पान:इहवादी शासन.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६ । इहवादी शासन
 

कारण सध्या सोव्हिएट शास्त्रज्ञच विरोधविकासवाद अगदी अशास्त्रीय आहे असें सांगू लागले आहेत. स्टॅलिनने या अपराधाबद्दल अनेक शास्त्रज्ञांना देहान्तशासन दिलें होतें. पण आता ती हानि परवडणार नाही, हें ध्यानांत आल्यामुळे सोव्हिएट नेते थोडी माघार घेत आहेत. या प्रकरणाचा विचार आपल्याला पुढे सविस्तर करावयाचा आहे. येथे धर्माच्या दृष्टीने थोडा विचार करून हा लेख संपवू.
 कुटुंबप्रेम, मातृप्रेम, पत्नीप्रेम, अपत्यप्रेम ही जशी मानवी जीवनांतली मोठी प्रेरणा आहे तशीच धर्म हीहि प्रेरणा आहे. तेव्हा कुटुंबनिष्ठा, मातृभक्ति, पातिव्रत्य, वैवाहिक नीति यांची जशी सोव्हिएट नेत्यांनी इहवादाच्या भूमिकेतूनच जोपासना केली तशीच धर्मश्रद्धेची जोपासना करणें अवश्य आहे. ही श्रद्धा कार्यस्फूर्ति देण्यास तितकीच अवश्य आहे, समर्थ आहे हें युद्धकालीन घडामोडींवरून प्रत्यक्षच ध्यानांत आलेले आहे. तेव्हा धर्मश्रद्धेच्या जोपासनेमुळे सेक्युलॅरिझमला बाध येईल असें मानण्याचें कारण नाही. इहवादी शासनाने कोणत्याच धर्माचारांत शासन म्हणून सहभागी होऊ नये असे एक मत असल्याचे वर सांगितलेच आहे. पण तें सयुक्तिक आहे असें वाटत नाही. त्याने सर्व धर्माविषयी तटस्थ राहवें असेंहि म्हणतात. या बाबतीत त्याने पक्षपात करूं नये एवढेच फार तर म्हणतां येईल, पण अपक्षपातासाठी तटस्थता आवश्यक आहे असें नाही. धर्म ही एक प्रेरक शक्ति आहे, ती माणसाला ध्येयवाद, त्याग, समाजसेवा यांना प्रवृत्त करते, असें ज्यांना मुळांतच वाटत नाही त्यांची गोष्ट निराळी. पण ज्यांना धर्माचें हें सामर्थ्य मान्य आहे त्यांना इहवादी शासनानेसुद्धा सर्व धर्म समानत्वाचें तत्त्व न सोडतां त्या शक्तीची जोपासना केली पाहिजे हा विचार पटेल, असें वाटतें. कुटुंबसंस्थेविषयी भिन्न समाजांत, भिन्न धर्मीयांत, पंथीयांत भिन्न तत्त्वें भिन्न रूढि व आचार असतात. पण त्यांची दखल न घेतां सोव्हिएट शासनाने सर्व रशियाला एक कायदा लागू केला. प्रारंभी कांही समाजांना त्याने सवलती दिल्या, पण पुढे सर्वांना समपातळीवर आणलें. एक पत्नी करावी असें ख्रिस्ती धर्मतत्त्व आहे, तर मुस्लिमांना चार स्त्रिया करणें ही धर्माज्ञा आहे असें वाटतें. स्त्रीची समानता मुस्लिमांना मुळीच मान्य नाही. घटस्फोट त्यांच्यांत एकांगी आहे. स्त्री-पुरुषांना त्यांचे भिन्न कायदे आहेत. बुरखा, अपत्य- संगोपन, वारस अशा अनेक बाबतींत प्रत्येक समाजांत, धर्मांत भिन्न व परस्परविरोधी तत्त्वें रूढि व आचार असूनहि सोव्हिएट शासनाने सर्वांना कुटुंबसंस्थेच्या बाबतींत एकच कायदा लागू केला आणि हिंदुस्थानांत सर्वांना एकच सिव्हिल कोड असावें असा आग्रह सर्व इहवादी पंडितांचा आहे. हें जर खरें तर धर्माच्या बाबतींत निरळा विचार करण्याचें कारण काय, तें समजणे कठीण आहे. असो. भारतीय इहवादाचा विचार करतांना याचा सविस्तर परामर्श घेण्यांत येईलच. कुटुंबसंस्थेच्या विचारांशीं तो विचार निगडित असल्यामुळे येथे त्याचा निर्देश करून ठेवला आहे.