पान:इहवादी शासन.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कम्युनिस्ट देश । ३५
 

 आज पंचवीस वर्षांनी रशिया तसा मुक्त झालेला नाही; पण तसा तो मुक्त होण्याची चिन्हें दिसत आहेत, हें खरें आहे. तसा तो मुक्त होणें अपरिहार्यच आहे. कारण लष्करी सामर्थ्याची वाढ व औद्योगीककरण हा कम्युनिझमकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे, हा सोव्हिएट नेत्यांचा प्रारंभापासूनच सिद्धान्त आहे आणि विज्ञानाची उपासना केल्यावांचून औद्योगीकरण अशक्य आहे, हेंहि ते प्रथमपासूनच जाणत आहेत, सांगत आहेत. त्यामुळे विज्ञान आणि भौतिक विद्या यांचे शिक्षण समाजाला देण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. तेथे शाळा- महाशाळांतून जास्त भर शास्त्रीय विषयांवर व तंत्रविद्येवरच असतो. शे. ६५ विद्यार्थी शास्त्र- शाखेकडेच जातात. शालेय शिक्षणक्रमांत १० वर्षे गणित, ४ वर्षे रसायन, ५ वर्षे पदार्थविज्ञान व ६ वर्षे जीवनशास्त्र यांचा अभ्यास विद्यार्थ्यांना करावा लागतो. १९५८ च्या हिशेबाप्रमाणे रशियांत ७६७ उच्च शिक्षणसंस्था असून, त्यांत वीस लक्ष विद्यार्थी शिक्षण घेत होते. यांतील १९३ संस्था इंजिनियर तयार करतात. १९५७ साली या संस्थांतून ७७,००० इंजिनियर तयार झाले. एका मॉस्को विद्यापीठांतच १६,००० विद्यार्थी असून त्यांतील ८,००० विद्यार्थिनी आहेत. या विद्यापीठांत १७०० प्रयोगशाळा असून २४०० प्राध्यापक आहेत. ही सर्व माहिती 'इन्साइड रशिया टुडे' या आपल्या ग्रंथांत देऊन जॉन गुंथर म्हणतो, "आज विज्ञानाचें शिक्षण घेतलेला एक मोठा वर्ग तेथे तयार होत आहे. शास्त्रीय रीतीने विचार करण्याचें शिक्षण त्याला दिले जात आहे. हा वर्ग पुढील काळी स्वतंत्र विचारशक्ति प्राप्त करून घेईल यांत शंका नाही." वेंडेल विल्की याने स्टॅलिनची मुलाखत घेतली त्यावेळी या शिक्षणाचा उल्लेख करून विल्की म्हणाला, "स्टॅलिनसाहेब, जपून असा. या शिक्षणप्रसारामुळेच एखादे दिवशी आपण पदच्युत होण्याचा संभव आहे." मार्क्स म्हणत असे की, "कॅटिपटॅलिझमच्या अभ्यंतरांतच त्याच्या नाशाची बीजें असतात," हें कांही खरें ठरणार नाही. पण मार्क्सवादाला विज्ञानप्रसार व औद्योगीकरण ही अवश्य असल्यामुळे त्याच्या अंतरांतच त्याच्या नाशाचीं बीजें आहेत हें मात्र खरें ठरणार असें दिसतें. मार्क्सचा विरोध विकासवाद अन्यत्र नाही, तरी त्याच्याच तत्त्वज्ञानाच्या बाबतींत खरा ठरत असल्याचें समाधान कम्युनिस्टांना मिळत आहे, हें कांही थोडें नाही.

शास्त्रज्ञांचा संग्राम

 पण हा विचार क्षणभर बाजूला ठेवला तरी अंध-धर्मांचें, धर्मपीठाच्या अनियंत्रित सत्तेचें, पोपसारख्या बलाढ्य धर्माधिकाऱ्यांचे वर्चस्व झुगारून देण्याची शक्ति विज्ञानाच्या ठायीं असते, हें कोपरनिकस, केप्लर, गॅलिलिओ, वेकन, न्यूटन यांनी मध्ययुगाच्या इतिहासांत दाखवून दिलेलें आहे. तोच इतिहास आज रशियांत घडत आहे. धर्मनिष्ठेमुळे जशी प्राणपणाने शत्रूशी लढण्याची शक्ति माणसांच्या अंगीं येते