पान:इहवादी शासन.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कम्युनिस्ट देश । २९
 

निर्माण करून त्या बळावर मोठी कार्ये साधली. आज मार्क्सप्रणीत धर्माला तें साधावयाचें आहे म्हणून त्या धर्माचे अनुयायी जे सोव्हिएट नेते त्यांनी त्याला पोथिनिष्ठ अंध-सिद्धान्तांचें रूप दिलें आहे व त्या धर्माचे दृढ संस्कार विद्यार्थ्यांच्या मनावर कमीत कमी दोन तपें करणें हें शिक्षणाचें कार्य आहे, असें ठरवून टाकले आहे.
 कोणत्याहि अंध-सिद्धान्ताचे (डॉग्मा) शासनावर व जीवनावर वर्चस्व नसणें, त्याचे व्यवहार बुद्धिवादाने चालणें हें इहवादाचें, सेक्युलॅरिझमचें महत्त्वाचें लक्षण होय. त्या दृष्टीने पाहतां मार्क्सप्रणीत तत्त्वज्ञानाच्या अंध आग्रहामुळे रशियन शासनाच्या इहवादाला मोठा बाध येतो. पण एवढ्यावरच हें थांबत नाही. या मार्क्स धर्माचा राजकारणाशीं सोव्हिएट नेत्यांनी अविभाज्य संबंध जोडलेला असल्यामुळे त्याला अत्यंत विकृत असें रूप प्राप्त झालेलें आहे. दर वेळीं राजकीय परिस्थितीप्रमाणे व राजकीय धोरणाप्रमाणे आणि कित्येक वेळा केवळ दंडराजांच्या लहरीप्रमाणे मार्क्स तत्त्वांचा अर्थ लावला जातो व त्यांनीच मंजूर केलेला जुना अर्थ त्याज्य ठरवून, त्याचें अपश्रेय दुसऱ्याच्या माथी मारून, त्याला शिक्षा केली जाते. मार्क्सवाद व त्यावरचें दरवेळचें नवें राजकीय भाष्य यांचा शिक्षणावर काय परिणाम होतो हें पाहणें मोठें उद्बोधक होईल.

पद्धतशीर विटंबना

 धर्माभिमानाप्रमाणेच मार्क्सवादाला पूर्वपरंपराभिमान हाहि निषिद्ध, प्रतिगामी, क्रांतिविरोधी असा वाटतो. त्यामुळे रशियाचा खरा इतिहास १९१७ साली सुरू झाला, त्याच्या मागला इतिहास हा भांडवली, जमीनदारी जुलमाचा, वर्गविग्रहाचा असून, त्यांत अभिमानास्पद कांही नाही, असें सोव्हिएट पंडितांचे प्रथम मत होते. सत्ता हाती येतांच पोक्राव्हस्की या लेखकाकडून लेनिनने या धोरणाने इतिहास लिहवून घेतला, त्याला स्वतः प्रस्तावना लिहिली व सर्व विद्यालयांतून तें पुस्तक पाठ्यपुस्तक म्हणून नेमून टाकले. रशियांतील प्राचीन काळचे राजे, सरदार, सेनापति यांच्याविषयी, ते कष्टकरी जनतेच्या विरुद्ध म्हणून, तरुण पिढीच्या मनात कमालीचा तिटकारा निर्माण करावा अशा हेतूनेच पोकाव्हस्कीने तें पुस्तक लिहिलें होतें. पण १९३६ सालच्या सुमारास जर्मन आक्रमणाचें भय दिसूं लागतांच धर्माप्रमाणेच परंपराभिमानाविषयीचें सोव्हिएट शासनाचें– म्हणजे स्टॅलिनचें- मत वलदलें व त्याने पोक्राव्हस्कीवर भडिमार सुरू केला. त्याला पदभ्रष्ट केलें व शेस्टॉकॉव्ह या पंडिताकडून दुसरा इतिहास लिहवून घेऊन तो शाळांत नेमला. वास्तविक पोक्राव्हस्कीचा इतिहास सोव्हिएट शासनानेच लिहवून घेतला होता, मंजूर केला होता, लेनिनने त्याला प्रस्तावना लिहिली होती. आतापर्यंतचा जगाचा इतिहास हा वर्गविग्रहाचा इतिहास आहे,