पान:इहवादी शासन.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कम्युनिस्ट देश । ३१
 

पक्षाचा चिटणीस ग्लेवाव्ह हा एक मोठा अधिकारी होता. तो टॉलस्टॉयबद्दल जाहीरपणें सांगत असे की, "स्टॉलस्टॉय हा जमीनदारवर्गांतला मनुष्य होता. त्याने आपल्या सर्व आयुष्यांत स्वतःच्या वर्गाच्या हिताचीच जपणूक केली होती व त्याच्या साहित्यांत त्याची तीच वृत्ति दिसून येते. तेव्हा त्याच्या लेखनांत अभिजात असें कांही असणें शक्यच नाही." १९६७ साली मॉस्को येथे सोव्हिएट लेखकांचा मेळावा भरला होता. त्याला उद्देशून अलेक्झांडर सोल्शेनित्सिन या लेखकाने एक अनावृत पत्र लिहिलें होतें. त्यांत त्याने रशियांतील साहित्यविषयक धोरणावर कडक टीका केली आहे. तो म्हणतो, "विश्व-साहित्यांत मानाचें स्थान लाभलेली दोस्तोवस्कीचीं पुस्तकें देखील एके काळी आमच्या देशांत प्रसिद्ध केली जात नव्हती. शैक्षणिक अभ्यासक्रमांतून त्याचीं पुस्तकें वगळण्यांत आली होती. त्याची त्या वेळीं फार नालस्ती करण्यांत येत असे. येसिनिन, मायक्रोव्हस्की यांच्या साहित्यावरहि असाच क्रांतिविरोधी म्हणून शिक्का मारून त्यांना बदनाम करण्यांत आलें होतें. सोव्हिएट साहित्यावर शासकीय नियंत्रणाचें असें जोखड पडलें आहे. हें नियंत्रण हा मध्ययुगांतील एक अवशेष असून एखाद्या मेथुसेलाप्रमाणे एकविसाव्या शतकापर्यंत जिवंत राहण्याचा त्याने निर्धार केलेला दिसतो. पण खेदकारक गोष्ट अशी की, या नियंत्रणांत कोणतेंहि तत्त्व नाही. सेन्सॉरबोर्ड 'सिद्धान्तप्रणालीच्या दृष्टीने हानिकारक', 'प्रमादपूर्ण', 'मार्गभ्रष्ट' असे शिक्के मारते. पण हे शिक्के सारखे बदलत असतात. आमच्या डोळ्यांदेखत ते अनेक वेळा बदललेले आहेत." टॉलस्टॉय- विषयीच्या ग्लेवाव्हच्या मताचा उल्लेख वर केलाच आहे. युद्धाचा समय प्राप्त होतांच सोव्हिएट शासनाचें त्याच्या विषयीचें मत बदललें. रशियाचा तो एक अमर अभिजात लेखक होय असें आता ठरलें आहे.
 वरील उदाहरणांवरून सोव्हिएट रशियांत शिक्षणावर व एकंदर जीवनावर जुन्या काळी पाश्चात्त्य जीवनावर जसे पोप-धर्माचें प्रभुत्व होतें, तसेंच आज मार्क्स-धर्माचं प्रभुत्व आहे, असें दिसून येईल. हा नवा धर्म त्या जुन्या धर्माइतकाच अंध, पिसाट व बुद्धिशून्य असा आहे. अशा धर्माच्या छायेंत असणारें शिक्षण इहवादी आहे असें कदापि म्हणतां येणार नाही. मग इहवाद, बुद्धिप्रामाग्य, व्यक्तिस्वातंत्र्य, वस्तुनिष्ठ संशोधन यांचा व राष्ट्रीय उत्कर्षाचा कांहीच संबंध नाही असे म्हणावयाचें काय ? तसें नसेल तर सोव्हिएट रशियाच्या प्रगतीची संगति कशी लावावयाची ?
 याचें उत्तर असें आहे की, पाश्चात्त्य युरोपांत ज्याप्रमाणे पोपच्या धर्मसत्तेविरुद्ध शास्त्रसंशोधक आणि तत्त्वचिंतक संग्राम करीत होते आणि त्या संग्रामांत विज्ञाननिष्ठेमुळे, स्वातंत्र्यनिष्ठेमुळे आत्मबलिदान करीत होते, तसेच सोव्हिएट रशियांतहि तत्त्वनिष्ठ लोक मार्क्स धर्माविरुद्ध प्रारंभापासूनच लढा करून मृत्युदंड सोशीत होते. विज्ञानसंशोधनाला जी विश्वाविरुद्ध ताठ उभें राहण्याची शक्ति अवश्य असते, ती रशियांतील शूर संशोधक जोपाशीत होते आणि रशियाची प्रगति