पान:इहवादी शासन.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कम्युनिस्ट देश । ३७
 

निर्भयपणें एकंदर मार्क्सवादावर व विशेषतः विरोध विकासवादावर जाहीरपणें टीका करूं लागले आहेत. १९५८ साली विज्ञानवेत्ते व मार्क्सतत्त्ववेत्ते यांची परिषद् भरली होती; तींत विज्ञानवेत्त्यांनी मार्क्स- तत्त्वावर कठोर टीका करून शासनाला म्हणजे निकिता क्रुश्चेव्हला आपल्या बाजूस वळवून घेतलें. (इन्स्टिटयूट फॉर दि स्टडी ऑफ् यू. एस्. एस्. आर, म्युनिच. या संस्थेचें बुलेटिन, ऑगस्ट १९६४, मार्च १९५९, मे १९६०).
 यानंतर आता आइन्स्टाइनचा सापेक्षतावाद- जो इतके दिवस बूर्झ्वा व क्रांतिविरोधी होता- तो आता मान्य होऊ लागला आहे. आता गणित, रसायन, पदार्थविज्ञान व बरेंचसें जीवशास्त्र हें कम्युनिस्ट पार्टीच्या जाचक बंधनांतून मुक्त झालें आहे. डॉ. स्टीफन योव्हेव हा लेखक यांविषयी लिहिताना म्हणतो, "न्यूक्लर फिजिसिस्ट व बायॉलॉजिस्ट हे गेली दोन वर्ष (१९५८-५९) जाहीरपणें विरोधविकासवादाचा पाया हादरून टाकणारी भाषणे करीत आहेत. याचे रहस्य काय ? कम्युनिस्टांना पाश्यात्त्य लोकसत्तांवर, जागतिक युद्ध न करतां, मात करावयाची आहे. त्यासाठी या शास्त्रांत अत्यंत द्रुतगतीने प्रगति होणे अवश्य आहे. हें ध्यानीं आल्यामुळेच सोव्हिएट दंडसत्तेने ही अपूर्व अशी सहिष्णुता धारण केली आहे. कम्युनिस्ट पार्टीच्या एकविसाव्या अधिवेशनांत क्रुश्चेव्हने स्पष्टपणे सांगितले की, "सोशॅलिझमचा अंतिम विजय हा, लेनिन म्हणतो त्याप्रमाणे, सोव्हिएट रशिया व भांडवली राष्ट्रे यांच्यांत भयानक संघर्ष होऊनच साधतां येईल असे नाही. आर्थिक, राजकीय व तात्त्विक क्षेत्रांत आघाडी मारून तो विजय मिळवितां येईल." यामुळेच केवळ व्यावहारिक कारणांमुळे क्रुश्चेव्हने आपल्या पिसाट, मार्क्सधर्मांध अनुयायांना सध्या लगाम घातला आहे.

सुंभ जळाला तरी-

 मात्र हे सर्व जडशास्त्रांच्या बाबतीत खरे आहे. गणित, पदार्थविज्ञान, रसायन ही प्रमादहीन (एक्झॅक्ट) निरपवाद शास्त्रे आहेत. तेथे नाही- होय म्हणण्याची सोय नाही. म्हणून ज्याला औद्योगीकरण करावयाचें आहे, अद्ययावत् शस्त्रास्त्रांनी सज्ज व्हावयाचें आहे, त्याला त्यांपुढे शरणागति पत्करणे भाग आहे. सोव्हिएट दंडराज तशी ती पत्करीत आहेत. पण सुंभ जळाले तरी पीळ राहतोच या न्यायाने ते अजून इतिहास, अर्थशास्त्र, राजकारण, तत्त्वज्ञान इत्यादि सामाजिक शास्त्रांच्या बाबतींत मार्क्सप्रणीत धर्मांधता सोडण्यास तयार नाहीत. कारण त्यांतील सिद्धान्त वरील शास्त्रांसारखे तंतोतंत, निरपवाद नसतात. जीवनशास्त्राचें थोडेसें तसेंच आहे. गणित- पदार्थविज्ञान यांच्याइतकें तें निरपवाद नाही. त्यामुळे सोव्हिएट शासन त्या बाबतींत मावर्ससादाचे लाड करूं शकले. पण सोव्हिएट रशियांत शेतीचा सर्व विचका झाला तो लायसेंकोच्या अशास्त्रीय मतांच्या समर्थनामुळे झाला, असें एका सोव्हिएट