पान:इहवादी शासन.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२ । इहवादी शासन
 

बंधु-भगिनींपर्यंत पसरून विशाल होईल असें प्लेटो म्हणत असे. कम्युनिस्टांच्या कुटुंबविरोधाचें तेंहि एक कारण होतें.
 येथे आपण एक गोष्ट ध्यानांत ठेवली पाहिजे की, धर्मसंस्थेला कम्युनिस्टांच्या आद्य भाईचा जसा तात्त्विक व प्रखर विरोध होता तसा कुटुंबसंस्थेला नव्हता. मार्क्स, एंगल्स, लेनिन, यांच्या लेखनांत धर्माप्रमाणे कुटुंबसंस्थेची प्रत्यक्ष हेटाळणी नाही. एकनिष्ठा, मातृत्वगौरव, पातिव्रत्य ही भांडवली बूर्झ्वा कुटुंबाची लक्षणं होत, असें एंगल्सने म्हटले आहे. पण समाजवादांत ही संस्थाच नष्ट होईल असें त्याने म्हटलेले नाही. उलट तेव्हाची कुटुंबसंस्था जास्त चांगली असेल असें त्याने म्हटले आहे. पण असें असले तरी, स्त्री- दास्यविमोचनासाठी व नवमानवनिर्मितीसाठी सोव्हिएट नेत्यांनी प्रारंभीं कुटुंबसंस्थेविषयी जे कायदे केले त्यामुळे तिचा संपूर्ण उच्छेद होत आला होता, हें खरेंच आहे. धर्मवर्चस्व असलेल्या कोणत्याहि शासनाला असे कायदे करता आले नसते.

सुलभ घटस्फोट.

 १९१७ सालीं सत्तारूढ होतांच कम्युनिस्टांनी पहिल्या तडाख्यांत चर्च-विवाह बंद करून नोंदणी-विवाहाचा कायदा केला. पण प्रत्यक्षांत धार्मिक विवाहाला विरोध, इतकाच त्याचा अर्थ झाला. कारण विवाहनोंदणीची व्यवस्था झाली तरी विवाहाला नोंदणी अवश्य होतीच असें नाही. नोंदणी न करतांहि पति-पत्नी म्हणून संसार मांडण्यास शासनाने परवानगी दिली होती. अर्थात् यामुळे औरस व अनौरस संतती हा भेदच नष्ट झाला. अनौरस संततीला सोव्हिएट कायद्याने औरस संततीइतकीच प्रतिष्ठा मिळवून दिली. १९१७ च्या या कायद्याने दुसरी गोष्ट केली ती ही की, त्याने घटस्फोट अत्यंत सुलभ करून टाकला. दोघांनी न्यायालयांत उपस्थित असण्याची जरुरी नाही, दोघांची संमति अवश्य नाही, कारणें देण्याची गरज नाही. नोंदणी कार्यालयांत जाऊन पति-पत्नीपैकी एकाने जरी इच्छा दर्शविली, तरी घटस्फोट मिळू लागला. मग दुसऱ्याला पत्र टाकून कळवायचें ! स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रीबंधविमोचन, स्त्रीपुरुष समता हें तर या कायद्याचं मुख्य उद्दिष्ट होतें. त्या कायद्याने ते पूर्णपणें प्रस्थापित केलें. आज्ञापालन नाही, सेवा नाही, बोलणीं खाणें नाही. स्त्री सर्वांतून मुक्त झाली. पतिपत्नी साधारण एकत्र राहत हें खरें पण या कायद्याने न राहण्याचें स्वातंत्र्य स्त्रीला देऊन टाकले होते. स्त्रीने कोणता उद्योग करावा हें ठरविण्याचा तिला अधिकार मिळाला. पतीच्या परवानगीची जरूरी नाहीशी झाली. त्याचप्रमाणं आर्थिक स्वातंत्र्यहि तिला मिळाले. तिच्या पैशावर पतीचा हक्क मुळीच राहिला नाही.
 स्त्री समाजवादी उत्पादनाला धनोत्पादनाला पूर्ण मोकळी झाली पाहिजे हा कम्युनिस्टांचा पहिल्यापासून कटाक्ष. पण घर, स्वैपाक, मुले सांभाळणे यांतून