पान:इहवादी शासन.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८ । इहवादी शासन
 

 धर्माविषयी मार्क्सवादाचें काय मत आहे तें प्रारंभीच्या लेखांत आपण सविस्तर पाहिलेंच आहे. तेव्हा सोव्हिएट शिक्षणक्रमांत धर्माला स्थान नाही हे उघडच आहे. सत्ता हातीं येतांच रशियन शास्त्यांनी धर्मपीठाकडून शिक्षण व शिक्षणसंस्था सर्व काढून घेतल्या; पण यांत कांही विशेष नाही. पश्चिम युरोपांतील बहुतेक सर्व देशांनी हें धोरण याआधीच अवलंबिलें होतें. तसें त्यांनी केलें नसतें, तर त्यांची झाली ही प्रगति झालीच नसती. सोव्हिएट रशियाचा विशेष हा की, नित्याच्या शालेय शिक्षणांतून तर त्यांनी धर्म हा विषय काढून टाकलाच. पण रशियांत धर्मशिक्षण देणाऱ्या संस्था असतांच कामा नयेत, असा दंडक त्याने जारी केला. "शिक्षणांत धार्मिक शिक्षणाला वाव असतां कामा नये" असें लेनिनने मे १९१७ मध्ये जो शिक्षणविषयक कार्यक्रम जाहीर केला त्यांत एक कलमच आहे.

शिक्षणाचे उद्दिष्ट

 विद्यार्थ्यांचा मनोविकास व्हावा, त्यांच्या सुप्त सद्गुणांचे संवर्धन व्हावें, त्यांच्या मनावर चांगले संस्कार व्हावे, असा सर्वसाधारण शिक्षणाचा हेतु असतो. सोव्हिएट नेत्यांना हे सर्व अभिप्रेत आहेच. पण मनोविकास, गुणसंवर्धन, सुसंस्कार हें सर्व एका विशिष्ट दृष्टीने झाले पाहिजे असा त्यांचा कटाक्ष आहे. त्यांना देशांत प्रथम समाजवाद स्थापावयाचा आहे व पुढे कम्युनिझममध्ये त्याची परिणति करावयाची आहे. या उद्दिष्टाच्या सिद्धीचें साधन म्हणून ते शिक्षणाकडे पाहतात. केवळ चारित्र्यविकास, शीलसंवर्धन या दृष्टीने नव्हे. ज्याच्या चारित्र्य, शील या शक्ति कम्युनिझमच्या उभारणीसाठी उपयोगी पडतील असा नवा कम्युनिस्ट मानव त्यांना हवा आहे. असा मानव निर्मिणे हे त्यांच्या शिक्षणाचे ध्येय आहे आणि अध्यापनाचे विषय, अध्यापनपद्धति, शिक्षकांची गुणवत्ता, अध्यापनाचा काल हे सर्व त्या ध्येयानुसार ते ठरवितात.
 कम्युनिस्ट समाजरचना हें उद्दिष्ट असल्यामुळे शिक्षणांत मार्क्सवादाला अग्रस्थान असावें हें ओघानेच येतें. विरोधविकासवाद, ऐतिहासिक जडवाद, वर्गविग्रह व श्रममूल्य सिद्धान्त असे मार्क्सवादाचे चार मूलभूत सिद्धान्त आहेत. त्यांचें वर्चस्व सर्व रशियन जीवनावर आणि अर्थातच शिक्षणावरहि आहे. जुन्या काळीं बायबलवर श्रद्धा ठेवून त्यांतील तत्त्वें व आज्ञा शिरसावंद्य मानल्या पाहिजेत, हा जसा दंडक होता तसाच मार्क्सच्या सिद्धान्ताविषयी रशियांत दंडक आहे. मार्क्सच्या सिद्धान्तांचं मूल्यमापन करण्याचा कोणालाहि तेथे अधिकार नाही. शाळा- महाशाळांत ते सिद्धान्त शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजावून द्यावयाचे, त्यांच्या मनांत रुजवावयाचे व इतर सिद्धान्त विचारांत घेण्याइतपत सुद्धा योग्यतेचे नाहीत, हें त्यांच्या मनावर अहोरात ठसवावयाचें एवढेच शिक्षकांचें काम. कडव्या आग्रहांत अतिशय सामर्थ्य असतें, बळ असतें. पूर्वी ख्रिश्चन धर्म, इस्लाम यांनी असा आग्रह