पान:इहवादी शासन.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४२ । इहवादी शासन
 


धर्माचे सर्वंकष स्वरूप

 इस्लाम हा सर्वंकष धर्म आहे. मनुष्य जन्मल्यापासून तो मरेपर्यंत त्याच्या आयुष्यांतील सर्व क्षेत्रांतील सर्व घटनांवर, विकार-विचारांवर, संस्थांवर, तत्वज्ञानावर धर्माची अप्रतिहित सत्ता असली पाहिजे, असें मुस्लिम धर्मवेत्ते मानतात. हॉवर्ड ए. रीड यांनी म्हटल्याप्रमाणे "इह व पर, ऐहिक व पारलौकिक, धार्मिक व धर्मनिरपेक्ष असा भेद इस्लाम करूं शकत नाही.' (करंट हिस्टरी, जून १९५७) राजशासन, शिक्षण, ज्ञानोपासना, समाजरचना, विवाह, अंत्यसंस्कार, अर्थव्यवस्था या महत्वाच्या संस्थांपासून पोषाख, केशरचना, नमस्कार, खाणे-पिणे, बसणें-उठणें, या सामान्य आचारांपर्यंत प्रत्येक गोष्ट धर्मनियमांनीच झाली पाहिजे असा पुराण इस्लामचा आग्रह आहे. असा आग्रह बहुतेक सर्वच धर्मांचा असतो. एक प्राचीन काळचा वैदिक हिंदु धर्म सोडला, तर जगांतील बहुतेक सर्व धर्म असेच असहिष्णु व एकांतिक होते व अजूनहि कांही अंशी तसे आहेत. पण तरीहि इस्लामचा सर्वंकषतेचा कडवा आग्रह या सर्वांहून शतपटींनी अधिक आहे. प्रारंभीच्या काळांत तसा तो नव्हता, असे आज अनेक पाश्चात्त्य व पौरस्त्य पंडित म्हणतात. पण तो उदारमताचा, सहिष्णुतेचा तीन-चारषे वर्षांचा काळ संपल्यावर तेव्हापासून पाश्चात्त्य विद्येचा मुस्लिम समाजांत प्रवेश होईपर्यंत इस्लाम हा पराकाष्ठेचा एकांतिक व अंधमतवादी होऊन बसला होता याविषयी फारसे दुमत नाही. आणि अंधमतवाद आला की सर्वंकषता अपरिहार्यच असते. मनुष्याच्या श्वासोच्छ्वासावरहि आपली सत्ता चालावी अशी महत्वाकांक्षा अशा धर्मपीठांची असते. मुस्लिम राष्ट्रांमध्ये गेली सातशे-आठशे वर्षे अशी सर्वव्यापी धर्मसत्ता होती. अशा स्थितीत तेथे इहवाद येणे शक्यच नव्हते. पण एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभापासून आणि विशेषतः उत्तरार्धात पाश्चात्त्य भौतिक विद्या त्या देशांत पसरूं लागली. आणि त्या विद्येमुळे लोकांची मने धर्मसत्तेच्या जाचांतून हळूहळू मुक्त होऊ लागली. बुद्धिजीवी वर्गातील कांही तरुणांची मने तर पूर्णपणे मुक्त झाली. मुस्लिम राष्ट्रांत पूर्णांशाने किंवा बव्हंशाने किंवा अल्पांशाने क्रान्ति घडवून आणून तेथे इहवादी शासनाची स्थापना करण्याचे श्रेय या बुद्धिवादी नेत्यांना आणि त्यांनी लोकांना पढविलेल्या पाश्यात्त्य भौतिक विद्येला आहे.
 पाश्चात्त्य विद्या म्हणजे काय ? रसायन, पदार्थविज्ञान, जीवशास्त्र, स्थापत्य, गणित, खगोलशास्त्र, भूगोलशास्त्र, राजकारण, इतिहास, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, भाषाशास्त्र या जड आणि मानवी शास्त्रांच्या समूहाला पाश्चात्त्य विद्या म्हणतात. गेल्या शंभर-दीडशे वर्षांत आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, पूर्व युरोप या खंडांत जें आमूलाग्र परिवर्तन घडून आले आहे तें या विद्येमुळेच होय. मुस्लिम राष्ट्रहि याला अपवाद नाहीतच. तेव्हा तेथील इहवादाचा उदय आणि विकास यांचें सम्यक् आकलन होण्यासाठी या पाश्यात्य विद्येची मूलतत्त्वं कोणतीं व त्यांतून कोणत्या शक्ति निर्माण होतात हे पाहून मुस्लिम राष्ट्रांत ती तत्त्वें केव्हा, कशी रुजलीं, तीं