पान:इहवादी शासन.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कम्युनिस्ट देश । ३९
 

पसाऱ्याचें रह्स्य आकलण्याची त्यांच्या मनाला कुवतच नव्हती. त्यामुळे त्यांच्या सिद्धान्तांच्या बंधनांत जोपर्यंत रशियन तत्त्ववेत्ते गुरफटलेले आहेत तोपर्यंत विश्वचैतन्याची हाक त्यांना ऐकू येणें शक्य नाही व ती नाही तोपर्यंत तो समाज दरिद्रीच राहणार. पण येथपर्यंत मजल गेली नाही, तरी मार्क्सच्या अंध-धर्माच्या शृंखलांतून सुटून तत्त्वज्ञानाचें चिंतन जरी बोल्शेव्हिक पंडित करूं लागले, तरी तें इहवादपोषक होईल यांत शंका नाही.
 विज्ञान, तत्त्वज्ञान, यांच्याप्रमाणेच साहित्याच्या क्षेत्रांतहि वातावरण बदलत चाललें असल्याचीं चिन्हें दिसत आहेत. १९६३ सालीं क्रुश्चेव्ह याने केलेल्या भाषणावरून कम्युनिस्ट पक्षाची मूळ भूमिका बदलली आहे, असें म्हणतां येत नाही. "लेखकांनी, कलावंतांनी पक्षाचीच भूमिका उचलून धरली पाहिजे," असें तो म्हणाला. पण असें असले तरी, प्रत्यक्षांत स्टॅलिनचा सर्वंकष सत्तावाद आता समूळ नष्ट झाला आहे यांत शंका नाही. व्हिक्टर नेक्रासोव्ह हा पक्षाचा सभासद असूनहि त्याने क्रुश्चेव्हवर टीका केली. 'सातासमुद्रापलीकडे' हा त्याचा प्रवासवर्णनात्मक ग्रंथ बंडखोरीने भरलेला आहे. तरी त्याने आपले मत बदलण्याचें व कबुली जबाब लिहून देण्याचें नाकारलें. मागल्या काळीं या अपराधासाठी देहान्तशासन झालें असतें. पण या वेळीं नेक्रोसोव्हला पक्षांतून काढून टाकण्याचे धैर्य सुद्धा दंडराजांना झालें नाही. सिऱ्यावस्की व दानियेल या दोन लेखकांना शिक्षा झाल्या हें खरें. पण त्यांनी केलेली भाषणे, त्यांतील आत्मसमर्थन, हें युग पालटल्याचें लक्षण आहे. स्टॅलिनच्या काळांत अशा लेखकांना, "आपण चुकलों, आपल्याला कम्युनिझम कळला नाही, आपण प्रतिगामी आहोंत, क्रांतिद्रोही आहोंत," असें लिहून माफी मागावी लागे. पण या दोन लेखकांनी तसे करण्याचें नाकारून आपल्या मतांचें व कृत्यांचें जोरदार समर्थन केलें व सोव्हिएट अधिकाऱ्यांविरुद्ध टीका केली. हें लक्षण अगदी निराळें आहे. तें मन्वंतर होत असल्याचे निदर्शक आहे.

तर्कहीन तत्त्वज्ञान

 सोव्हिएट रशियाच्या शासनाचें रूप येथवर आपण पाहिलें. आपल्याल त्याचा इहवादाच्या दृष्टीने विचार करावयाचा होता. त्या दृष्टीने पाहतां असें दिसतें की, प्रारंभापासून तें शासन एका अंध शब्दप्रामाण्यवादी तर्कहीन, भ्रांत अशा तत्त्वज्ञानाच्या, मार्क्स-धर्माच्या शृंखलांनी बद्ध झालेलें होतें व अजूनहि बव्हंशीं तसेंच आहे. पण लेनिन, स्टॅलिन, क्रुश्चेव्ह हे त्या शासनाचे नेते समयज्ञ, व्यवहारवादी व उत्कर्षैकदृष्टि असल्यामुळे प्रसंगाप्रसंगाने त्यांना त्या शृंखला ढिल्या करण्याची बुद्धि झाली व तशा त्यांनी केल्याहि. पण त्यापेक्षाहि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कम्युनिझमची स्थापना हें त्यांचे अंतिम ध्येय असल्यामुळे त्यांना औद्यागीकरणाची कास धरणें अवश्य होतें. त्यासाठी विज्ञानाची उपासना अपरिहार्य होती. हें त्यांच्या