पान:इहवादी शासन.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२ । इहवादी शासन
 

हें तिचेंच फल आहे. या विज्ञानसंग्रामचें सविस्तर विवेचन पुढील लेखांत करावयाचें आहे. येथे रशियाच्या प्रगतीला कारणीभूत झालेल्या आणखी एक-दोन कारणांचा विचार करूं.
 त्यांतलें प्रधान कारण म्हणजे राष्ट्रनिष्ठा हे होय. मार्क्सवाद हा मूलतः राष्ट्रवादाच्या विरुद्ध आहे. पण १९२६ माली एकराष्ट्रीय समाजवादाचा पुरस्कार करून स्टॅलिनने सोव्हिएट रशियाला राष्ट्रधर्माची दीक्षा दिली. आणि तेव्हापासून आजपर्यंत सोव्हिएट नेते या महाप्रेरणेची शाळा- महाशाळांतून सतत जोपासनाच करीत आहेत. या निष्ठेने प्रेरित झालेला मनुष्य पराक्रमाच्या केवढ्या कोटि करतो हें कांही सांगावयास नको. तेव्हां सोव्हिएट रशियाची प्रगति मार्क्सवादाने झाली नसून, मार्क्सतत्त्व झुगारून राष्ट्रवादाचा अंगीकार केल्यामुळे झालेली आहे, हें आपण ध्यानांत ठेविलें पाहिजे.
 या राष्ट्रवादाचें जें मूळ महातत्त्व त्याकडे आपण लक्ष दिल्यास रशियाच्या प्रगतीचे रहस्य चटकन उलगडेल. राष्ट्रवादांत समाजांतील प्रत्येक व्यक्ति म्हणजे समाजाचा एक जबाबदार घटक अशा दृष्टीने तिच्याकडे पाहिलें जातें. जुन्या राजसत्तेंत व्यक्तीला हें स्थान नव्हते. तिला स्वतंत्र अस्तित्व असें नव्हतें. ती राजाची प्रजा होती. समाजाच्या चिंतेचा भार तिच्यावर नव्हता. तो राजावर होता. राष्ट्रवादी समाजरचनेत मुख्य फरक हा होता की, प्रत्येक व्यक्ति ही नागरिक असून, समाजाच्या उत्कर्षापकर्षांत तिचा वांटा आहे, ती त्याला जबाबदार आहे, हा विचार महत्त्वाचा मानला जातो व नागरिकांच्या मनांत तो रुजविला जातो. हें फार मोठें मानसिक परिवर्तन आहे. व्यक्तीच्या अस्मितेचा त्यामुळे परिपोष होऊन स्वातंत्र्य, समता, बंधुता, बुद्धिप्रामाण्य याविषयी आकांक्षा तिच्या मनांत निर्माण होतात व त्यासाठी झगडा करण्याचें मानसिक व नैतिक सामर्थ्य तिला प्राप्त होतें. रशियन विद्यार्थ्यांना हे बाळकडू आज चाळीस वर्षे पाजले जात आहे.
 अर्वाचीन काळांत शासन जरी दंडायत्त असले तरी जुन्या काळच्या सुलतानाप्रमाणे अनियंत्रित सत्ता त्याला दीर्घकाळ कदापि चालवितां येणार नाही. कारण सर्व समाज जागृत करून, त्याची राष्ट्रनिष्ठेच्या तत्त्वावर संघटना करून, तें बळ दंडशहांना आपल्या पाठीशी उभे करावेंच लागतें. त्यावांचून त्यांची दंडसत्ता चालणार नाही, कोसळून पडेल. आणि देशांतील लोकांना राष्ट्रनिष्ठ नागरिक बनविणे म्हणजे आपण होऊनच आपल्या दंडसत्तेला सुरुंग लावण्यासारखे आहे. अर्वाचीन दंडसत्तांना औद्योगीकरण करणेंहि अपरिहार्य असतें. तें करावयाचें म्हणजे विज्ञान- संशोधन, भौतिक विद्यांचा प्रसार, वस्तुनिष्ठ सत्यदर्शन यांचे संस्कार विद्यार्थ्यांच्या मनावर करणें हें अपरिहार्य ठरते. पण भौतिक विद्या ही शक्तीच अशी आहे की, ती मनुष्याला निर्भय बनवून अनियंत्रित सत्तेशी मुकाबला करण्याचे सामर्थ्य प्राप्त करून देतें. याचा अर्थं असा की, दंडसत्तेच्या अंतरांतच तिच्या नाशाची बीजें