पान:इहवादी शासन.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कम्युनिस्ट देश । २५
 

मिळत नाही. धर्म, राष्ट्र या महाप्रेरणाइतकीच मातृभक्ति, स्त्रीची निष्ठा, अपत्यप्रेम या रूपाने व्यक्त होणारें कुटुंबप्रेम, ही प्रेरणा महत्त्वाची आहे. कुटुंब नाही म्हणजे मनुष्याला जीवनांत अर्थ वाटत नाही, जगण्यांत उत्साह राहत नाही व कोणत्याहि कार्याची हौस वाटत नाही. मॉरिस हिंडस याने 'मदर रशिया' या आपल्या पुस्तकांत 'फॅमिली' या प्रकरणांत या भावनेचें सविस्तर वर्णन केलेलें आहे. कर्नल ॲलेक्सी फियोदोरोव्ह यांच्या रेडस्टार पत्रांत प्रसिद्ध झालेल्या पत्रांतला एक उतारा हिंडसने दिला आहे. फियोदोरोव्ह म्हणतो, "मी व माझे शिपाई प्राणपणाने लढतों तें का? दरवेळी, प्रत्येक क्षणाला आमचें कुटुंब आमच्या डोळयांसमोर असतें. घर, आई, बाप, बालके यांच्या आठवणीने आमच्या अंगांत चैतन्य येतें. लढायला धैर्य येतें व त्वेष येतो. आम्ही लढतों तें आमच्या मातृभूमीसाठी आणि कुटुंबासाठी !" याच प्रकरणांत त्याने प्रसिद्ध शास्त्रज्ञ हॅवलॉक एलिस यांचें एक वचन दिलें आहे. एलिस म्हणतो, "मनुष्याच्या शारीरिक व मानसिक प्रकृतीचाच कुटुंब हा एक नसर्गिक घटक आहे. कोणालाहि तो केव्हाहि नष्ट करतां येणार नाही."

समंजस विवेक

 सोव्हिएट नेत्यांनी कुटुंबसंस्थेच्या बाबतींत फारच समंजसपणा दाखविला. विवेक जागृत ठेवून प्रत्यक्ष घडणाऱ्या घटनांवरून बोध घेऊन निष्कर्ष काढून त्यांनी आपले धोरण बदललें. हा खरा इहवाद होय. इहवादी शासनाकडून हीच अपेक्षा असते तर्क, बुद्धिवाद, इतिहास, अवलोकन या आधारे समाजप्रगतीला अवश्य काय तें ठरवून, तसे कायदे करणें हा इहवादाचा आत्मा होय. या मार्गात धर्म, परंपरा, अंध रुढि यांचे कितीहि अडसर आले, तरी त्याला जें जुमानीत नाही तें इहवादी शासन. कुटुंबसंस्थेच्या बाबतींत कम्युनिस्ट इहवादाच्या प्रतिज्ञेशीं प्रामाणिक राहिले याबद्दल त्यांचे अभिनंदन केलें पाहिजे. येथेहि त्यांना विरोधविकासवादी हेकटपणा, दुराग्रह, अंध, आवेश दाखवितां आला असता. कुटुंबप्रेम, पातिव्रत्य, मातृत्वगौरव हें सर्व समाजवादाच्या तत्त्वाशी विसंगत आहे, यांत प्रतिगामीपणा स्पष्ट दिसतो अशी टीकाहि त्या वेळीं अनेक पंडितांनी केली होती. त्यांच्या म्हणण्याला मार्क्सवादांत आधारहि आहे. पण त्यांचें तें भाष्य सोव्हिएट नेत्यांनी मानले नाही. त्यांनी आपले स्वतंत्र भाष्य करून हें सर्व कम्युनिझममध्ये बसतें, त्यांत विसंगति नाही, असेंच मानले व राष्ट्राला मोठ्या अनर्थातुन वाचविलें. धर्माविषयी त्यांनी हाच समंजस विवेक युद्धकाळांत दाखविला, पण पुढे त्यांनी पुन्हा फ्लट खाल्ली. डायलेक्टिकल मटीरियालिझम हा धर्मविरोधीच आहे हा दुराग्रह पुन्हा त्यांनी मानगुटीस बसूं दिला आणि सध्या धर्माचें निःसंतान करण्यासाठी ते आपली शक्ति व बुद्धि व्यर्थ खर्च करीत आहेत. पण लवकरच त्यांना सद्बुद्धि सुचेल अशी आशा आहे.