पान:इहवादी शासन.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कम्युनिस्ट देश । २३
 

तिची सुटका झाल्यावांचून तें शक्य नव्हतें. तेव्हा कम्युनिस्टांनी सार्वजनिक भोजनगृहें व शिशुगृहें स्थापन केली. त्यामुळे स्त्री कम्युनिझमच्या उभारणीसाठी पूर्ण मुक्त झाली. पण अजून एक बंधन राहिलें होतें. गर्भधारणा ! स्त्रीची इच्छा नसतांनाहि पुष्कळ वेळा गर्भधारणा होते. हा जुलूम चालू देणें हें भांडवलशाहीचें लक्षण. तेव्हा सोव्हिएट शासनाने गर्भपाताला कायदेशीर मान्यता दिली. आणि सरकारी दवाखान्यांत त्याची सोय करून ठेवली.
 हे सर्व कायदे पाहिल्यानंतर कुटुंबसंस्थेचा संपूर्ण उच्छेद व्हावा या उद्देशानेच ते केलेले होते हे स्पष्ट दिसून येतें. विवाहविधि नाही, नोंदणी नाही. म्हणजे विवाहच नाही. घटस्फोट अत्यंत सुलभ. मॉरिस हिडसने लिहिल्याप्रमाणे, नवा बूट घेण्यापेक्षाहि सुलभ. प्रपंचाची जवाबदारी नाही, औरस, अनौरस भेद नाही. एकत्र राहणें नाही, गर्भधारणेची चिंता नाही ! मग कुटुंबसंस्था काय राहिली ?

भयंकर परिणाम

 एरवी कुटुंबसंस्था नष्ट झाली असती तरी तिचें सोयरसुतक कम्युनिस्टांनी धरलें नसतें. पण तिच्या अभावीं सर्व समाजच अधोगतीला जात असलेला पाहून ते सावध झाले. घर ही संस्था नष्ट झाल्यामुळे अत्यंत भयंकर परिणाम झाला तो मुलांच्यावर. कुटुंबांतून मुलें हिरावून घेऊन क्रेश नांवाच्या संस्थांतून त्यांना ठेवण्याची सोय केलेली होती. पण या सरकारी शिशुगृहांत मुलांची नीट वाढ होईना. त्या खात्याच्या मुख्य मॅडम लिबिदेवा यांनी स्पष्ट शब्दांत अहवाल लिहिला की, गृहांतील मुलें दुबळी, अर्धवट, हीन, रोगट अशी होतात. सध्या तरी येथल्यापेक्षा घरीं आईने वाढविलेलीं मुलेंच निकोप, तेजस्वी व चपळ असतात. पण यापेक्षाहि भयंकर आपत्ति आली ती ही की, मुलांना घर नाहीसे झाल्यामुळे व अनेक आईबापांनी त्यांना वाऱ्यावर सोडून दिल्यामुळे तो गुन्हेगार बनून हिंसक कृत्ये करीत वणवणा हिंडूं लागलीं. १९३५-३६-३७ सालच्या प्रवदा, इझव्हेस्टिया या पत्रांच्या अंकांतून या प्रकारांची वर्णने वाचून अंगावर काटा येतो. ही पोरकीं पोरें मालगाड्यांत, इंजिनांत वाटेल तेथे बसत व खेड्याखेड्यांतून हिंडून आगी लावीत, खूनहि करीत. अनेक ठिकाणी लष्कर धाडून सरकारला त्यांना आवरण्यासाठी गोळीबार करावा लागला. पिसाळलेल्या कुत्र्यांवर गोळ्या घालाव्यात तशा कांही ठिकाणीं लष्कराने या मुलांवर गोळ्या घातल्या. (सोशिऑलाजिकल बुलेटिन, मार्च १९५३, पृष्ट ३७).
 हे पाहून कम्युनिस्टांची समाजवादी क्रांतीची धुंदी उतरली व १९३६, १९४४ व १९५३ या तीन सालीं नवे कायदे करून सोव्हिएट नेत्यांनी कुटुंबसंस्थेला प्रतिष्ठा व मान प्राप्त करून दिला आणि १९६७ सालीं निःसंदिग्धपणें जाहीर केलें की, कुटुंबाची आर्थिक व शैक्षणिक कार्ये जरी सरकारने घेतली असली तरी पतिपत्नी