पान:इहवादी शासन.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६ । इहवादी शासन
 

तशीच विज्ञाननिष्ठेनेहि येते यांत आता शंका राहिलेली नाही. पोपच्या अंध सत्तेशीं विज्ञानवेत्त्यांनी तीन-चार शतकें संग्राम केला. त्यांत तीन-चार लाख लोक बळी गले. पण अखेर विज्ञानाचा विजय झाला. रशियांत हा संग्राम तीस-पस्तीस वर्षां- पूर्वीच सुरु झाला आहे. पण तो दीर्घकाळ चालेल असे पंडितांना वाटत नाही. पुढील दहा-वीस वर्षांतच मार्क्सच्या तत्वज्ञानाला मूठमाती देण्यांत सोव्हिएट शास्त्रज्ञ यशस्वी होतील असे त्यांचे मत आहे.
 एन्. आय्. व्हाव्हिलाव्ह हा यु. एस्. एम्. आर. मधील सायन्स अॅकॅडमीचा विख्यात सभासद होता. १९४३ साली जेनेटिक्स या विज्ञानशाखेतील आपले संशोधन त्याने प्रसिद्ध केलें. त्यांतील निर्णय डायलेस्टिकल मटिरियालिझमच्या अगदी विरुद्ध होते. त्याचे सिद्धान्त जगांतील शास्त्रज्ञांनी मान्य केले होते; पण याच कारणामुळे सोव्हिएट नेत्यांनी त्याच्यावर गहजब केला. त्याला प्रतिगामी, क्रांतिविरोधी ठरविले आणि ते निर्णय बदलण्याची आज्ञा दिली. आणि ती पाळण्याचें नाकारतांच त्याला देहान्ताची शिक्षा देण्यांत आली. बेलो- रशियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस या संस्थेचा अध्यक्ष ॲटन वी शेब्राक हा १९४४ साली मार्क्सच्या विरोधविकासवादाच्या भ्रांत सिद्धान्तापुढे असाच बळी गेला. लायसेको हा त्या वेळी शासनमान्य असा बॉयॉलॉजिस्ट-जीव-शास्त्रवेत्ता होता. मनुष्याचे पिंडगत गुणच तेवढे पुढील पिढीत संक्रांत होतात. संपादित गुण होत नाहीत, असा जगांतील सर्व जीवशास्त्रज्ञांचा सिद्धान्त आहे. पण परिस्थितीने माणूस बदलत असतो या मार्क्स-तत्वाच्या तो विरुद्ध आहे. संपादित गुणहि संक्रांत होतात असा मार्क्सचा सिद्धान्त आहे. लायसेंकोने तो उचलून धरला. त्याला पुरावा नाही. स्टॅलिनची मर्जी हा त्याचा पुरावा. रशियांत यापेक्षा जास्त पुरावा लागत नाही. म्हणून लायसेंकोला विरोध म्हणजे त्या काळी मृत्युला निमंत्रणच होते. पण तसें निमंत्रण पत्करूनहि अनेक शास्त्रज्ञांनी सत्याचाच पाठपुरावा केला. मॅचेस्टर विद्यापीठांतील जीवनशास्त्राचा अध्यापक एरिक ॲसवी हा आपल्या 'सायंटिस्ट इन् सोव्हिएट रशिया' या पुस्तकांत (१९४७) म्हणतो, "स्टॅलिनने कांही बोल्शेव्हिक स्वयंसिद्धान्त म्हणून सांगितलेले आहेत. पण ते सर्व अपसिद्धान्त आहेत. त्यांत सिद्ध असें कांही नाही; तरी ते प्रमाण मानून प्रयोगांनी सिद्ध झालेली सत्ये रशियांत अमान्य केली जातात. एकदा स्टॅलिनने जाहीरपणे सांगितले होते की, "वैद्यकशास्त्रज्ञांना बॉटनी, फिजिक्स हीं शास्त्रे अवगत नसली तरी चालेल, पण विरोधविकासवादाचें ज्ञान मात्र त्यांना असलेच पाहिजे."
 पण या सर्व वल्गना हळूहळू पोकळ ठरणार असें दिसूं लागलें. स्टॅलिनच्या हयातीतच शस्त्रास्त्रांच्या जागतिक स्पर्धेत रशियाला विजय मिळवावयाचा असेल, तर गणितज्ञ व पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ यांशीं विरोध करणें परवडणार नाही, हें सोव्हिएट शासनाच्या ध्यानांत येऊं लागलें होतें. शेवटच्या काळांत या शास्त्रज्ञांच्यापुढे स्टॅलिनहि नमते घेऊं लागला होता. त्याच्या मृत्यूनंतर तर आता शास्त्रज्ञ