पान:इहवादी शासन.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८ । इहवादी शासन
 

शास्त्रज्ञाने नुकतेच प्रकटपणे सांगितले आहे (उक्त म्युनिच बुलेटिन). तेव्हा इतर सामाजिक शास्त्रांच्या बाबतींतहि असाच प्रत्यय येऊन सोव्हिएट दंडराजांना तेथेहि पिसाट धर्मांध वृत्ति सोडून इहवादाकडे वळावें लागेल, असा सुमार दिसूं लागला आहे.
 यूजीन कामेन्का (ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी) यांनी 'बोल्शेव्हिक कालखंडांतील तत्त्वज्ञान' या आपल्या लेखांत असाच आशावाद प्रकट केला आहे. (सोव्हिएट रशियाची पन्नास वर्षे, खंड २ रा समाजप्रबोधन संस्था, पुणे, १९६८). ते म्हणतात, "बोल्शेव्हिकांनी तत्त्वज्ञानाला राजकीय विचारसरणीचं एक उपांग बनवून टाकल्यामुळे रशियांत तत्त्वज्ञानाला पोथीनिष्ठ धार्मिक पंथाचे रूप येणें अटळ होतें. या तत्त्वज्ञानाचे प्रमाणग्रंथ म्हणजे मार्क्स-एंगल्स, लेनिन-स्टॅलिन यांचे ग्रंथ आणि त्यांचे प्रमाण भाष्यकार म्हणजे सोव्हिएट कम्युनिस्ट पक्ष. त्याने केलेल्या भाष्यावर स्तुतिवर्षाव करणे व त्याचाच अनुवाद करणें हें सोव्हिएट तत्त्ववेत्त्यांचे एकमेव कार्य. असे असल्यामुळे समकालीन पाश्चात्य विचारवंतांच्या तुलनेने तर राहु द्याच, पण क्रांतिपूर्वकालीन रशियन तत्ववेत्यांनी बौद्धिक चिकित्सेची आणि विश्लेषणाची जी पातळी गाठली होती तिच्या तुलनेने सुद्धा बोल्शेव्हिक तत्त्ववेत्ते फार थिटे पडतात. सोव्हिएट दंडधरांनी १९२१ सालीच धर्म आणि चिद्-वाद (आयडॲलिझम) यांविरुद्ध एक जोरदार मोहीम सुरू केली; मार्क्सेतर तत्त्वज्ञान सांगणाऱ्या प्राध्यापकांना भराभर स्थानभ्रष्ट करण्यांत आले; आणि आस्कोल्दोव सारख्या अनेक तत्त्ववेत्त्यांना हद्दपार करण्यांत आले. पण १९४७ सालापासून या धोरणांत हळूहळू फरक पडत चालला आणि १९५५ मध्ये जे वादविवाद व विचारमंथन झाले त्यावरून तत्त्वज्ञानांतील पोथीनिष्ठपणा व अंध-सैद्धान्तिक निष्ठा झुगारून देण्याची प्रवृत्ति स्पष्टपणे दिसू लागली आहे, असे म्हणावेसें वाटतें."

विश्वाच्या पसाऱ्याचे रहस्य

 तसें झाल्यास इहवादी वातावरण निर्माण होऊन सोव्हिएट तत्त्ववेत्ते कांहीसे वरच्या पातळीवर जातील हे खरे; पण तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रांत एवढ्याने भागणार नाही. तत्त्वज्ञान, अध्यात्मचिंतन ही मानवी मनाने अनंतांत घेतलेली एक झेप आहे. एक भरारी आहे. सांताच्या बंधनांतून सुटून अनंतांत, अतींद्रियांत अवगाहन करावे ही मानवी मनाची एक आर्त आहे. त्यांतून वैज्ञानिक कसोटीच्या दृष्टीने प्रत्यक्षांत कांही हातीं लागलें नाही, तरी तें अवगाहनच मानवी मनाला भव्यता व विशालता प्राप्त करून देतें. अनंताशीं क्षणकाल, कल्पनेने का होईना, एकरूप होण्याचा आनंद हा पृथ्वीमोलाचा आनंद आहे. आणि त्यासाठी ज्या समाजांतील लोक अखंड धडपड करीत नाहीत तो समाज कायम दरिद्रीच राहणार. मार्क्स व एंगल्स यांची बुद्धि, प्रज्ञा, चिंतनाची ऐपत अत्यंत दरिद्री, भिकारी होती. मानवी जीवनाचें व विश्वाच्या