीं रुजविलीं, त्यांचे परिणाम काय झाले व त्यांतून इहवादपोषक कोणत्या शक्ति निर्माण झाल्या, हें पाहणें अवश्य आहे.
 प्रा. हॅनस् कोहन (स्मिथ कॉलेज, अमेरिका) या पंडिताने या विषयाचा दीर्घकाल अभ्यास करून त्यावर 'वेस्टर्न सिव्हिलिझेशन इन् दि निअर ईस्ट' व 'हिस्टरी ऑफ नॅशनॅलिझम इन दि ईस्ट' असे दोन ग्रंथ लिहिले आहेत. वरील मुस्लिम देशांतील गेल्या शंभर वर्षांतील परिवर्तनाचा अत्यंत सुबोध असा इतिहास या ग्रंथांत त्याने दिला आहे. या विषयाच्या अभ्यासकांनी हे ग्रंथ अवश्य पाहवेत. पाश्यात्त्य विद्येमळे या देशांत प्रबोधनयुग आले व त्यामुळे तेथे एक नवा बुद्धिजीवी वर्ग निर्माण होऊन त्याने धर्म, समाज, राजकारण, अर्थव्यवस्था या प्रत्येक क्षेत्रांत सर्वस्वीं नवी सृष्टि कशी निर्माण केली त्याचें या दोन ग्रंथांत ग्रंथकाराने साकल्याने विवेचन केले आहे.

प्रबोधनाचे प्रयत्न

 हिंदुस्थानांतील ब्रिटिश सत्तेला शह देण्यासाठी नेपोलियन प्रथम इजिप्तमध्ये शिरला, त्याच्या मागोमाग ब्रिटिश तेथे आले आणि मग पुढील काळांत या दोन सत्तांचा या मुस्लिम देशांशी घनिष्ठ संबंध येऊन त्यांचें वर्चस्वहि तेथे प्रस्थापित झालें; आणि हिंदुस्थानप्रमाणे या वर्चस्वामागोमाग पाश्यात्त्य विद्याहि या देशांत प्रवेश करती झाली. तिचें स्वागत करून तिला आपल्या भूमींत अकुंठित प्रवास करण्यास साह्य करणारे थोर मुस्लिम नेते वरीलपैकी बहुतेक देशांत झाले हें जगाचें सुदैव होय. नेपोलियनचा पराभव होऊन तो परत गेल्यानंतर इजिप्तमध्ये महंमदअल्ली हा कर्ता राजा उदयास आला. त्याने अनेक युरोपीय प्राध्यापकांना स्वदेशांत पाचारण केले, आपले अनेक विद्यार्थी पाश्चात्त्य विद्यापीठांत पाठविले, इजिप्तमध्ये अनेक शाळा, महाशाळा स्थापन केल्या आणि गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचीहि सोय केली. स्वदेशांत अशा सुधारणा केल्यानंतर महंमदअल्लीने अरेबिया, सिरिया, तुर्कस्थान यांवर स्वारी केली. ते देश जिंकले. तेथेहि पाश्चात्त्य विद्या प्रसृत करून, प्रबोधनयुगास प्रारंभ करून द्यावा, असा त्याचा मानस होता. पण प्रबोधनांतून कर्तृत्व व सामर्थ्य निर्माण होतें हें जाणणाऱ्या ब्रिटिशांनी सर्वस्व पणाला लावून त्याला पायबंद घातला. जमालउद्दिन एल्-अफगाणी हा या क्षेत्रांतला दुसरा थोर नेता होय. याचा जन्म १८३८ च्या सुमारास अफगाणिस्तानांत झाला. पण प्रौढपणी सर्व मुस्लिम देशांत प्रवास व वास्तव्य करून दर ठिकाणी प्रबोधनयुग निर्माण करण्याचा हा सतत प्रयत्न करीत असे. १८७० ते १८७८ अशी आठ वर्षे हा इजिप्तमध्ये होता. तेथील एल्-अझार विद्यापीठांतील विद्यार्थ्यांत त्याने या काळांत अपूर्व जागृति घडवून आणली. बुद्धिवाद, स्वतंत्र चिंतन, तर्कनिष्ठ विचारसरणी व संशोधन यावर त्याचा भर असे. त्यामळे पाश्यात्त्य सत्ताधारी व जीर्णमतवादी