पान:इहवादी शासन.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४ । इहवादी शासन
 

आणि मुले यांच्या खाजगी एकात्मतेचे स्थान म्हणून कुटुंब हें निश्चित राहील व समाजवादी समाजरचनेचा आद्य घटक म्हणून त्याचें सर्वतोपरी रक्षण केलें जाईल.

गर्भपाताला बंदी

 या नव्या कायद्यांनी प्रथम गर्भपाताला बंदी करण्यात आली आणि विवाहाची नोंदणी आवश्यक ठरविण्यांत आली. त्यावांचून विवाह कायदेशीर होणार नाही असें जाहीर करण्यांत आलें. नंतर घटस्फोट फार अवघड करण्यांत आला. कायद्याने त्याला बंदी घातली नाही; पण त्याच्या मार्गात अनेक अडसर उभे करून तो दुर्मिळ व्हावा अशी व्यवस्था करण्यांत आली. आणि याहून विशेष म्हणजे मातृत्वाचा गौरव कम्युनिस्ट करूं लागले. भारतांत प्राचीन काळी 'अष्टपुत्रा' हा फक्त आशीर्वाद देण्यांत येत असे. पण सोव्हिएट रशियांत नव्या पिढीच्या कार्यक्षम संगोपनासाठी बुद्धिमान् माता बनविणें हें स्त्रीशिक्षणाचें ध्येय आहे असें सांगून, सातव्या मुलापासून अकराव्या मुलापर्यंत दोन ते पांचहजार रूबल मातांना अनुदान देण्याची व्यवस्था करण्यांत आली. हिरॉईन मदर, मदरहूड ग्लोरी, मदरहूड मेडल असे किताव बहुप्रज स्त्रियांना मिळू लागले. "मानवी भाषेत 'माता' या शब्दापेक्षा दुसरा पवित्र शब्द नाही. मातृत्वाच्या आनंदाला मुकणाऱ्या स्त्रीला दुर्दैवीच म्हटले पाहिजे." असा मातृपदगौरव प्रवदा, इझवेस्टिया हीं पत्रे करूं लागली. "सूर्यप्रकाशावांचून फुले नाहीत, प्रेमावांचून सुख नाही, स्त्रीवाचून प्रेम नाही आणि आईवांचून कवि नाही व वीरकाव्यहि नाही," हें मॅक्झिम गॉर्कीचें वचन लोकांच्या कानांत रोज दुमदुमूं लागले. मातृत्वाइतका नव्हे, पण जवळ जवळ तसाच, पातिव्रत्याचाहि गौरव आता कम्युनिस्ट करूं लागले. "पत्नीकडून पातिव्रत्याची अपेक्षा हे भांडवली मालकशाही वृत्तीचें लक्षण आहे, मत्सर हा स्वामित्वभावनेतून निर्माण होतो," असे उद्गार १९३६ ते ४० या काळांत पुण्या-मुंबईच्या कांही वक्त्यांच्या व्याख्यानांतून मी ऐकलेले आहेत. त्याच वेळी 'सोव्हिएट कम्युनिझम' या आपल्या ग्रंथांत सिडने वेव लिहीत होता की, "व्यभिचार हा कम्युनिस्ट तत्त्वाप्रमाणे निंद्य आहे, अपवादात्मक व्यभिचार सुद्धा तेथे गुन्हा मानला जातो. त्या पापासाठी पक्षांतून सभासदाला हाकलून दिले जाते. व्यभिचारामुळे व्याधी जडतात व कामगारांची उत्पादनशक्ति घटते. तेव्हा आमरण एकनिष्ठा हेंच सोव्हिएट रशियांतील विवाहनीतीचं ध्येय आहे." (पृष्ठे १०५७-५८).
 कम्युनिस्टांनी ही विशुद्ध वैवाहिक नीति पुन्हा प्रस्थापित केली याचें एक कारण वर दिलेंच आहे. बालगुन्हेगारी वाढू लागली हें तें कारण होय. क्रांती- नंतरच्या यादवींत व पुढे दुसऱ्या महायुद्धांत मनुष्यसंहार फार भयंकर झाल्यामुळे लोकसंख्या फार घटू लागली, हें दुसरें कारण होय. आणि तिसरें व महत्त्वाचें कारण हें की, कुटुंबप्रेमावांचून मनुष्याला कोणत्याहि कार्याला अवश्य ती प्रेरणा व स्फूर्ति