पान:इहवादी शासन.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४ । इहवादी शासन
 

कोणाहि व्यक्तीच्या, संस्थेच्या वा रूढीच्या मुरवतीस्तव त्याला सत्याला मुरड घालावी लागत नाही, असें वातावरण भौतिक विद्यांना अवश्य असते. येथवर आपण जें विवेचन केले आहे त्यावरून हें सहज ध्यानांत येईल की, सेक्युलॅरिझमचा, इहवादाचा हाच अर्थ आहे. पाश्चात्त्य देशांनी याच तत्त्वांचा आश्रय करून गेली तीन-चार शतकें भौतिक विद्येची उपासना केली व आपला उत्कर्ष साधला. स्पेन, इटली इत्यादि ज्या देशांनी हा इहवाद स्वीकारला नाही ते देश मागे पडले, स्पर्धेत पराभूत झाले. तेव्हा इहवादाचीं वरील तत्त्वें व रसायन पदार्थविज्ञान, जीवशास्त्र, गणित, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, इतिहास, राजकारण, नीतिशास्त्र इत्यादि भौतिक विद्या यांच्यांत कार्यकारणसंबंध आहे हे उघड आहे. त्यामुळे रशिया जर इहवादी असता तर तेथेहि आरंभापासून या भौतिक विद्यांच्या प्रगतीच्या मार्गात कोणताच अडसर येण्याचे कारण नव्हते.

बौद्धिक गुलामगिरी

 पण रशिया इहवादाच्या घोषणा करीत असला तरी इहवादाचीं वरील तत्त्वें त्याने प्रारंभापासूनच त्याज्य मानली होती. आणि याचे कारण म्हणजे सोव्हिएट नेत्यांनी पत्करलेलें मार्क्स-धर्माचं दास्य व तज्जन्य बौद्धिक गुलामगिरी हे होय. २५ जून १९१८ या दिवशीं लेनिनच्या शासनान्वये कम्युनिस्ट ज्ञानपीठाची स्थापना करण्यांत आली. त्याच वेळी 'शास्त्रीय' समाजवादाच्या मार्क्सवादाच्या तत्त्वान्वये सर्व शास्त्रांचा अभ्यास करणें हें त्याचें ध्येय ठरविण्यांत आले. १९२६ साली पुन्हा हे ध्येय स्पष्ट करण्यांत आलें. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र इतिहास, इत्यादि सामाजिक शास्त्रांचा व रसायन पदार्थविज्ञान, भूगोल, खगोल इत्यादि भौतिक शास्त्रांचा मार्क्स-लेनिन- वादाच्या सिद्धान्तांन्वये विकास करणें हें या ज्ञानपीठाचें उद्दिष्ट आहे, असें निःसंदिग्धपणे सांगण्यांत आलें. सिडने वेब यांनी आपल्या 'सोव्हिएट कम्युनिझम' या ग्रंथांत या धार्मिक वृत्तीवर सौम्यपणे पण स्पष्ट टीका केली आहे. ते म्हणतात की, "पुष्कळ वेळा वस्तुस्थिति व घटितें यांवरून निर्णय करण्याऐवजी मार्क्स- स्टॅलिन- वचनांच्या आधारे निर्णय केला जातो. वास्तविक शंभर वर्षांपूर्वी मार्क्सने लिहिलेल्या वचनांना अजूनहि चिकटून राहणे, विरोध-विकास- वादाच्या दृष्टीनेच सयुक्तिक नाही. कारण जग सारखे बदलत आहे, हा त्या तत्त्वज्ञानाचाच सिद्धान्त आहे. पण सोव्हिएट नेते हे लक्षांत घेत नाहीत. ख्रिश्चन धर्मगुरु बायबलवचनान्वये सत्य निर्णय करीत, हे नेते मार्क्सवचनान्वये करतात, एवढाच फरक. गणितशास्त्र, वैद्यक, जीवशास्त्र यांत आम्ही पार्टीच्या दृष्टीनेच सत्यासत्य निर्णय करतो, असे ते अभिमानाने सांगतात. या शब्दप्रामाण्याच्या रोगांतून सोव्हिएट रशिया लवकरच मुक्त होईल अशी आशा आहे." (सोव्हिएट कम्युनिझम आवृत्ति, १९४४, पृष्ठे ७७८- ८०७).