पान:इहवादी शासन.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कम्युनिस्ट देश । ३३
 

असतात. रशियांत हीं बीजें कशीं धुमारत आहेत याचा विचार पुढे करावयाचा आहे. तत्पूर्वी नवी कुटुंबसंस्था हेंच कार्य कसें करीत आहे तें पाहूं.
 कुटुंब हा राष्ट्राचा मूळ घटक असून समता, स्वातंत्र्य, जबाबदारी याच तत्त्वांवर त्याची पुनर्रचना नव्या जगांत होत आहे. सोव्हिएट कुटुंबसंस्थेचें विवेचन वर केलेंच आहे. त्यावरून हे ध्यानांत येईल की, त्यांतील स्त्री ही आता नागरिक झालेली आहे. ती पूर्वीची परस्वाधीन जिणे असलेली, बाहेरच्या सार्वजनिक जीवनापासून अलिप्त असलेली, अज्ञानांत रुतलेली अशी दासी आता राहिलेली नाही. रशियाच्या अणुसंशोधन खात्यांत जे तीस-चाळीस हजार लोक आहेत त्यांत निम्म्या स्त्रिया आहेत, हें ध्यानांत घेतल्यावर ही केवढी मोठी क्रांति आहे हें सहज उमगेल. हे नव्या कुटुंबसंस्थेचें देणें आहे. मुलांच्या दृष्टीनेहि तीच क्रांति झालेली आहे. पित्याची अनियंत्रित सत्ता आता कुटुंबांत चालत नाही. त्यामुळे कुटुंबांत राहूनहि मुलांच्या मनाचा स्वतंत्रपणे विकास होऊ शकतो. नव्या काळांत दंडायत्त देशांतहि कुटुंबसंस्थेतील हें परिवर्तन अपरिहार्य आहे. स्त्रीची शक्ति धनोत्पादन, समाज- व्यवहार, राष्ट्रीय प्रपंच यांसाठी लाभावी व मुलांच्या मनावर साम्यवादाचे संस्कार करतां येऊन कम्युनिझमच्या निर्मितीला अवश्य तीं नवीं माणसें राष्ट्राला मिळावी यासाठीच तर सोव्हिएट नेत्यांनी कुटुंबसंस्था आमूलाग्र बदलून टाकली. मातृत्व, पातिव्रत्य मातृ-पितृभक्ति इत्यादि सनातन तत्त्वांचा त्यांनी पुन्हा स्वीकार केला असला तरी, झारशाहीतले कुटुंब व सोव्हिएटशाहीतले कुटुंब यांत जमीन- अस्मानाचें अंतर आहे. आणि समता, व्यक्ति स्वातंत्र्य या तत्त्वांमुळेच तें अंतर पडले आहे.
 तेव्हा सोव्हिएट शासन जरी मार्क्सच्या अंध, वुद्धिशून्य धर्माच्या प्रभुत्वाखाली असले, तरी राष्ट्रसामर्थ्याच्या जोपासनेची त्याला आकांक्षा असल्यामुळे त्या धर्माचें जोखड झुगारून देण्यावांचून त्याला गत्यंतरच नव्हतें. प्रारंभापासूनच त्याने कळत नकळत ती बंधने ढिली करण्यास अपरिहार्यपणे प्रारंभ केलेला आहे. त्यावांचून रशिया हें राष्ट्र झाले नसते. त्यावांचून कुटुंबसंस्था टिकली नसती. त्यावांचून त्याला जर्मनीवर विजय मिळवितां आला नसता आणि त्यावांचून चंद्रावर स्वारी करतां आली नसती.


 सोव्हिएट शासन हे खरेखुरें इहवादी शासन असतें तर कम्युनिस्ट लोकांच्या हाती सत्ता आल्यानंतर भौतिक विद्यांची अविरोध प्रगति झाली असती. पूर्ण व्यक्ति- स्वातंत्र्य, बुद्धिप्रामाण्य, वस्तुनिष्ठ सत्यसंशोधन हा भौतिक विद्यांचा पाया आहे. कोणतीहि धार्मिक व सामाजिक बंधनें संशोधकाच्या प्रज्ञेला शृंखलाबद्ध करीत नाहीत, सत्य प्रकटन करतांना त्याच्या मनाला कसलीह भीति वाटत नाही,
 इ. शा. ३