पान:इहवादी शासन.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३० । इहवादी शासन
 

(तसाच रशियाचाहि) हें मार्क्सचे लाडकें मत त्यांत प्रतिपादिले होते. तेव्हा ठपका द्यावयाचाच तर मार्क्स, लेनिन यांना द्यावयास हवा होता. पण हे महापुरुष प्रमादातीत आहेत, ते चुकणें शक्य नाही अशी सोव्हिएट शासनाची श्रद्धा आहे. चुकला असेल तर तो पोकाव्हस्की ! पीटर दि ग्रेट, अलेक्झँडर नेव्हस्की यांच्या जीवनाचें खरें मर्म त्याला कळलेच नाही. जगाचा इतिहास वर्गविग्रहाचा असला तरी रशियाचा तसा नव्हता, हें त्याला कळायला हवें होतें. तें त्याला कळले नाही. म्हणजे त्याला मार्क्सवादच कळला नाही. अशा माणसाचा इतिहास मुलांना कसा नेमावयाचा ?
 'टेन डेज दॅट शूक दि वर्ल्ड' या जॉन रीडच्या पुस्तकाची हीच गत झाली. १९१७ साली झालेल्या रशियन क्रांतीचें त्यांत उत्तम वर्णन असून, रशियांत ऑक्टोबर क्रांतीच्या या स्तोत्राला प्रारंभी फार मोठी प्रतिष्ठा लाभली होती; पण स्टॅलिन सत्तारूढ झाल्यावर हें पुस्तक जप्त करण्यांत आलें. कारण त्यांत स्टॅलिनचें स्तवन मुळीच नव्हतें. आणि तो तर क्रांतीचा खरा शिल्पकार ! त्याचें स्तवन नसणें हा खरा मार्क्स वाद नव्हे ! असलें पुस्तक नष्ट केलेच पाहिजे आणि त्याच्या आधारे सेरजी आइन्स्टाइन याने काढलेला चित्रपटहि ! प्रारंभी अत्यंत लोकप्रिय असलेला हा चित्रपट उत्तरकाळांत आक्षेपार्ह ठरविण्यांत आला व सेरजीलाहि जगांतून नाहीसें करण्यांत आलें.
 १९३० साली ऑस्ट्रोहिट्यानाव्ह या अर्थशास्त्रज्ञाने 'औटलाईन्स ऑफ् पोलिटिकल एकॉनमी' हा ग्रंथ लिहिला. स्टॅलिनची मर्जी त्या वेळीं त्याच्यावर सुप्रसन्न असल्यामुळे त्याला 'कम्युनिस्ट अर्थशास्त्राचा आधारभूत ग्रंथ' म्हणून मान्यता मिळून तो सर्व विद्यापीठांत लावला होता. पण त्याची सद्दी दहा वर्षे टिकली. त्यानंतर दंडराजाची मर्जी फिरली. 'लेनिनची चुकीची अवतरणें दिलीं,' 'लेलिनस्टॅलिनचे बनावट संवाद दिले,' असे त्याच्यावर आरोप ठेवण्यांत आले व त्या क्षीणपुण्य ग्रंथकाराला खाली लोटून देण्यांत आलें. युद्धसमाप्तीच्या वेळीं स्टॅलिनचें अमेरिकेविषयी चांगलें मत होतें. तें ध्यानीं घेऊन डॉ. युजीन वार्गा याने "मार्क्स मताप्रमाणे भांडवली देशांत पुनः पुन्हा येणारें आर्थिक अरिष्ट अमेरिकेत मात्र येणार नाही" असें प्रतिपादन आपल्या 'कॅपिटॅलिस्ट एकॉनमी आफ्टर दि वॉर' या ग्रंथांत केलें. पण स्टॅलिन जरी अमेरिकेविषयी बाह्यतः बरें बोलत असला, तरी त्याच्या मनांत तसें नव्हतें. त्यामुळे वार्गाला प्रायश्चित्त भोगावें लागलें. तो पदच्युत झाला व डॉ. शेरिलॉव्ह हा अमेरिकेविषयी 'खरें' मत मांडणारा ग्रंथकार त्याच्या पदावर आला. मग त्याचीं पुस्तकें पाठ्यपुस्तकें म्हणून शाळा- महाशाळांतून अभ्यासली जाऊं लागलीं.
 साहित्याच्या अध्यापनाच्या बाबतींत इहवादाची अशीच मार्क्सवादी विटंबना रशियांत चालू आहे. दुसऱ्या महायुद्धापूर्वी मॉस्कोच्या शिक्षणखात्यांत कम्युनिस्ट